ट्विटरच्या साम्राज्यवादी गुलामीविरुद्ध एल्गार!

0
132

जर आपल्याला कळले की, ज्या घरात आपण राहात आहात तेथील घरमालकाने आपल्याला कुठलीही नोटीस न देता अथवा बाजू मांडण्याची संधी न देता पाच मिनिटांतच घराबाहेर काढले तर आपल्याला कसे वाटेल? सामाजिक माध्यमांत आम्ही ज्या फेसबुक अथवा ट्विटरचा उपयोग करतो अथवा जी-मेल आणि याहूसारख्या विदेशी कंपन्यांच्या आंतरजालाचा आपल्या व्यक्तिगत डाटासाठी उपयोग करतो अगदी तसेच आपल्याबाबतही घडू शकते. तालिबानी आणि पंतप्रधान मोदींवर असंस्कृत, वाईट आणि अतिशय खालच्या पातळीवर टिप्पणी करणार्‍यांविरुद्ध ज्या ट्विटर युझर्सनी मोहीम हाती घेतली होती अथवा त्यांचा सामना केला होता त्या युझर्सची या देशभक्तीच्या गुन्ह्याबद्दल ट्विटरने हकालपट्टी केली. अर्थात त्यांचे ट्विटर अकाऊंट निरस्त करून टाकले. या मुद्यावरून ट्विटरवर मोठा वाद सुरू आहे आणि भारतात ट्विटर कंपनीचे जे लोक संचालन करीत आहेत त्यांचा हेतू आणि वैचारिक पूर्वग्रहाविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.
पंतप्रधान मोदींनी सरकार स्थापन केल्यानंतर त्यांचे वैचारिक विरोधक शांत बसलेले नाहीत. त्यांनी जागोजागी आपली आघाडी उघडली आहे आणि क्षुल्लक गोष्टींचा, राईचा पर्वत बनविण्याचे उद्योग सुरू आहेत. लहान गोष्टीला मोठे करून त्याचा वापर करणे अथवा घटनांच्या निष्कर्षांना आपल्या सोयीप्रमाणे वाकवून जातीयवादाचे, द्वेषाचे रूप देणे आणि खोट्या अथवा बोगस नावाने ट्विटर अकाऊंट सुरू करून शिवीगाळ अथवा अतिशय आक्षेपार्ह भाषेत प्रहार करणे आता मीडिया युद्धाचा एक भाग बनला आहे. यात केवळ एकाच रंगाचे लोक सामील आहेत. ज्यांना राग येतो त्यांना कुठलाही तर्कशुद्ध युक्तिवाद करता येत नसल्याने अथवा सत्य माहीत नसल्याने ते सामाजिक माध्यमांवर शिवीगाळीवर उतरत आहेत.
या घटनांविरुद्ध दाद मागण्याची भारतीय दंडसंहितेत तरतूद आहे. मात्र, सायबर सुरक्षा अथवा सायबर क्राईमसंबंधी नियम एवढे अस्पष्ट, ढिसाळ आणि प्रभावशून्य आहेत की, जर आपण लोकप्रिय अथवा मोठे नेते नसाल आणि केवळ साधारण व्यक्ती असाल, तर आपल्याला कुठलेही सुरक्षाकवच मिळत नाही. ट्विटर आणि फेसबुकचे पीडित आणि त्रस्त खातेधारक शिवीगाळ करणार्‍या आणि अश्‍लील, आक्षेपार्ह भाषा वापरणार्‍याला जास्तीत जास्त ब्लॉक करू शकतात अथवा त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकतात. मात्र, विदेशी एजन्सीचे जे भारतीय अधिकारी तथा कर्मचारी आहेत ते भारतीयांविषयी सहानुभूती, संवेदनशील वृत्ती बाळगण्याऐवजी आपल्या विदेशी मालकांची धोरणेच अधिक राबवितात. आमच्या येथील लोकांविषयी त्यांना मुळीच सहानुभूती नसते.
याचे सुरक्षाविषयक मापदंडही आहेत. गूगल, याहू तथा ट्विटरसारख्या विदेशी कंपन्या भारतीय सुरक्षा संस्थांना आपला डाटा दाखविण्याची परवानगी फार कमी वेळा देतात आणि ती परवानगी मिळण्यासाठीही या सुरक्षा संस्थांना खूप खटाटोप करावा लागतो. या विदेशी कंपन्यांकडून भारतीयांचा जो डाटा गोळा करण्यात येतो ती मूलत: भारतीयांची संपत्ती आहे, जी भारतात एकत्रित करण्यात आली आहे. मात्र, त्यावर भारतीय सुरक्षा एजन्सी अथवा भारत सरकारची कुठलीही मालकी नसते. एवढेच नव्हे, तर त्यात हस्तक्षेप करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नसतो.
