आधुनिक सिंदबाद

0
2829

अरेबियन नाईट्‌स ऊर्फ अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथांमध्येच सिंदबाद आणि त्याच्या सात सफरींच्या कथा आहेत. सिंदबाद हा पक्का दर्यावर्दी असतो. त्याला घरी स्वस्थ बसवत नाही. वारंवार तो व्यापाराच्या निमित्ताने समुद्र सफरीवर निघतो. त्यात त्याला नाना तर्‍हांचे चित्रविचित्र अनुभव येतात. त्याच्यावर संकट कोसळतात. त्याला संपत्ती मिळते, पण त्याची जहाजं वादळात सापडून बुडतातसुद्धा. कसाबसा जीव वाचवून तो घरी परततो, पण काही काळाने परत प्रवासाला निघतो. समुद्राची ओढ त्याला घरी बसू देत नाही.
फिलीप बिले हा ब्रिटनच्या रॉयल नेव्हीतून निवृत्त झालेला नौसैनिकही अशाच मनोवृत्तीचा आहे. नौदलाचं निवृत्तिवेतन खात बसणं त्याला सोसत नाही. सतत कसला तरी अभ्यास करणं आणि भटकणं हे त्याचे छंद आहेत. आग्नेय आशियातल्या प्रख्यात अंकोरवाट-बोरुबुदूर मंदिरांमध्ये गेलेला असताना तिथल्या एका शिल्पाकृतीने त्याचं लक्ष वेधलं गेलं. त्याने त्या शिल्पाबद्दल चौकशी केली; तेव्हा असं समजलं की, इसवी सनाच्या आठव्या शतकात बोरुबुदूरपासून पश्‍चिम आफ्रिकेपर्यंत नौकायन करणार्‍या व्यापारी जहाजांची ती चित्र आहेत. बिले चकित झाला. म्हणजे आज एक सामान्य देश असलेल्या कंबोडियाचे दर्यावर्दी आठव्या शतकात इतके पुढारलेले होते की, त्यांनी आग्नेय आशियापासून पश्‍चिम आफ्रिकेपर्यंत जावं? त्याला उत्तर मिळालं की, होय. आठव्या शतकातल्या कंबोडियातल्या हिंदू-बौद्ध राजवटीतला व्यापार आणि नौकानयन खरोखरच इतकं भरभराटलेलं होतं.
बिलेला नवीन कल्पना सुचली. त्याने आठव्या शतकातल्या जहाजांसारखं म्हणजे शीडं आणि वल्ही यांच्या बळावर हाकारलं जाणारं जहाज बनवून घेतलं. मग तो आणि त्याचे काही सहकारी त्या तशा जहाजातून कंबोडियापासून आफ्रिकेच्या पश्‍चिम किनार्‍यांपर्यंत गेले. फिलीप बिलेची ही बोरुबुदूर-आफ्रिका या नावाची समुद्र सफर २००३-०४ साली पार पडली.
ही मोहीम पार पडल्यावर दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन शहरामध्ये एका कार्यक्रमात त्याला एक माणूस भेटला. त्याने याच्या डोक्यात आफ्रिका खंडाला समुद्रातून प्रदक्षिणा घालण्याची कल्पना सोडली. त्या माणसाने बिलेला सांगितलं की, आधुनिक इतिहासानुसार पोर्तुगीज खलाशी बार्थोलोम्यू डायस याने इ. स.च्या १५ व्या शतकात आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घातली, पण प्राचीन हिंदू दर्यावर्दींनी अशी प्रदक्षिणा इसवी सनाच्या अगोदर म्हणजे २ हजार वर्षांपूर्वीच घातलेली आहे.
बिले या नव्या कल्पनेने झपाटला. लंडनला परतल्यावर त्याने या विषयाचा अभ्यास सुरू केला. त्याला आढळलेल्या माहितीनुसार, इ. स.पूर्व सुमारे ५०० या काळात, म्हणजे आजपासून सुमारे २५०० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याचं काम फिनिशियन दर्यावर्दींनी केलं. प्राचीन ग्रीक इतिहासकार हिरोडोटस याने इ. स.पूर्व ४४० मध्ये लिहिलेल्या इतिहासात हे नमूद करण्यात आलं आहे. या प्रदक्षिणेत फिनिशियन लोकांना आढळलेल्या काही गोष्टी, समुद्रातल्या विशिष्ट ठिकाणांवरून विशिष्ट वेळी आढळलेली आकाशातल्या ग्रहांची स्थिती इत्यादी काही टिपणं जी हिरोडोटसने नमूद केलेली आहेत, ती आजच्या काळातही तंतोतंत जुळतात. म्हणजेच हिरोडोटसने लिहून ठेवलेल्या नोंदी अधिकृत आहेत.
