उत्तरप्रदेशात ६४ टक्के मतदान •पहिला टप्पा शांततेत •बागपत, मेरठमध्ये किरकोळ हिंसा

0
213

वृत्तसंस्था
लखनौ, ११ फेबु्रवारी
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी १५ जिल्ह्यांतील ७३ जागांसाठी शांततेत ६४.२ टक्के मतदान झाले. बागपत आणि मेरठ येथे हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता इतरत्र कुठेही अप्रिय घटना घडली नाही. या टप्प्यात ८३९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
या टप्प्यात श्यामली, मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, गौतमबुद्धनगर, हापूड, बुलंदशहर, अलिगड, मथुरा, आग्रा, हाथरस, फिरोजाबाद, एटा आणि कासगंज या जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश होता. मतदान शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
बागपत येथील एका मतदानकेंद्रावर एका गटाने दुसर्‍या गटातील सदस्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यात संघर्ष झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात किमान १० जण जखमी झाले. पहिल्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकजसिंह (नोएडा), भाजपा खासदार हुकुमसिंह यांची मुलगी मृगांका (कैराना), भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रदीप माथुर (मथुरा), भाजपाचे आमदार संगीत सोम (सरधना) आणि सुरेश राणा (थानाभवन), प्रदेश भाजपाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी (मेरठ), राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंग यांचा नातू संदीपसिंह (अतरोली), तर लालुप्रसाद यादव यांचे जावई राहुलसिंह (सिकंदराबाद) यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.