मायावती यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई

0
160

उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. पहिल्या टप्प्यात ११ फेब्रुवारीला पश्‍चिमी उत्तरप्रदेशच्या १५ जिल्ह्यांतील ७३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. दिल्लीतील सत्तेचा मार्ग हा लखनौतून जात असल्यामुळे उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला नेहमीच महत्त्व असते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असते.
उत्तरप्रदेशमध्ये मतदारांचा कल समजून घेण्यासाठी आतापर्यंत विविध वाहिन्यांनी निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले. या सर्व वाहिन्यांच्या सर्वेक्षणाचा कल हा परस्परविरोधी आहे. काही वाहिन्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत दाखवले, तर काहींनी सपा-कॉंग्रेस आघाडीला. राज्यात सरकार कोणाचे येणार याबाबत या सर्वेक्षणात एकमत नसले, तरी एका मुद्यावर मात्र सर्व सर्वेक्षणात मतैक्य झाले, ते म्हणजे राज्यात कोणत्याही स्थितीत बसपाचे सरकार येणार नाही. सर्व सर्वेक्षणातून बसपाला तिसर्‍या स्थानावर ठेवण्यात आले आहे.
राज्यातील सत्ताधारी समाजवादी पार्टीत अंतर्गत संघर्ष पराकोटीला पोहोचला होता, तेव्हा बसपाला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सपातील अंतर्गत भांडणाचा फायदा बसपाला होईल, असे मानले जात होते. अंतर्गत सत्तासंघर्षामुळे समाजवादीत फूट पडली असती, तर राज्यातील मुस्लिम मतदार बसपासोबत जातील, असा अंदाज केला जात होता. प्रत्यक्षात हा अंदाज चुकला. समाजवादी पार्टीत फूट पडली नाही, मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या पिता-पुत्राच्या संघर्षात समाजवादी पार्टीतील बहुतांश आमदार आणि खासदार मुलायमसिंह यादव यांची साथ सोडून अखिलेश यादवांसोबत आल्यामुळे निवडणूक आयोगाला अखिलेश यादव यांचा गट हाच मूळ समाजवादी पार्टी असल्याचा निवाडा देत सायकल हे निवडणूक चिन्ह त्यांना द्यावे लागले.
पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्षात बाजी मारल्यानंतर आणि आपल्या काकाला शिवपाल यादव यांना त्यांची जागा दाखवल्यानंतर अखिलेश यादव यांनी कॉंग्रेससोबत युती केली. या युतीने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. मुस्लिम मतांचे संभाव्य विभाजन टळले. सपा आणि कॉंग्रेस आघाडीच्या या युतीचा सर्वाधिक फटका मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला बसला, त्यांच्या आशा-आकांक्षावर पाणी फेरल्या गेले. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांच्या गटाला सायकल हे निवडणूक चिन्ह मिळण्यापूर्वी त्यांच्याशी युती करण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेस द्विधा मन:स्थितीत होती. कॉंग्रेसमधील एक गटाचा आग्रह सपाऐवजी बसपाशी युती करण्याच्या बाजूने होता. मात्र, त्यावेळी मायावती कॉंग्रेससोबत युती करण्यास उत्सुक नव्हत्या. कारण स्वबळावर आपण सत्तेवर येऊ असा विश्‍वास त्यांना वाटत होता.
त्यामुळे अखिलेश यादव यांच्या गटाशी युती करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय कॉंग्रेससमोर नव्हता. राज्यात स्वळावर निवडणूक लढवण्याची आणि शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याची अतिउत्साही घोषणा कॉंग्रेसने सुरुवातीला केली असली तरी नंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर आपण स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही, याचा अंदाज कॉंग्रेसच्या नेतृत्वाला विशेषत: कॉंग्रेसची निवडणूक व्यूहरचना करणार्‍या प्रशांत किशोर यांना आला होता. कॉंग्रेसला सपा वा बसपा यापैकी कोणाच्या तरी राजकीय कुबड्यांची आवश्यकता होती, ती सपाने पूर्ण केली.
राज्यातील यावेळची विधानसभा निवडणूक ही मायावती यांच्या बसपासाठी जीवन-मरणाची आहे. कारण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बसपाला लक्षणीय यश मिळवता आले नाही, तर बसपाचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहाणार नाही. २०१२ मध्ये सत्ता गमावल्यानंतर पाच वर्षात बसपा कमजोर झाला. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर बसपाचे पानिपत झाले. देशात सोडा पण आपल्या गृहराज्यातही बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. बसपाच्या हत्तीची चाल मंदावलीच नाही, तर पूर्णपणे ठप्प झाली. बसपाला राजकीयदृष्ट्या ओहोटी लागल्याचे हे चित्र होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक बसपा नेत्यांनी पक्ष सोडला. याला मायावती यांची हुकूमशाही कार्यपद्धती, हेही एक कारण होते.
