रविवारची पत्रे

0
118

राहुलबाबाचा फाटका कुर्ता
युवानेते, कॉंग्रेस उपाध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत फाटका कुर्ता दाखविला. फाटला होता की, फाडला हा प्रश्‍नच आहे. या कृतीला हसावे, चिडावे की मर्कटचेष्टा म्हणून सोडून द्यावे, हेच कळत नाही. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जीवनात बदल म्हणून ते दरवर्षी परदेशी जातात. त्यांनी तेथे फाटका खिसा दाखवावा. भारतात कितीतरी लोक आहे जे रात्री कपडे धुवून सकाळी तेच कपडे घालून कामावर जातात. परंतु गरिबीचे प्रदर्शन करीत नाहीत. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही आमची संस्कृती आहे. आमचे पुतणे भारतात राहातात. आमच्या देशांतील राजकारणात भाग घेतात, येथील लोकांविषयी प्रेम दाखवितात. परंतु आमची संस्कृती नाही शिकले. ते खासदार आहेत. त्यांना मानधन मिळत असेल, त्याचे काय करता ते प्रथम सांगा. जाऊबाईंना (सोनिया गांधी) खिसा शिवायला वेळ नसेल. मला सांगायचे गांधी घराण्याची शान खादीचे शर्ट पाठविले असते. स्विस बँकेत खाते नाही, परंतु स्टेट बँकेत आहे. राहुल गांधी मोदीवर टीका केली. रामलीलामध्ये रामाच्या ऐवजी मोदींचा मुखवटा घालतील. तुमच्या तोंडात साखर पडो, कारण रामराज्याप्रमाणे भारतात मोदींना राज्य आणायचे आहे. फाटका कुर्ता दाखवून प्रेम, मत, सहानुभूती मिळत नाही. भक्कम ठोस कार्य करा. जेणेकरून फाटके कपडे दाखविण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. आपोआप कुर्त्यांचे ढीग लागतील.
निर्मला गांधी, ९४२१७८०२९०
चित्र आणि विचार
आजकाल दिवंगत नेत्यांच्या चित्रावरून लोकांच्या भावना फारच अनावर होत चालल्या आहेत. मात्र, त्या व्यक्तीने दिलेल्या विचारांची कोणालाही दखल घ्यावीशी वाटत नाही. चित्र आणि पुतळे हे विचारांचे दफन करण्याचे साधन बनले आहे. त्या व्यक्तीने दिलेल्या विचारानुसार समाज चालला आहे किंवा नाही, नसेल तर त्याला त्या विचारांचे महत्त्व पटवून देण्यास कोणालाही सवड नाही. मात्र, फोटो किंवा पुतळे उभारून त्या व्यक्तीबद्दल किती आदर आहे हे दाखविण्याचा विसर पडत नाही. ध्येयवेड्या व्यक्तींचे विचार अमलात आणणे कष्टप्रद असते. त्यापेक्षा फोटो किंवा पुतळा बरा. वर्षातून एकदा जयंतीला आणि एकदा पुण्यतिथीला त्या व्यक्तीचे स्मरण केले की त्यांचे अनुयायी म्हणून मिरविण्यास मोकळीक.
सध्या कॉंग्रेसजनांना महात्मा गांधींचा फारच पुळका आलेला दिसतो आहे. वास्तविक पाहता कॉंग्रेसने त्या माहात्म्याने दिलेल्या विचारांकडे पाठ फिरविली आहे. खेड्याचा विकास व शेतीसंवर्धन याबाबतीत त्यांनी सांगितलेल्या विचाराकडे ६० वर्षे सत्ता हाती असूनही दुर्लक्ष केले. खेड्यांचा विकास तर सोडाच पण ती भकास करून ठेवली. साधे दारूचेच उदाहरण घेतल्यास ९० टक्के दारूच्या दुकानांचे परवाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडेच आहेत. त्यांच्या, स्वत:ला प्रति शिवाजी समजणार्‍या नेत्याने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात साखर कारखान्यांना दारू उत्पादनाचे परवाने देऊन अख्खा महाराष्ट्र दारूमय करून टाकला. महात्मा गांधींनी कॉंग्रेसजनांना दारू उत्पादनाचा सल्ला दिला होता काय? १०-१२ वर्षांची ग्रामीण भागातील पोरे दारूच्या अधीन झाली आहेत. कॉंग्रेसजनांनी जरा इकडेही वळून पाहावे म्हणजे आपण काय करतो आहोत, केले आहे हे त्यांच्या लक्षात येईल.
