अराजकाला मिळालेला खरा शह!

0
163

नोटबंदी हा पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचारावर केलेला खरा ‘सर्जिकल स्ट्राइकच’ आहे. हे आता होेत असलेल्या धाडी व करबुडव्यांना नोटीस पाठविण्यावरून दिसून येत आहे.
आजपर्यंतच्या सरकारांनी (काही अपवाद वगळता) आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी कार्य केलंय्. यासाठी पंतप्रधानांसारखं सर्वात महत्त्वाचं असलेलं सत्ताकेंद्र देखील इतरत्र हलवण्यात आलं. लोकशाहीच्या अन् संविधानाच्या एवढ्या चिंधड्या उडत असतानासुद्धा आपल्या देशातील मीडिया, जी इतर वेळी राष्ट्रभक्तांवर वाट्टेल ते आरोप करते, अशा वेळी तिचीही दातखीळ बसते.
खरी पंचाईत झाली ती धनदांडगे राजकीय नेते, नोकरशहा, मोठे अधिकारी, व्यापारी, भुरट्या चोरांपासून दाऊद इब्राहिमसारखे गुन्हेगार आणि इतर व्यावसायिक ज्यामध्ये अनेक (सगळे नाही) डॉक्टर्स, वकील, बिल्डर्स आणि या सगळ्यांना आतापर्यंत चिंतामुक्त ठेवणारे चार्टर्ड अकाऊंटंट्‌सही येतात. या सर्वातही नैतिकता जपणारे संख्येने अधिक आहेत, यात शंका नाही. पण वरील अनैतिक मंडळींमुळे सरकारपेक्षाही मोठा आवाका असलेली एक ‘पॅरलल इकॉनॉमी’ स्वातंत्र्यापासून चालत आली होती. तिला कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता, उलट अशा लोकांच्या भरभराटीकडेच केंद्र आणि राज्य सरकारांचं जातीनं लक्ष होतं.
शिस्त नावाचा प्रकार आपल्या देशात तिन्ही सेनांखेरीज एकदम प्राथमिक शाळांमध्ये, रास्वसंघ, रामकृष्ण मिशन सारख्या सामाजिक संस्था आणि भगवत्प्रेरित संस्थांमध्ये दिसून येतो. यासंदर्भात पोलिस खात्याच्या बाबतीत काही विधान करता येणं कठीण आहे.
या सार्‍या पार्श्‍वभूमीवर आर्थिक शिस्त लागणं अशक्य आहे, हा विचार करून नोटबंदी हा सगळ्यात कडवट पण हमखास उपाय योजण्याशिवाय सरकारजवळ पर्यायच नव्हता. या निर्णयाचं एकीकडे अण्णा हजारेसारख्या व्यक्तीच नव्हे, तर अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांनी आणि आश्‍चर्यकारकपणे पाकिस्तानी पत्रकार आणि जनतेनेही स्वागत आणि कौतुक केलं आहे. पण आपल्या देशात साम्यवाद्यांसारखे शेंडा ना बुड असलेले लोक हजारो करोड रुपये बँक खात्यांमध्ये जमा होत असताना आणि पैसा उघड होत असताना संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली अशी हास्यास्पद विधाने करत होते. कितीही कडवट विरोध असला तरी श्रीमंत आणि सामान्यांच्या मधली दरी कमी करण्याचा हा उपाय जालीम असला, तरी त्यांना आवडायला हवा होता. पण आजच्या साम्यवाद्यांची पातळी किती हीन दर्जाची झालेली आहे हेच त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येतं. आजची मीडिया अशांनाच उचलून धरते, हे आणखी एक दुर्दैवं.
कोणत्याही सरकारला जेव्हा शिस्त नको असते तेव्हा असामाजिक तत्त्वांचं फावतं. दुर्दैवाने आज असामाजिक तत्त्वांमध्ये सामील असलेले राजकारणी पिसाट, बेभान आणि चवताळून गेलेले आपण बघत आहोत. आपार्यंत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं स्वैरपणे चालत होतं, ते आता फक्त ‘तेरी चूप’ पर्यंतच मर्यादित राहील. असे स्वैर राजकारणी जेवढे खुष तेवढं सरकारसाठी आतापर्यंत बरं होतं. हे लोक पुन्हा काळा पैसा उभा करणार नाहीत असं नाही, काही काळानंतर हे पुन्हा सुरू होईलही. पण तोपर्यंत या सार्‍यांच्या मानसिकतेत ‘थोडा तरी’ बदल व्हावा अशी अपेक्षा आहे. मुळात जगाच्या पाठीवर भ्रष्टाचारच नाही असा एकही देश अस्तित्वात नाही. अगदी कॅशलेस व्यवहार करणार्‍या देशांमध्येही भ्रष्टाचार आहेच. कारण भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन हे प्रत्यक्ष भगवंतालाही शक्य नाही. पण असं असलं तरी त्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण अनेक देशांत आहे, हेही तेवढंच खरं.
लोकशाहीच्या मजबुतीकरणाकडे मोदी सरकारने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल म्हणून स्वतंत्र भारताच्या इतिहासात या घटनेची नोंद सुवर्णाक्षरात होईल, एवढं मात्र नक्की!
आनंद देव, ९४२२४६५५६७