२००२ मध्ये बसपाने राज्यात २०.०८ टक्के मते मिळवत ८८ जागा जिंकल्या होत्या. २००७ मध्ये तर बसपाचा हत्ती जोरात होता. बसपाने ३०.४३ टक्के मतांसह २०६ जागा जिंकल्या होत्या. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला २५.९१ टक्के मतांसह फक्त ८० जागा जिंकता आल्या. त्यामुळे यावेळी कोणत्याही स्थितीत विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या जिद्दीने मायावती निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या, जवळपास वर्षभरापासून त्यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आपल्या उमेदवारांची घोषणाही मायावती यांनी अन्य राजकीय पक्षांच्या कितीतरी आधी केली होती. असे करून त्यांनी अन्य राजकीय पक्षांवर आघाडी घेतलीही होती. पण त्यांना पहिलाच फटका नोटबंदीच्या निर्णयाचा बसला. ‘प्रथमग्रासे मक्षिकापात’ अशी मायावती यांची स्थिती झाली. नोटबंदीच्या निर्णयाने मायावती यांची आर्थिक समीकरणे ढासळली.
यादव आणि मुस्लिम ही समाजवादी पार्टीची व्होट बँक मानली जात होती. यातील मुस्लिमांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न मायावती यांनी केला. दलित, ब्राह्मण यांच्यासोबत मुस्लिम मतदारही आपल्याकडे ओढण्याचा मायावती यांचा प्रयत्न होता. समाजवादी पार्टीतील सत्तासंघर्ष टोकाला गेला असताना बसपा सोडून अन्य कोणत्याही पार्टीला मत देणे म्हणजे आपले मत वाया घालवण्यासारखे आहे, असे मायावती मुस्लिम मतदारांना सांगत होत्या. मुस्लिम मतांवर डोळा ठेवत मायावती यांनी समाजवादी पार्टीने झिडकारलेल्या बाहुबली मुख्तार अन्सारी यांच्या कौमी एकता दलाचे बसपात विलीनीकरण घडवून आणले, एवढेच नाही तर त्याच्यासाठी तीन जागाही सोडल्या. मुस्लिमांसाठी मेळावे आयोजित करण्याची जबाबदारी त्यांनी नसीमुद्दिन यांच्यावर तर ब्राह्मणांसाठी असे मेळावे आयोजित करण्याची जबाबदारी बसपातील ब्राह्मण चेहरा असलेल्या सतीशचंद्र मिश्र यांच्यावर सोपवली.
जातीय आणि धर्माच्या आधारावर निवडणूक लढण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला असताना मायावती यांच्या बसपाने जातीय आधारावर आपल्या तिकिटांचे वाटप केले. बसपाने ४०३ पैकी सर्वाधिक म्हणजे ११३ जागा सवर्णांना दिल्या, त्याखालोखाल ओबीसीला १०६ तर मुस्लिमांना ९७ जागा दिल्या. बसपाची व्होट बँक मानल्या जाणार्‍या दलितांना ८७ जागा मिळाल्या. राज्यात बहुमतासाठी आवश्यक असणार्‍या २०२ जागांपैकी राखीव मतदारसंघातून ६०, मुस्लिम उमेदवारांमधून ६० आणि उरलेल्या ८० जागा ओबीसी आणि सवर्णांमधून जिंकण्याचे मायावती यांचे गणित आहे.
कागदावरच्या जातीय गणितात मायावती आघाडीवर असल्या तरी प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. एकाही वाहिनीच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून मायावती यांच्या बसपाला ५० पेक्षा जास्त दाखवण्यात आल्या नाही. विशेष म्हणजे २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या निवडणूक सर्वेक्षणात राज्यात बसपाला सर्वाधिक म्हणजे १४४ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यावेळी बसपाला फक्त ८० जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मायावती यांच्या बसपाची स्थिती उत्तरप्रदेशात समाधानकारक नाही. यावेळी बसपाचा पराभव झाला, त्यांना समाधानकारक जागा मिळाल्या नाही, तर बसपाचे राजकीय अस्तित्व आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची मान्यता धोक्यात आल्याशिवाय राहाणार नाही. त्यामुळे यावेळची निवडणूक बसपासोबत मायावती यांच्याही राजकीय अस्तित्वाची आहे.
श्यामकांत जहागीरदार,९८८१७१७८१७