निष्ठेचा बाजार!

0
222

इतके पक्ष फिरून आलो पण कुठे म्हणून निष्ठा बघायला मिळाली नाही…! एक नेता दुसर्‍याला सांगत होता. प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार मनोहर सप्रे यांच्या एका व्यंग्यचित्रातले एक बोलके विधान… पोटभरून हसायला लावणारे… अन् अंतर्मुख होऊ विचार करायलाही. राजकारणात किती वेगाने बदल घडताहेत बघा! कालपर्यंत श्रद्धेने जोपासलेल्या निष्ठा त्यांनी, सापाने कात टाकावी इतक्या सहजतेने टाकून दिल्या आणि नवीन वस्त्रे धारण करण्याइतक्या सहजतेने, त्यांना न पटणार्‍या विचारांची झूल पांघरायलाही ते सज्ज झाले. आम पब्लिकशी इथे तसेही कुणाला काय घेणेदेणे? पक्षातून त्यांनी बाहेर काढले, यांनी आत घेतले. विषय संपला. सामान्य लोकांचा काय संबंध? त्यांनी आपलं मुकाट्यानं चिन्ह पाहून मतदान करायचं. कालपर्यंत त्यानं आपले विचार पायदळी तुडविण्याची भाषा वापरली होती, आपण ज्यांना मानतो ती माणसंही त्याला त्यावेळी तुच्छ वाटली होती, हे क्षणात विसरायचं. त्यानं स्वत:च ते विसरण्याचं धाडस दाखवलंय् म्हटल्यावर आपण कोण बापुडे त्यावर आक्षेप घेणार?
सध्याच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाऽऽर मुंबईपासून नागपूरपर्यंत अन् इथपासून तिथपर्यंत हेच चित्र बघायला मिळते आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष, विचार अन् निष्ठा बदलणार्‍यांची वाढलेली गर्दी सर्वसामान्यांमध्ये संताप निर्माण करणारी ठरते आहे. लोक अशा उमेदवारांबाबत त्वेषाने बोलताहेत. बरं, एखाद्या राजकीय पक्षात वर्षानुवर्षे समर्पित भावनेने काम करणार्‍यांच्या तुलनेत अशा ‘काल आलेल्या’ लोकांना सहजतेने मिळणारी उमेदवारी, नाही म्हटलं तरी आश्‍चर्याचा अन् संतापाचाही विषय ठरतो आहे. कालपर्यंत ज्या कुठल्या विचारांची धुरा खांद्यावर वाहिली, ती क्षणात धुडकावून लावण्याची त्यांनी सिद्ध केलेली कला वाखाणण्याजोगीच! ज्या नेत्यांचे गुणगान करताना कालपर्यंत जिव्हार थकत नव्हते, ते तमाम नेते अचानक शत्रूंच्या खेम्यात जमा व्हावेत यांच्या लेखी? कॉंग्रेसने तिकीट नाही दिले तर भाजपाच्या दारात, भाजपाने नाही दिले तर शिवसेनेच्या अंगणात… असे करताना ना कालवर जोपासलेला गांधींचा विचार आडवा येत, ना बाळासाहेबांचा करारी बाणा. ना दीनदयालजींच्या विचारांवरील श्रद्धेचा अडसर होत, ना मार्क्सच्या विचारांवरील ठाम विश्‍वासाचा… प्रत्येकाच्या व्यक्तिगत, राजकीय स्वार्थापुढे इतर सार्‍याच बाबी कवडीमोलाच्या ठरताहेत. वर कहर म्हणजे, जनतेच्याही लेखी त्याचे फारसे महत्त्व राहू नये, अशी अपेक्षा असते त्यांची!
मानाची, लाभाची सारी पदं चढत्या भाजणीने आपल्याच पदरी पडावीत यासाठी सारा अट्टहास चाललेला असतो इथे प्रत्येकाचा. निवडणूक लढविण्याची संधी हा तर त्या त्या पातळीवरचा सर्वोच्च बिंदू. संधी ग्राम पंचायतीची असो की मग विधानसभेची, ती आपल्यालाच मिळाली पाहिजे. आपल्याला उमेदवारी देणे हे पक्षाचे कर्तव्य अन् जनतेची गरज असल्याचीच प्रत्येकाची भावना झाली असल्याने, उमेदवारीची संधी
नाकारली जाणे म्हणजे तर जणू संपूर्ण मानवी समूहावरचाच अन्याय असतो त्यांच्या दृष्टीने. मग या कथित अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या बंडात संपूर्ण जगाने ठामपणे पाठीशी उभे राहावे असा आग्रह असतो त्यांचा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने, सोयीने, बदललेल्या मार्गाने इतरांनीही गुमान चालत यावे, अशी अपेक्षा असते त्यांची. कालपर्यंत ज्यांच्या पखाली वाहिल्या, त्यांना आज छातीठोकपणे शिवीगाळ करणे अन् कालपर्यंत ज्यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्या चरणी सार्‍या निष्ठा अर्पण करायला सरसावणे, अगदीच सरावाचा असल्यागत हा बदल बेमालूमपणे स्वीकारण्याची कसरत… सारेच अजब आहे. पण राजकारणात वावरणार्‍यांकडे बघितल्यावर, ही कसरत त्यांच्यासाठी फार जिकिरीची असल्याचे जराही जाणवत नाही कुठे!
