वाचकांचे मनोगत

0
85

केवढी ही घसरण!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे, शिवसेनेचा वाघ हा मराठी माणसाचा चेहरा आहे, हिंदुत्व हा शिवसेनेचा चेहरा आहे असे जेव्हा म्हणायचे तेव्हा तमाम मराठी माणसांची छाती अभिमानाने फुगायची! काळाच्या ओघात बाळासाहेब गेले. बदल झाले. राणीच्या बागेतील वाघाची जागा पेंग्विनने घेतली. याचा विचार करण्याऐवजी उद्धव ठाकरे या सार्‍याचे खापर भाजपावर फोडू लागले. जो जो मोदी-भाजपा विरोधक असेल त्याला जवळ करू लागले. हार्दिक पटेल हा आमचा चेहरा असेल या त्यांच्या घोषणेने तर मराठी माणसाची घोर निराशा केली आहे. शिवसेनेची केवढी ही घसरण!
सोमनाथ देशमाने
९७६३६२१८५६
आतातरी गांभीर्याने विचार करा
कोकण शिक्षक मतदार संघात ३० वर्षांच्या अधिराज्यात भाजपा प्रथमच पराभूत झाला. बंडखोरी ही काय असते, हे अजूनही सुज्ञ नेत्यांना का समजत नाही? आता तर पराकोटीचा विरोध सुरू आहे. कोकणात भाजपा-शिवसेना सोबत असते, तर पराभव झाला नसता. अजूनही वेळ गेलेली नाही; दोघांनीही याचा विचार केला तरच मुंबई मराठी माणसांची राहील, अन्यथा कुणाचाच लाभ होणार नाही.
अमोल करकरे
पनवेल
मल्ल्याला कर्ज, कॉंग्रेस जबाबदार
हजारो कोटी रुपये बुडवून विदेशात विलासी जीवन जगणार्‍या विजय मल्ल्याला कर्जाच्या भोवर्‍यातून वाचविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मदत केली होती. मल्ल्याने सिंग यांना पत्रे लिहिली होती, असा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. आधीच कर्ज असताना, आणखी कर्ज देण्याची शिफारस कॉंग्रेसने केली. त्यामुळे मल्ल्याच्या करबुडवेपणाला कॉंग्रेस पक्षच पूर्णपणे जबाबदार आहे.
बी. टी. देशमुख
बुलढाणा
देशद्रोही हार्दिक सेनेचा चेहरा कसा?
देशद्रोहाचा आरोप असलेला हार्दिक पटेल याला सहा महिने जामीन मिळाला नाही. आता उद्धव ठाकरे म्हणतात, हार्दिक पटेल हा आमचा गुजरातेतील चेहरा असेल. याचा अर्थ आता शिवसेनेला देशद्रोहीही चालतात का? याचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी करायला हवा. यातली गोम अशी की, मुंबईत गुजराती मते मिळतात का, यासाठी हार्दिकला समोर करण्यात आले आहे. पण, जनता एवढी दूधखुळी राहिलेली नाही.
विनोद देशपांडे
नागपूर
बेनामी संपत्ती धारकांवर हातोडा
बेनामी संपत्ती बाळगणार्‍यांवर आता मोठा हातोडा पडणार आहे. अनेक लोक आयकर बुडविण्यासाठी अनेक क्लृप्त्या करतात. पण, आता अशा एक कोटी करबुडव्यांना सरकारने नोटीस पाठविली आहे. आयकर हा प्रामाणिकपणे सर्वांनी भरावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. सत्ता हाती घेताच त्यांनी काळा पैसा हुडकून काढण्यासाठी एसआयटी नेमली होती. आता बेनामी संपत्तीधारकांना जबर दंड आणि दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद राहाणार आहे. तेव्हा सावधान!
प्रकाश पाटील
नागपूर