आधुनिक इतिहासशास्त्र, जे मुख्यत: युरोपीय आणि अमेरिकन विद्वानांनी घडवलेलं आहे, ते हिंदू आणि बौद्धांच्या पुराव्यांना फारसं मोजीत नाहीत. उदाहरणार्थ, समुद्रमार्गे व्यापार हा विषय ऋग्वेदात येतो. जातककथांमध्ये तर समुद्री व्यापाराच्या विपुल कथा आहेत, पण त्यांच्यामध्ये कुठेही काळाचा उल्लेख नाही. त्यामुळे म्हणे त्यांच्यावर विश्‍वास ठेवता येत नाही.
तर या आधुनिक इतिहासशास्त्राच्या मते जगातले पहिले दर्यावर्दी व्यापारी म्हणजे फिनिशियन लोक. फिनिशिया हा त्यांचा देश आजच्या इजिप्तपासून लेबेनॉनपर्यंत भूमध्यसमुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर पसरलेला होता. थोडक्यात आजच्या इस्रायल, सीरिया, जॉर्डन आणि लेबेनॉन या देशांचा पूर्वज म्हणजे फिनिशिया. हे लोक सेमाईट वंशाचेच होते, पण सेमार्ईटच असलेल्या इस्रेलाईट लोकांशी त्यांचं वैर होतं. इस्रेलाईट म्हणजे इस्रायली लोकांचा प्रसिद्ध राजा डेव्हिड याने हे भांडण मिटवलं. फिनिशियन दर्यावर्दी इंग्लंडमधून लोखंडी पत्रा, अरबस्तानातून सोनं आणि मोती, आफ्रिकेतून गुलाम, हस्तिदंत आणि जनावरांची कातडी, सायप्रसमधून तांबं आणि इजिप्तमधून तलम कापड या वस्तू आणून त्यांचा भरपूर व्यापार करीत. इ. स.पूर्व ३३२ या वर्षी अलेक्झांडरने त्यांचं राज्य खतम केलं.
इ. स.पूर्व २५०० च्या सुमारास इजिप्तचा फारोह सम्राट नेचो दुसरा याने फिनिशियन दर्यावर्दींना आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालून सर्वेक्षण करण्याचं काम दिलं. त्यांनी ते पूर्ण करून सम्राट नेचोला काय अहवाल दिला, हे माहीत नाही. कारण फिनिशिया आणि इजिप्त यांच्या प्राचीन संस्कृती लुप्त झाल्या आहेत, पण ग्रीक इतिहासकार हिरोडोटसने त्यांच्या सफरीचा वृत्तांत लिहून ठेवल्यामुळे आज जगाला ती माहिती मिळाली आहे.
या वृत्तांतातून अनेक लक्षवेधक गोष्टी कळतात. उदा. आज इस्रायल, इजिप्त, सीरिया, जॉर्डन यांचं आपसात जमत नाही. कारण फक धर्माने ज्यू आहे, तर उरलेले इस्लामी आहे. पण वांशिकदृष्ट्या अरब आणि ज्यू हे एकाच म्हणजे सेम्राईट वंशाचे आहेत, हे आधुनिक जनुकशास्त्राने सिद्ध केले आहे. तेव्हाही फिनिशियन आणि इस्रेलाईट्‌स हे एकाच वंशाचे असूनही आपसात लढतच होते. फिनिशियन दर्यावर्दी त्या वेळी आफ्रिकेतून गुलाम आणत होते. म्हणजे आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून अमेरिकेत नेणारे स्पॅनिश हेच पहिले नव्हेत. फिनिशियन व्यापारीही तेच उद्योग करीत होते. अरबांनी आणि तुर्कांनी भारतातूनही जहाजं भरभरून हिंदू स्त्री-पुरुष इराण-अरबस्तानच्या बाजारात गुलाम म्हणून विकले होते. त्याचप्रमाणे एखाद्या भूभागाचे सर्वेक्षण करणं हा प्रकारही तथाकथित आधुनिक, सुधारलेल्या वगैरे म्हणून घेणार्‍या युरोपियन लोकांनी रूढ केलेला नव्हे. अडीच हजार वर्षांपूर्वी इजिप्तचा सम्राट म्हणजे मागास समजल्या जाणार्‍या आफ्रिका खंडातला एक राजा, आशिया खंडातल्या फिनिशियन दर्यावर्दींना सर्वेक्षणाचे कंत्राट देतो; याचा अर्थ सर्वांगीण सर्वेक्षण ही संकल्पना त्यांनाही चांगलीच माहीत होती, नव्हे अवगत होती. म्हणजे ती युरोपची आधुनिक जगाला देणगी वगैरे नाही. आणखी लक्षवेधक म्हणजे युरोपीय वृत्तांत लेखक कुठेही भारताचा उल्लेख करीत नाही. इजिप्तमधून तलम कापड येत असल्याचा उल्लेख ते करतात, पण खुद्द इजिप्तमध्ये कापड भारतातून काशीहून जात होतं, याचा उल्लेख ते करीत नाहीत. प्राचीन भारतात काशी हे अत्युत्तम कापडनिर्मितीचं एक प्रसिद्ध केंद्र होतं. काशीत बनलेल्या तलम कापडाला कासीय किंवा कासी कुत्तीय असं नाव होतं. ते कापडं अरबस्तान, इजिप्तपासून ग्रीस आणि रोमपर्यंत जात होतं. इजिप्तच्या फारोह राजे-राण्यांच्या मम्या म्हणजे मृतदेह ज्या शुभ्र तलम कापडात हजारो वर्षे सुरक्षित राहिलेले सापडले आहेत, ते कापड काशीत बनलेले आहे. युरोपीय इतिहासकार हा उल्लेख मुद्दाम टाळतात की काय? असं वाटतं.