औद्योगिकीकरणाच्या वेडापायी कुटिर उद्योग व शेती व्यवसाय याच लोकांनी उद्ध्वस्त केला. महात्माजींनी हाच संदेश दिला होता काय? दलित नेत्यांनाही आपल्या महान नेत्याबद्दल खूपच आदर. पण त्यांनी सांगितलेला विचार स्वीकारण्याची त्यांना गरज वाटत नाही. प्रत्येक जण आपापल्या जातीच्या पुढार्‍यांचे चित्र किंवा पुतळे घेऊन मिरवत असतात. प्रत्येक व्यक्तीला इतर समाजाच्या व्यक्तीच्या चित्राची किंवा पुतळ्याची भीती किंवा द्वेष वाटावयास लागला आहे. त्या चित्राचा किंवा पुतळ्याचा वापर कोण आणि कसा करेल याचा भरवसाच राहिला नाही.
आपल्या देशात जन्माला आलेल्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या संतांनी कर्मवादाला धर्माचा आधार घेऊन बळ दिले. श्रीकृष्णाने गीतेतून कर्मवाद सांगितला. आपण करतो ते काम ईश्‍वरी कार्य आहे असे समजून करावे, ही शिकवण दिली. मात्र, जनता व नेते त्यांचे विचार सोडून प्रतिमेचे पूजन करीत बसले. प्रतिमा निश्‍चितच आदरणीय असते पण ती विचारांमुळेच. त्या व्यक्तीचे विचार स्वीकारले तर प्रतिमा आपोआपच जपली जाते. त्यासाठी त्या व्यक्तीला चौथर्‍यावर बसविण्याची गरज नसावी.
जयंत बापट,९४२१७७५६१६
होय, ‘सलमान खान निर्दोषच!’
१८ वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी व बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या आरोपातून सलमानची मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. याबद्दल सलमानचे नव्हे तर न्यायालयाचे खर्‍या अर्थाने अभिनंदन करावे लागेल. कारण आपल्या देशात न्याय, न्यायालये हे दोषी लोकांना निर्दोष मानून बिनदिक्कतपणे पुराव्याचा अभाव या ‘गोंडस’ नावाखाली सोडून देण्यातच खरा न्याय असल्याचे मानतात. भारतातील न्यायालये हे गर्भश्रीमंतांना आणि गुन्हेगारांच्या पाठीशी सदैव उभे असते, असेच या निकालाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते.
फुटपाथवरती झोपलेल्या निष्पाप गरीब लोकांचा बळी घेणारा हाच तो सलमान न्यायालयाला निर्दोष वाटला. केवळ अमाप संपत्ती व धनाढ्य लोकांना या देशातील कायद्याने कुठल्याही प्रकारचे गुन्हे करण्यास मुभा दिली आहे काय, असाच प्रश्‍न या निमित्ताने निर्माण होतो. भारतीय न्यायप्रणाली अत्यंत ढिसाळ, कायद्याचा वचक नसणारी, अनेक पळवाटा स्वत:च दाखविणारी असून यामुळे आपल्या देशात गुन्हेगारांवर वचक राहिला नसून सर्वच क्षेत्रांत सर्वच स्तरावर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे.
