वाचकांचे मनोगत

0
112

निवडणुकीची रणधुमाळी
राज्यात महापालिका व जि. प. च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी सर्वच उमेदवार मी किती चांगला, हे पटवून सांगण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. पण, मतदारांनी हे लक्षात ठेवावे की, आपल्या मतावर आपल्या मतदारसंघाचा विकास पाच वर्षांसाठी एका व्यक्तीच्या हाती देत आहोत. तेव्हा, त्याचे चारित्र्य, शिक्षण, संस्कार, समाजाविषयी बांधीलकी, वॉर्डाच्या समस्यांची जाण असलेल्या उमेदवाराचीच निवड करा. नंतर पश्‍चात्ताप करीत बसू नका.
किशोर दुधे
नागपूर
केजरीवालांचा खरा चेहरा उघड
निवडणुकीसाठी निधी घेतलेल्या रकमेचे अंकेक्षण सादर करताना, केजरीवाल यांनी दिलेल्या २७ कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचे उघडकीस आले आहे. केजरीवाल हे स्वत: आयकर अधिकारी असल्याने त्यांना ही लपवालपवी माहीत असणारच. त्याचा लाभ त्यांनी यावेळी घेतला खरा. पण, त्यांचा हा खोटेपणा आयकर विभागाच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. आता निवडणूक आयोग कोणती कारवाई करते, ते पाहायचे. पण, केजरीवालांचा खरा चेहरा उघड झाला, हे नक्की.
देवेश सोनटक्के
नागपूर
ऑनलाईन व्यवहार करताना सावधान
अलीकडे नाममात्र रक्कम भरून चांगले पैसे कमवा अशा जाहिराती येत आहेत. नागरिकांनी अशा जाहिरातींपासून सावधान राहाण्याची गरज आहे. नुकतीच दिल्लीत अशी फसवणुकीची घटना घडली असून त्यातील तीन आरोपींना अटक झाली आहे. यापैकी एक बी. टेक् आहे. सोशल ट्रेड नावाची वेबसाईट उघडून त्याने अशा साडेसहा लोकांची ३७०० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तेव्हा जनतेने सावध राहावयास हवे. अशा लोकांच्या जाळ्यात मुळीच फसू नये.
अमोल पाटील
नागपूर
आता म्हणतात, ओबामाच बरे होते
अमेरिकेचे राष्ट्रपती रोनॉल्ड ट्रम्प यांनी ज्या अराजक निर्माण करणार्‍या निर्णयांचा सपाटा लावला आहे, ते पाहून जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे. आता अमेरिकेतील ५२ टक्के लोक म्हणत आहेत की, ट्रम्पपेक्षा बराक ओबामाच बरे होते. पण, आता पश्‍चात्ताप करून काय फायदा. ट्रम्पला तर याच अमेरिकन लोकांनी निवडून दिले होते. आता बसा पश्‍चात्ताप करीत.
विनोद देशपांडे
नागपूर
मुलायमसिंहांचे काही कळत नाही
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची मुलाने, मुख्यमंत्री अखिलेशने नाचक्की केल्यानंतर आता मी भाऊ शिवपाल यादव यांचा प्रचार करणार असल्याचे घोषित केले. पण, नंतर त्यांनी घुमजाव करीत, आता मी शिवपाल नव्हे तर अखिलेशसाठी प्रचार करीन असे म्हटले आहे. शिवाय कॉंग्रेससोबत युती केल्याबद्दल त्यांनी प्रचंड राग व्यक्त केला आहे. एकूणच मुलायम यांच्या मनात काय आहे, हे कळेनासे झाले आहे.
मनोहर जाधव
नागपूर