तर फिलीप बिले आता त्या प्राचीन फिनिशियन लोकांप्रमाणे आफ्रिका खंडाला समुद्रातून प्रदक्षिणा घालणार आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? एक चांगली वेगवान बोट आणि तरबेज खलाशी घ्यायचे. भूमध्य समुद्रातल्या अलेक्झांड्रिया या इजिप्तच्या बंदरातून सुरुवात करायची. सुवेझ कालव्यातून, तांबड्या समुद्रातून, हिंदी महासागरातून दक्षिणेकडे जात आफ्रिकेचे टोक म्हणजे एक ऑफ गुड होप गाठायचं. याला वळसा मारला की, आला अटलांटिक महासागर. उत्तरेकडे जात राहिलं की, आली जिब्राल्टरची सामुद्रधुनी. तिच्यात शिरले की, परत भूमध्य समुद्र. म्हणजे अलेक्झांड्रिया ते अलेक्झांड्रिया अशा प्रदक्षिणेला काही आठवडे पुरे. आहे काय अन् की नाही काय!
तर महाशय, फिलीप बिले ही प्रदक्षिणा आधुनिक स्पीड बोटमधून करणार नसून २५०० वर्षांपूर्वीच्या जहाजातून करणार आहेत. म्हणजे त्या काळात फिनिशियन लोक जशी देवदाराच्या लाकडांची जहाजं बांधत असत तसं खास जहाज तो बनवून घेतो आहे. हे जहाज कोळसा, पेट्रोल, डिझेल अशा आधुनिक इंधनांवर चालणार नसून त्या काळातल्या प्रमाणेच शिडं आणि वल्ही यांच्यावर चालणार आहे. बिलेबरोबर २० खलाशी असणार आहेत.
ही सफर सोपी नाही याची बिलेला पूर्ण जाणीव आहे. कारण हिंदी महासागरात कोणत्याही मोसमात वादळं होऊ शकतात. तसंच हल्ली तांबड्या समुद्रात आणि आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलगच्या समुद्रात चाचे लोकांचा उपद्रव वाढत चालला आहे. जमिनीवरच्या शहरातल्या गुंड टोळ्यांप्रमाणे हे आधुनिक चाचेही अत्याधुनिक साधनांनी युक्त असतात. त्यांच्याकडे वेगवान बोटींपासून एके ४७ पर्यंत म्हणाल ती आधुनिक हत्यारं उपलब्ध असतात.
पण माणूस आणि निसर्ग यांच्यामुळे येऊ शकणारे हे संकटं गृहीत धरूनच बिले आणि त्याचे सहकारी सफरीवर निघत आहेत. साहस ही एक मनोवृत्ती आहे आणि ज्याला साहस करायचंय् त्याला आजही असंख्य संधी, अनेक मार्ग उपलब्ध आहेत, हे मला नव्या पिढीसमोर ठेवायचंय्, असं फिलीप बिले म्हणतो. बिलेचं हे सांगणं फक्त त्याच्याच देशातल्या नव्या पिढीसाठी आहे असे नव्हे; आपल्या देशातल्या नव्या पिढीसाठीही आहे. पण साहसी मनोवृत्ती मनात अंकुरायला हवी असेल तर इडियट बॉक्स नि त्याच्यावरच्या आचरट मालिका यांच्यापासून मनाला अन्यत्र वळवायला लागेल. पहा जमतं का! शुभास्ते पंथाना! फिलीप बिलेला नि तुम्हालाही!!

मल्हार कृष्ण गोखले