वाचकांचे मनोगत

0
82

केजरीवालांचे २७ कोटी रुपये!
मीच एकमेव प्रामाणिक माणूस असल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या केजरीवालांचे एकामागे एक घोटाळे उघडकीस येत आहेत. आता त्यांनी २७ कोटींच्या देणग्यांचा हिशेब न दिल्याची बाब समोर आली आहे. मागेही त्यांनी आणि मनीष सिसोदियांनी मिळून कबीर नावाची एक वेबसाईट उघडली होती व त्या माध्यमातून विदेशातून बराच निधी मिळविला होता. त्याचा हिशेब देताना, सिसोदियांची कार धुण्यावरही खर्च झाल्याचे दाखविले होते. हा आहे केजरीवालांचा खरा चेहरा!
विवेक देशमाने
नागपूर
आठवलेंनी संयम राखावा!
मला इतकी तिकिटे दिली नाहीत, तर शिवसेनेशी युती करीन, असे म्हणून भाजपाला ब्लॅकमेल करणे रामदास आठवले यांनी सोडून द्यावे. भाजपानेच त्यांना खासदार आणि नंतर केंद्रीय राज्यमंत्री बनविले आहे, याचे भान ठेवावे. भाजपाने आठवलेंना खूप काही दिले आहे. सर्वात आधी आठवलेंनी आपला पक्ष मजबूत करण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. केवळ स्वार्थासाठी भाजपासोबत विश्‍वासघात करू नये.
अशोक वाघमारे
अमरावती
नारायण मूर्ती यांचा मोलाचा सल्ला
अमेरिकन सरकारने एच १-बी व्हिसा नियम कडक केल्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. इथल्या कंपन्यांनी विदेशातील भारतीयांना येथेच नोकरी द्यावी, असा सल्ला देतानाच, आमच्या तंत्रज्ञानात अधिकाधिक आधुनिकता आणून रोजगाराला कसा वाव मिळेल, याचा विचार करण्याचा मोलाचा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिला आहे. हा सल्ला देशातील सर्व आयटी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक कंपन्या अंमलात आणतील, अशी अपेक्षा आहे.
वैशाली देशपांडे
नागपूर
विजय मल्ल्ल्याच्या उलट्या बोंबा!
भारतीय बँका आणि वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेऊन विदेशात पळून जाणार्‍या धनबुडव्यांची संपत्ती जप्त करण्याचा नवा कायदा सरकार करणार आहे. यामुळे विजय मल्ल्या याला मोठाच धक्का बसल्याचे दिसते. माझी स्थिती संपुआ आणि रालोआ यांच्या लढाईत फुटबॉलसारखी झाली आहे, अशी बोंब त्याने ठोकली आहे. एवढाच जर तो प्रामाणिक असेल तर त्याला भीती कसली? त्याने भारतात यावे आणि आपले कर्ज चुकते करावे.
किशोर जाधव
अमरावती
मराठा संघटनेत सावळागोंधळ!
मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली या संघटनेने अतोनात मेहनत घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यांत विशाल मूक मोर्चे काढले. पण, सध्या या संघटनेत सावळागोंधळ दिसत आहे. वेगवेगळे गट आपल्या मर्जीने निर्णय घेत आहेत. कुणी तर राजकारणात थेट प्रवेश करते झाले आहेत. ही एवढी मेहनत यासाठी घेतली होती का की, एके दिवशी संघटनेचे हे हाल पाहण्याची वेळ येईल? अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी शांत चित्ताने विचार करावा.
विश्‍वास पाटील
यवतमाळ