साप्ताहिक राशिभविष्य

0
733

रविवार, १२ ते १८ फेब्रुवारी २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार,१३ फेब्रुवारी- संत नरहरी सोनार पुण्यतिथी- त्र्यंबकेश्‍वर, श्री लोकनाथ स्वामी महाराज पुण्यतिथी- वाराणसी; •मंगळवार, १४ फेब्रुवारी- संकष्ट चतुर्थी- अंगारक योग (चंद्रोदय रात्री ९.२७ वाजता); •बुधवार, १५ फेब्रुवारी- श्री बिरबलनाथ महाराज यात्रा- मंगरूळनाथ (वाशिम); •गुरुवार, १६ फेब्रुवारी- पंचमी वृद्धितिथी; •शुक्रवार, १७ फेब्रुवारी- दत्त महाराज कविश्‍वर जयंती; •शनिवार, १८ फेब्रुवारी- कालाष्टमी, मीनायन, वसंत ऋतू प्रारंभ, श्री गजानन महाराज प्रगटदिन- शेगाव.

मुहूर्त- साखरपुडा- १६ फेब्रुवारी; बारसे- १४ फेब्रुवारी,१६ फेब्रुवारी; जावळे- १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी; गृहप्रवेश- १६ फेब्रुवारी.

मेष : हितशत्रंचा उपद्रव वाढणार
या आठवड्यातील प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी मंगळ व्ययस्थानात शुक्रासोबत आहे. या दोघांवरही गुरुची शुभ दृष्टी आहे. शनि भाग्यात आहे.फक्त रवि स्तानांतर करून लाभात येणार आहे. चंद्र पंचम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर अष्टम स्थानात येईल. संततीकडून अपेक्षाभंगाची स्थिती निर्माण होतेय. आर्थिक वा वारशाच्या मुद्यावरून भावंडात वितुष्ट निर्माण होण्याचे अनुभव काहींना मिळू शकतात. व्यवसाय, नोकरीत वातावरण काहीसे बिघडलेलेच राहील. विरोधक व हितशत्रुंचा उपद्रव वाढलेला असेल. व्ययातील मंगळ स्वस्थ्यहानी करणारा आहे. आपणांस या काळात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शुभ दिनांक- १२,१३,१६.
वृषभ : अचानक मोठे खर्च
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी शुक्र लाभ स्थानात मंगळासोबत आहे. येथे शुक्र उच्च स्थितीत आहे. योगकारक शनि अष्टमात आहे. गुरु शुक्राला पहात आहे. चंद्र या आठवड्यात सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो सप्तम स्थानात येईल. आपली आवक-जावक फारशी ताळमेळ राखणारी नसेल. खर्चाला अनेक वाटा फुटलेल्या असतील. आर्थिक फसवणूक, अचानक मोठे खर्च, कुटुंबातील एखाद्याचे हॉस्पिटलायझेशन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविच्या राश्यंतरानंतर काहीसा दिलासा निश्‍चित मिळेल.
शुभ दिनांक- १४,१५,१८.
मिथून : आरोग्यास धोकादर्शक इशारे
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी बुध अष्टमस्थानात आहे.शनि सप्तमात आहे. दशमात मंगळ-शुक्र गुरुच्या कृपादृष्टीत आहेत. चंद्र पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो षष्ठ स्थानात जाईल. सरकारी कामें, कोर्टाच्या कामात मोठा खर्च करावा लागू शकतो. काहींना लांबच्या प्रवासाचे योग आहेत. राशीस्वामी अष्टमात असल्याने प्रकृतीविषयक काही तक्रारी उद्भवू शकतात. काही आजारपणांची सुरुवात होण्याचे धोकादर्शक इशारे मिळू शकतात, त्यामुळे या काळात प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. जोडीदाराच्या प्रकृतीचीही चिंता राहील. शुभ दिनांक- १२,१६,१७.
कर्क : दबदबा निर्माण व्हावा
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी धन स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत असून तो आठवडा अखेर पंचम स्थानात येईल. याशिवाय या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. शनि षष्ठात आहे. भाग्यात मंगळ व शुक्र विराजमान असून त्यांच्यावर गुरुची शुभकारक दृष्टी आहे. या आठवड्यातील स्थिती आपल्याला अधिकच उत्साहवर्धक राहील. नोकरी व्यवसायातील रेंगाळलेल्या कामांना आता गति मिळेल. आपला दबदबा निर्माण होण्यास मदत होईल. कुटुंबातील, समाजातील दर्जा उंचावेल. दरम्यान काहींना मात्र शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याचे भय राहील. शुभ दिनांक- १३,१६,१७.
सिंह : सहकार्‍यांपासून मनस्ताप
आपला राशीस्वामी रवि या आठवड्याच्या सुरुवातीसच रास्यंतर करीत असून तो रविवारीच सप्तम सप्तमातील कुंभ राशीत जात आहे. याशिवाय राशीस्थानी राहू, धनस्थानात गुरु, शनि पंचमस्थानात तर, मंगळ व शुक्र अष्टम स्थानात आहेत. त्यांच्यावर गुरुची दृष्टी आहे. चंद्र आपल्याच राशीतून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो सुखस्थानी येईल. विरोधकांचा उपद्रव, कमालीची स्पर्धा, हाताखालच्या सहकार्‍यांपासून मनस्ताप असे वातावरण निर्माण झाले असावे. प्रवास, भ्रमंती, तीर्थाटन यांसाठी र्ेंार उपयुक्त स्थिती आहे. कलावंत व साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंना आर्थिक लाभ व्हावा. आपल्या संततीच्या आर्थिक उन्नतीसाठीही उत्तम योग आहेत.
शुभ दिनांक- १२,१३,१४.
कन्या : सतर्कतेचे धोरण हवे
