पक्षांतर : नेत्यांचे आणि लोकांचे…

0
90

सत्तासोपान गाठण्याकरिता पक्षांतर होणे ही बाब नित्य झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जसजशी जवळ येते, तशी पक्षांतरात वाढ होत जाते. पक्षांतर कुणी करावे व कोणत्या कारणाकरिता, याला आता धरबंद राहिलेला नाही.
पक्षांतर किंवा बंडखोरी याचा मागोवा घेतला असता, पहिली बंडखोरी कैकेयीने केल्याचे दिसते. मात्र, ज्या पुत्राकरिता बंडखोरी केली त्या भरताने ‘रामाविण राज्यपदी कोण बैसतो…’ अशी भूमिका घेतली व पहिले पक्षांतर निर्धारित लक्ष्य गाठू शकले नाही.
मोगलसम्राटांच्या कालावधीत पक्षांतराचा प्रकार वेगळाच होता. एका रात्रीतून मुलगा बापाला ‘तौबा-तौबा’ करायला लावीत, एकतर ठार मारून किंवा कैदेत टाकून सत्ता काबीज करीत असे. स्वातंत्र्यपूर्व काळातही वैचारिक भूमिकेत दुरी निर्माण झाल्यामुळे काही पक्षांतरे झालीत. त्या वेळी वाद तत्त्वाचे होते व हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देणे हे समान अंतिम उद्दिष्ट होते.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९६७ पर्यंत पक्षांतर हा विषय फारसा चर्चेत नव्हता. १९६९ साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी कै. इंदिरा गांधी यांनी आतला आवाज काढीत, कॉंग्रेस पक्षाविरुद्धच बंडाळी केली व तिथपासून पक्षांतर आणि बंडखोरी यांनी भारतीय राजकारणात मूळ धरले. पक्षशिस्त मोडकळीस येण्याची परंपरा सुरू झाली. एकेकाळी हरयाणा राज्यात या पक्षांतराने शिखर गाठले. काही आमदार सकाळी एका पक्षात तर सायंकाळी दुसर्‍या पक्षात प्रवेश करीत असत. तेव्हापासून पक्षांतर करणार्‍यांना ‘आयाराम-गयाराम’ म्हणण्याची पद्धत दृढ झाली. जनतेची सेवा करण्याकरिता सत्ता प्राप्त करणे, हा विचार जवळपास इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे! सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता या चक्राने फार मोठी गती घेतली आहे. राजकारणात ईष्यार्र् आवश्यक आहे, पण कोणत्या मर्यादेपर्यंत ईर्ष्या ताणायची, याचे भान अनेकांना नसते. जनमानसाचा किंवा मतदारांचा कौल बघितला, तर पक्षांतर केलेल्या उमेदवारांपेक्षा निष्ठावान उमेदवार लोकांच्या पसंतीला उतरतात, असे दिसते. राजकीय आकांक्षा धरून वावरत असताना अनेकांना धीर धरवत नाही व सत्तेकरिता सोपा मार्ग म्हणजे ‘शॉर्ट कट’ अनेकांना खुणावतो. विधानसभा निवडणुकीच्या वेळी एक उमेदवार अर्ज भरण्यास मिरवणुकीने निघाले ते एका पक्षाच्या वतीने आणि अर्ज भरला तो दुसर्‍या पक्षाच्या वतीने! झटपट पक्षांतराचे कुणालाच सोयरसुतक वाटेनासे झाले, ही भारतीय राजकारणाची शोकान्तिका आहे.
राजकारण्यांच्या पक्षांतरावर जनतेचा अंकुश का नाही? असा प्रश्‍न सहज पडतो. मात्र, लोकांकडूनही त्यांच्या जीवनात अनेक पक्षांतरे घडतात. मुलीच्या लग्नाच्या वेळी नको वाटणारा हुंडा मुलाच्या लग्नाच्या वेळी, परंपरेचे पालन करण्याच्या नावाखाली स्वीकारला जातो. सरकारने काळा पैसा शोधावा, असा आग्रह धरणारे अनेक जण सरकारी कर भरण्याचे टाळत असतात. सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता सर्रास खोटी कागदपत्रे तयार करून लाभ घेणारे कितीतरी आहेत.
लोकांना त्यांचा प्रतिनिधी प्रामाणिक पाहिजे असतो, पण त्याकरिता स्वत: प्रामाणिक राहण्याची त्यांना गरज वाटत नाही. ‘शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याचा विसर अनेकांना पडत चालला आहे व निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या पक्षांतराचे मूळ समाजाच्या नीतिविषयीच्या या अनास्थेत दडले आहे. कलियुगातील या मानसिकतेचे यथार्थ वर्णन करताना एक संत म्हणतात-
जन सर्व होती ईर्ष्येनी पीडित
कराया फजीत एकमेका|
आपुली फजिती होता दु:ख मोठे
दुसर्‍याचे वाटे जाती सदा॥
आज मोठी गरज आहे ती नीतिपालनाची. मतदानाचा हक्क बजावणे हा नीतीचाच भाग आहे. असभ्य राजकारणी जन्माला येत नसतात, तर सभ्य मतदार मतदान न करता त्यांना जन्माला घालतात, असे म्हटले जाते. शेवटी खरे एवढेच आहे की, जसे लोक आहेत तसे राज्यकर्ते त्यांना भेटतात!
हेमंत पुरुषोत्तम कद्रे,९४२२२१५३४३