असं म्हणतात की, ‘न्यायाला विलंब करणे म्हणजेच न्याय नाकारणे होय.’ आणि हेच आपल्याकडे न्यायालयाकडून सतत घडते. आपल्या देशात भ्रष्टाचार, बलात्कार, खून, दरोडा यासारखे गुन्हे रोज घडत असतात. अशा गुन्ह्यांसंदर्भात पोलिस यंत्रणा आपल्या कर्तबगारीने गुन्हेगारांना पकडतात आणि न्यायालय अशा गुन्हेगारांना सबळ पुराव्याअभावी मुक्त करतात.
सलमान खान हे तर एक निमित्त झाले. आजपर्यंत आपल्या देशात प्रचंड घोटाळे उघड झाले आहेत. डोक्याला झिंग, अंगावर शहारे आणणारे, चीड निर्माण करणारे बलात्कार प्रकरण तर सतत घडत असतात. अशा प्रकरणात किती नराधमांना शिक्षा झाली आणि किती काळानंतर हे न्यायालयानेच सांगावे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर हेच गुन्हेगार पुन्हा उजळ माथ्याने समाजात असतात आणि आमचा तरुण वर्गही अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आपला ‘आयडॉल’ मानून त्यांचे अनुकरण करतात.
तथाकथित प्रतिष्ठित, धनाढ्य लोक कायदा हाती घेऊन संपूर्ण यंत्रणेला आपल्या खिशात ठेवतात का? हा या निमित्ताने प्रश्‍न निर्माण होतो आणि मग न्यायालयच अशा प्रकारे डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देत असेल, तर नक्कीच म्हणावे लागेल, ‘होय, सलमान खान निर्दोषच.’
प्रा. किशोर रा. बुरंगे,८६००५८६८८७
वेदांतीचे ज्युडो खेळात यश
२ फेब्रु.ला तभात कु. वेदांती दळवीला ज्युडो स्पर्धेत दोन पदके, ही बातमी वाचली. खरोखरच धन्यता वाटली. आजकाल प्रत्येक खेळामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना खेळासाठी वेळच नाही, अशी पालकांची ओरड असते. सतत शिकवणी वर्गाची घाईगर्दी. अशा वातावरणामध्ये आमच्या रवींद्रनगरमधील कु. वेदांती दळवी हिने नॅशनल सी. बी. एस. सी. ज्युडो स्पर्धेत ब्रॉंझ मेडल पटकाविले, एवढेच नव्हे तर राज्य शालेय ज्युडो स्पर्धेत २७ किलो वजन गटात रौप्य पदक सुद्धा मिळविले, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आजकाल विद्यार्थ्यांचा कल क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस यासारख्या नावाजलेल्या खेळांकडे आहे. परंतु त्यात इतकी स्पर्धा आहे की आपला वैदर्भीयांचा टिकाव लागणे अवघड असते. परंतु कबड्डी, खोखो, ज्युडो, ऍथलेटिक्स यासारख्या मैदानी खेळात आपण मेहनत करून पदक मिळवू शकतो. वेदांती दळवीने रवींद्रनगरस्थित रवींद्र सभागृहात ज्युडोचे क्लासेस लावले होते, परंतु कालांतराने ते क्लासेस दुसरीकडे दूर शिफ्ट झाले तरी ती नियमितपणे सरावासाठी जात होती. त्या यशात आई-वडील व आजी-आजोबा यांची प्रेरणा होतीच व प्रोत्साहनही होते. क्लासेसला नेऊन देणे, प्रॅक्टिसपर्यंत थांबणे हे कामही फार मोलाचे होते. ती जबाबदारी तिची आई स्वत: सांभाळते. वडील प्राध्यापक असल्यामुळे सतत व्यस्त असतात. तरी सुद्धा तिला बाहेरगावी मॅचेससाठी नेणे-आणणे या गोष्टी ते स्वत: करतात. कु. वेदांतीला व तिचे आई-बाबा, आजी-आजोबा व शिक्षकांना रवींद्रनगरवासीयांकडून हार्दिक शुभेच्छा.
सुनील बोक्षे, ७५८८१७७४६२