या कारणामुळेच संवेदनशील पदांवर कार्यरत नेते, अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून विदेशी एजन्सींची ई-मेल सेवा अथवा सोशल मीडियाचा वापर करण्यामुळे जो डाटा निर्मित होतो, तो या विदेशी कंपन्या आपल्या मूळ देशांच्या सरकारला उपलब्ध करून देऊ शकतात आणि असे प्रत्यक्षातही घडले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सल्लागारांच्या आदेशावरून त्यांना अशा प्रकारे डाटा उपलब्ध करून देण्यात आला होता, ही बाब गूगल आणि याहू यांनी मान्यदेखील केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे या दोन कंपन्यांविरुद्ध जगभरातील अनेक देशांमध्ये हजारो खटले दाखल करण्यात आले आहेत.
भारतात जवळजवळ अडीच कोटी नागरिक ट्विटर आणि सात कोटी नागरिक फेसबुकचा वापर करतात. आपली व्यक्तिगत, सार्वजनिक आणि जी मनात येईल ती माहिती आणि संवादासाठी या साईट्‌सचा उपयोग होतो. फोटो शेअर केले जातात अथवा आपल्या मनाचा कल, भावना मोकळेपणे व्यक्त केल्या जातात. साधारणपणे या एजन्सीपैकी कुणीही या प्रकारच्या व्यवहारात हस्तक्षेप करीत नाही. मात्र, या एजन्सीजचे भारतीय नियंत्रक विदेशी कंपन्यांचीच आज्ञा पाळतात, ही वस्तुस्थिती आहे. ते सर्व इंग्रजी आणि इंग्रजाळलेल्या संस्कृतीत, त्यांच्या रंगात एवढे रंगून गेले आहेत की, त्यांच्यादृष्टीने भारत तथा भारतीयत्व आणि आपल्या संस्कृतीचे पालन करण्याचा आग्रह धरणारे सांप्रदायिक आणि सेक्युलरविरोधी मानले जातात. त्यांच्याकडे (या भारतीयांकडे) या संस्था आणि त्यांचे भारतीय नियंत्रक पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहतात.
भारतीय देशभक्तांच्या तिखट व रोखठोक ट्विटस्‌बद्दल त्यांचे खाते रद्द करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध शिवीगाळ करणार्‍या व अतिशय गलिच्छ आणि ओंगळवाणी भाषा वापरणार्‍यांचे ट्विटर अकाऊंट्‌स का रद्द करण्यात येत नाहीत, असा रोकडा सवाल कर्नाटकचे खासदार आणि माझे मित्र, लेखक प्रताप सिम्हा यांनी ट्विटरला विचारले. मात्र, अद्याप ट्विटर इंडियाने याचे उत्तर दिलेले नाही!
सामाजिक संवादाचे संयमित आणि शालीन व्यासपीठ बनावे यासाठीच ट्विटर आणि फेसबुक सुरू करण्यात आले. पण, ज्याप्रमाणे सुंदर शहरात गटारही असते त्याप्रमाणेच यावर वैचारिक आणि संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे. दहशतवाद आणि दंगली भडकविण्यासाठीही या सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा उपयोग करण्यात येत आहे.
भारताच्या संदर्भात या धोकादायक प्रवृत्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिक भारताचे, डाटा भारताचा, ठिकाण, पैसा व ऊर्जा भारताची, उत्पन्नही भारतीयांच्या कमाईचे, एवढे सगळे असूनही भारताचे या सामाजिक पोर्टलवर तसेच मीडिया एजन्सीवर तसूभरही नियंत्रण नाही. याच कारणामुळे चीनने आपले सामाजिक पोर्टल चीनच्याच स्वदेशी एजन्सींद्वारे प्रथम सुरू केले आणि आज त्यांच्या संस्थांचा ट्विटर आणि फेसबुकपेक्षाही कितीतरी अधिक विस्तार झाला आहे आणि त्या अधिकाधिक प्रभावशाली ठरत आहेत. तेथे आजही ट्विटर, फेसबुक आणि गूगलवर बंदी आहे. ते (फेसबुक, ट्विटर) लोक चीनच्या नावाने बोंबा ठोकत आहेत, मात्र आमच्या दृष्टीने राष्ट्रहित सर्वोच्च असल्याचे चीनने त्यांना ठणकावून सांगितले आहे. भारतानेही आपल्या अशा स्वदेशी सामाजिक मीडिया मंच म्हणजे स्वदेशी ट्विटर, फेसबुक आणि गूगलची निर्मिती करून स्वदेशी डाटा स्वदेशात ठेवण्याचे सुनिश्‍चित करून विदेशी संस्थांच्या नियंत्रणातून मुक्त व्हायला नको काय?

तरुण विजय