डॉ. रणजित पाटील यांचा दणदणीत विजय

पहिल्या पसंतीची ७८ हजार ५१ विक्रमी मते • सलग दुसर्‍यांदा विजय

0
369

तभा वृत्तसेवा
अमरावती, ६ फेब्रुवारी
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दणदणीत विजय मिळविला. पहिल्या पसंतीची विक्रमी मते घेऊन त्यांनी विजय निश्‍चित केला. या मतदारसंघात ते सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत. विजयाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला ५ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. एकूण २ लाख १० हजार ५५८ पदवीधर मतदारांपैकी १ लाख ३३ हजार ९८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान झाले होते. या मतदानाची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारीला अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजतापासून सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच डॉ. रणजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली. त्याचवेळी ते विजयी होतील, असे चित्र दिसायला लागले होते. अंतिम फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. विजयासाठी ६१ हजार ६८१ मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला होता. डॉ. पाटील यांना पहिल्या पसंतीचीच ७८ हजार ५१ मते मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. दुसर्‍या स्थानावर असलेले कॉंग्रेसचे उमेदवार संजय खोडके अपेक्षेनुरूप मते घेऊ (पान २ वर)४
शकले नाही. पहिल्या फेरीपासूनच ते पिछाडीवर होते. संपूर्ण मतमोजणीत एकदाही खोडके यांच्या बाजूने आशावादी कौल आला नाही. त्यांना ३४ हजार १५४ मते मिळाली. डॉ. पाटील यांच्यापेक्षा त्यांनी ४३ हजार ८९७ मते कमी घेतली. तिसर्‍या स्थानावर प्रहारचे डॉ. दीपक धोटे राहिले. त्यांना पहिल्या पसंतीची ५ हजार ९६४ मते मिळाली. चौथ्या स्थानावर राहिलेल्या डॉ. अविनाश चौधरी यांना १ हजार ७३९ तर जितेंद्र जैन यांना १ हजार ८८ पहिल्या पसंतीची मते मिळाली. त्यांच्या खालोखाल गणेश तायडे यांना ८७१, ऍड. अरुण आंबेडकर यांना ५२४, ऍड. संतोष गावंडे यांना २९६, नीता गहरवार यांना २५८, ऍड. डॉ. लतिश देशमुख यांना २२५, प्रा. प्रशांत वानखडे यांना ८६, दिलीप सुरोसे यांना ८३, प्रशांत काटे यांना केवळ पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली. ४६७ मतदारांनी ‘नोटा’ला प्राधान्य दिले. एकूण ६ फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी झाली. विशेष म्हणजे मतमोजणीच्या वेळी डॉ. पाटील, संजय खोडके व अन्य उमेदवार जातीने हजर होते.
डॉ. रणजित पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाचे पदवीधर निवडणूक प्रमुख आमदार चैनसुख संचेती, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे, प्रा. रवींद्र खांडेकर यांच्यासह डॉ. पाटील यांच्या पत्नी डॉ. अपर्णा पाटील, मुलगा, मुलगी व डॉ. वसुधा बोंडे यांनी मतमोजणीच्या स्थळी धाव घेतली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पाटलांच्या विजयाची घोषणा झाली. तोपर्यंत प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आमदार डॉ. सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर, मिलिंद चिमोटे, अभय बपोरीकर मतमोजणी स्थळावर पोहोचले. सर्वांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन करून विजयाचा जल्लोष केला. केला.
१० हजार १५४ मते अवैध
सुशिक्षितांचा मतदार संघ म्हणून पदवीधर मतदार संघाला ओळखले जाते. मतदान कसे करायचे, याची इत्यंभूत माहिती प्रशासन व राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत वारंवार पोहोचविण्यात आली. असे असतानाही १ लाख ३३ हजार ९८२ मतांपैकी १० हजार १५४ मते अवैध ठरली. काहींनी अतिशय घोडचुका मतपत्रिकेवर केल्या होत्या. ‘जुनी पेन्शन योजना सुरू करा’, ‘सभागृहात झोपू नका’, अशी व अन्य काही शेरेबाजी काही मतदारांनी मतपत्रिकेवर लिहिली होती.
मेहनतीचे फळ : डॉ. पाटील
पक्ष कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी केलेल्या मेहनतीचे फळ विजयाच्या स्वरूपात मिळाले आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकार्‍याने पदवीधर मतदारांच्या नोंदणीपासूनच प्रामाणिक मेहनत केली. एकसंध पद्धतीने झालेल्या कार्यामुळे पदवीधर निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा मला विक्रमी विजय मिळाला. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पदवीधर मतदारांना विक्रमी मतांनी मला विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला पदवीधरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचा मी मनस्वी आभारी आहे. शिक्षक, प्राध्यापक व इतर पदवीधरांसाठी केलेल्या ठोस कार्याची पावती मला मिळाली आहे. सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न मंत्री म्हणून मी केला. भविष्यातही त्याच पद्धतीने कार्य सुरू राहील, असे डॉ. पाटील विजयाच्या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.