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी बुध पंचमस्थानात, सप्तमात शुक्र-मंगळ, सुखस्थानात शनि व राशीस्थानात गुरु आहे. चंद्र व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो पराक्रम स्थानात जाईल. या स्थितीत आपले काही आर्थिक व्यवहार वादाच्या भोवर्‍यात व संशयाच्या जाळ्यात सापडू शकतात. विशेषतः महिला सहकार्‍यांबाबत, मैत्रिणींसोबत आपणांस अत्यंत सावधगिरीचे, सतर्कतेचे धोरण बाळगावयास हवे. महिलांनी पुरुष सहकार्‍यांपासून जरा सावध रहावयास हवे. कार्यालयातील आर्थिक व्यवहार सांभाळून करायला हवेत.
शुभ दिनांक- १४,१५,१६.
तूळ : जोडीदाराशी मतभेद टाळा
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी शुक्र षष्ठात मंगळासोबत आहे.त्याच्यावर गुरुची शुभ दृष्टी आहे. शनि पराक्रमात आहे. चंद्र या आठवड्याच्या सुरुवातीला लाभ स्थानात असून तो आठवडाअखेर धन स्थानात जाईल. संततीकडून काही धक्कादायक बातम्या कळू शकतात. काही विचित्र अनुभव आपले मन कलुषित करू शकतात. कौटुंबिक सुखात कमतरता निर्माण करणारी ही स्थिती आहे. जोडीदाराशी मतभेद, त्याच्या प्रकृतीची चिंता निर्माण होणे असले अनुभव येऊ शकतात. आपली आर्थिक कोंडी होऊ शकते. कोर्टाच्या कामात वेळ, पैसा व श्रम वाया जाईल.
शुभ दिनांक- १६,१७,१८.
वृश्‍चिक : व्यवसायात कटकटी संभव
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी मंगळ पंचमात शुक्रासोबत आहे. शनि धनस्थानी तर गुरु लाभस्थानात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर आपल्यच राशीस्थानी येणार आहे. या ग्रहमानामुळे आपण काहीसेु एकटे पडू शकता. कुटुंबातून, मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याची शक्यता दुरावत आहे. नोकरी-व्यवसायात तर कटकटीच अधिक जाणवणार, यात शंका नाही. नोकरीच्या कामामुळे घराबाहेर जावे लागेल. व्यवसायात वाढती स्पर्धा दगदगीचे कारण ठरू शकेल.
शुभ दिनांक- १४,१५,१८.
धनू : आळस, अनिच्छा, खोळंबा
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी गुरु दशम स्थानात असून शनि राशीस्थानात आहे. बुध धनस्थानात आहे. चंद्र भाग्य स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर व्यय स्थानात येणार आहे. कामे रेंगाळत आहेत, आळस, अनिच्छा काही काम करू देत नाही, प्रकृतीविषयक काही छुप्या कारणांनी देखील काहीसे जायबंदी झालेले असू शकते. आपली गाडी पुढे सरकत नाही, अशी स्थिती आहे. आपणांस कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कामें होत नाहीत, आणि होणार असली तरी विलंबामुळे त्याचा आनंद हिरावला जातोय. शुभ दिनांक- १२,१३,१७.
मकर : व्यवसायाबाबतचे प्रश्‍न सुटतील
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी शनि व्ययस्थानात असून राशीस्थानी रवि व बुध आहेत. योगकारक शुक्र व मंगळ पराक्रमात तरभाग्य स्थानात गुरु आहे. अष्टमात राहू आहे. अष्टम स्थानातून चंद्र भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो लाभ स्थानात जाणार आहे. विशेषतः सरकारी नोकरीत असणार्‍यांना हा महिना चांगला जावा. स्वतःच्या तसेच भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना उत्तम लाभ मिळेल. अनपेक्षित बढती, व्यवसायात वाढ, आर्थिक आवक वाढण्याचे योग आहेत. बेरोजगारांचे नोकरी-व्यवसायाबाबतचे प्रश्‍न सुटू शकतील.
शुभ दिनांक- १४,१५,१७.
कुंभ : प्रकृतीविषयक कुरबुरी संभव
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी शनि लाभस्थानात असून राशीत केतू आहे. गुरु अष्टमात, तर योगकारक शुक्र मंगळाच्या सोबतीने धनस्थानात आहे. व्यय स्थानात बुध आहे. चंद्र सप्तम स्थानातून या आठवड्यातील भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो दशम स्थानी जाईल. आपल्या संततीकडून काही शुभवार्ता कळू शकतात. आठवडा अखेर प्रकृतीविषयक काही कुरबूरी निर्माण होेऊ शकतात.काहींना असल्याने अपघाताचे भय निर्माण होते आहे, त्यामुळे वाहने सांभाळून चालवावीत. विजेची उपकरणे हाताळताना काळजी घेतली पाहिजे. शुभ दिनांक- १२,१६,१७.
मीन : दगदग, चिंता वाढेल
या आठवड्याच्या सुरुवातीला राश्यंतर करणारा रवि सोडला तर अन्य प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी गुरु सप्तमस्थानात असून राशीस्थानी मंगळ आणि शुक्र आहेत. शनि दशमात आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आपल्या षष्ठ स्थानातून भ्रमण सुरु करीत असून तो शेवटी भाग्य स्थानात जाणार आहे. विशेषतः नोकरी करणार्‍यांना हा आठवडा उत्तम ठरू शकतो, मात्र जबाबदारी वाढवून तो आपली दगदग, चिंता देखील वाढवू शकतो. काहींना अडलेले पैसे काढण्यासाठी तो उपकारक ठरेल. काहींना कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण करणारा ठरू शकतो. जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात. वाहने सांभाळून चालवावीत. शुभ दिनांक- १३,१४,१५.

मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६