बरं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचंही बरं आहे. त्यांची कवाडं तर कायम खुली असतात. ज्याला जायचं त्याच्यासाठी अन् ज्याला यायचं त्याच्यासाठीही. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा… या उघड्या कवाडांचा उपयोग बाहेरून येणारेच अधिक करतात बहुतांशी. निवडणूक जिंकणे एवढा एकच उद्देश असल्याने कुणाच्या येण्या-जाण्याचे फारसे वावडे नसतेच इथे कुणाला. बरं, निष्ठा, विचारधारा वगैरे सबकुछ बकवास असते. निवडणुकीतल्या तिकिटांसाठीच असतो बहुतेकदा हा इकडून तिकडचा प्रवास. आताशा अशा ‘प्रवाशी’ कार्यकर्त्यांसाठी काही जागा आरक्षितच असतात सर्वच राजकीय पक्षांत. त्यामुळे पक्षप्रवेश झाला रे झाला की उमेदवारी तयारच असते त्यांच्यासाठी. कित्येकदा तर तेवढ्यासाठीच असतो सारा खटाटोप. पक्ष कोणता, विचारधारा कोणती, याहीपेक्षा सध्या चलती कुणाची अन् उमेदवारी कोण देतो, एवढाच काय तो लक्षात घेण्याजोगा मुद्दा असतो निवडणुकीच्या या हंगामात. समर्पणाच्या भावनेतून वर्षानुवर्षे निष्ठा जपत कार्य करीत राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना मात्र पायदळी तुडविल्या जातात, या वावटळीत. त्यामुळे ‘घरच्यांची’ वाट लावून असल्या उपर्‍या संधिसाधूंसाठी दारं किलकिली करायची की सताड उघडी ठेवायची, याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे प्रत्येकच राजकीय पक्षाच्या नेतृत्वावर.
खरं तर दोष जनतेचाही तेवढाच आहे. इथे लोक, केले तर एखाद्या पक्षावर वा नेत्यावर एवढे जिवापाड प्रेम करतात की मग त्याच्या संदर्भातले जनतेचे सारेच निर्णय डोळे झाकून होतात. आंध्रप्रदेशातील नरसिंहराव रामटेकमधून अन् काश्मिरातले गुलामनबी आझाद दूरवरच्या वाशीममधून निवडून येण्याचे कारण लोकांच्या ‘या’ भूमिकेतच दडलेले असते. अगदी गाढव उभे केले तर तेही पक्षाच्या तिकिटावर हमखास निवडून येईल, ही कॉंग्रेसनेत्यांच्या तोंडी आलेली एकेकाळची मुजोरीची भाषा लोकांच्या त्या भाबडेपणाचा परिपाक असते. अशी भाषा एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवणे हा खरं तर मतदारांचा, त्यांच्या निर्णयाधिकाराचा अवमानच. पण जिथे मतदारांनाच त्यांच्या मतांची किंमत कळत नाही, तिथे राजकारणात वावरणार्‍यांनी लोकांना गृहीत धरणे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत लोकांची, केवळ मतदान करण्याची मर्यादित भूमिका अपेक्षित नाही. मतदार अधिक प्रगल्भ झाला पाहिजे. मतदान करताना विचार करून निर्णय घेण्याची सवय त्याला लागली पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत माध्यम जगतापासून, तर पुढारलेल्या म्हणवणार्‍या तमामजनांचे सर्व अंदाज मोडीत काढून लोकांनी डोनल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली अन् हिलेरी क्लिटंनच्या डोळ्यात पाणी आणले. त्याच ट्रम्पच्या, स्वत:च्या मुलीच्या व्यवसायात साह्यभूत ठरण्याच्या भूमिकेच्या विरोधात तीच जनता तेवढ्याच त्वेषाने सरसावली. ही प्रगल्भता आहे. अशा वर्तणुकीची अपेक्षा करता येईल भारतीय मतदारांकडून कधीतरी? ज्या दिवशी ही प्रगल्भता इथल्या मतदारांच्या अंगी येईल, त्या दिवशी त्याला गृहीत धरून चाललेला, निवडणुकीच्या तोंडावरचा हा निष्ठेचा बाजारही थांबेल. जनसेवेचा वसा घेतल्याचा देखावा निर्माण करून सत्तेच्या व्यवस्थेत शिरण्यासाठी पहाटे कॉंग्रेस, सकाळी राष्ट्रवादी, दुपारी भाजपा, सायंकाळी शिवसेना अशा अनाकलनीय प्रवासाची धडपड निलाजरेपणाने करणार्‍यांना थोपवून धरण्याची गरज कुठल्याच राजकीय पक्षाला वाटत नसेल, तर त्यांना थारा न देण्याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे. याने मांडला काय, किंवा त्याने मांडला काय, शेवटी हा बाजार तर लयाला चाललेल्या निष्ठेचाच आहे. तो मोडीत काढण्याची जबाबदारीही सरतेशेवटी प्रगल्भ मतदार‘राजा’ची आहे…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३