उत्सव

0
190

घड्याळाने चारचे ठोके दिले तशी वीणाताईंची लगबग सुरू झाली. बापरे! चार वाजले. आतापर्यंत घराबाहेर पडायला हवं होतं. साडेचारला कीर्तन सुरू होणार. कोणत्याही परिस्थितीत वेळेच्या आत पोहोचायलाच पाहिजे. नाहीतर काही खरं नाही. अक्का वाट पहात असतील. त्यांना उशीर झालेला अजिबात चालत नाही. त्या काही बोलणार नाही, पण घड्याळाचा काटा पुढे गेलेला पाहून त्यांचा पारा चढेल. त्या जरी काही बोलणार नाही तरी त्यांचे न बोलणेच सगळे सांगून जाईल. अक्कांचे काम शिस्तशीर. बाई आहे का घड्याळ? माहीत नाही. चला, उचला पाय लवकर, म्हणून वीणाताईंनी पायाला गती दिली.
‘‘हे काय समोरून नीता धावत येत होती. नक्की अक्कांनी पिटाळलं असेल. ती जवळ येताच वीणाताई म्हणाल्या, ‘‘अगं नीता, मी येतच होते. तू कशाला आलीस, पण तुझ्या आजीला दम कुठला.’’
‘‘वीणा आजी, आधी माझं ऐक. लवकर घरी चल.’’
‘‘अगं, आपण तुझ्याच घरी चाललो बाळा.’’
‘‘तसं नाही ग, पण लवकर घरी चल. आजीला बरं नाही.’’
‘‘काय? काय म्हणालीस?’’
‘‘आजीला बरं नाही.’’ बरं नाही हे शब्द वीणाच्या मनाला शस्त्राप्रमाणे लागले.
‘‘म्हणजे असं काय झालं?’’- जवळ जवळ धावता धावताच वीणाने विचारले.
‘‘सकाळपासून जरा थकल्यासारखं वाटत होतं, पण तरी कीर्तनाला जायचं म्हणून तयार होत होती. अचानकच तिला खूप दम लागला. मला म्हणाली, जरा पाणी दे. मी पाणी दिलं. पंखा लावायला सांगितला. फास्ट कर म्हणाली. बोलता बोलता दिवाणावर पडली. मी आजी आजी, असा आवाज दिला पण ती काही बोलली नाही म्हणून मी धावतच तुला बोलवायला आली.’’
‘‘तुझ्या आईबाबांना कळवलं?’’
‘‘नाही ग आता तू आजी जवळ थांब. मी त्यांना व डॉक्टरांना बोलावते.’’
सगळं बळ एकवटून त्यांनी घरात प्रवेश केला. पाहतात तो काय अक्का अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांनी अक्कांना सरळ केलं. अक्का वीणाताईकडे पाहून हसल्या. वीणाताई म्हणाल्या,
‘‘अक्का काही काळजी करू नका. तुमचा मुलगा- सून येतीलच इतक्यात.’’
‘‘नाही ग वीणा मी तृप्त आहे. तू चांगली रहा’’ एवढं बोलण्याने त्यांना धाप लागली.
‘‘अक्का तुम्ही काही बोलू नका.’’
‘‘बोलू दे ग, लहान बहिणीसारखी माया केली,’’ एवढं बोलून त्या गप्प झाल्या.
‘‘आजी डॉक्टर आले ग!’’
डॉक्टर तपासत असताना अक्कांचा मुलगा सुनील व सून सुनीता दोघेही आले. डॉक्टरांनी बर्‍याच वेळा तपासलं. नंतर त्यांनी अक्कांचे डोळे बंद केले. पांघरूणसारखे केले.
‘‘डॉक्टर, काय झालं आईला? सांगा न डॉक्टर?’’
‘‘सुनील, सगळं होण्यापलीकडे गेलं. अक्का आता आपल्यात नाहीत.’’
‘‘काय?’’
‘‘हो, अक्कांचा व आपला एवढच संबंध होता.’’
सुनीलने ‘आई’ म्हणून मोठ्याने हंबरडा फोडला व जागेवर मटकन बसला. सगळे जण थोडा वेळ शोकमग्न झाले. वीणाताईंनी स्वत:ला सावरलं व त्या म्हणाल्या, ‘‘सुनील, शोक आवर. आपल्याला सगळ्यांना कळवावं लागेल. मला नंबर दिलेत तर मी फोन करेल.’’
‘‘नाही, नको मी बोलेल. तुम्ही आमच्यासोबत रहा आजी.’’
‘‘अग हे काय सांगणं झाला बाळा! तू काही काळजी करू नको.’’
हळूहळू शेजारपाजारचे लोक-नातेवाईक गोळा होऊ लागले. सगळे अक्काच्या जाण्याने हळहळत होते. कारण त्या होत्याच तशा लाघवी, मनमिळावू, कोणालाही आपलंसं करणार्‍या.
अगदी तटस्थ वृत्तीने वीणाने काय करायचं याचं मार्गदर्शन केले. सगळं आटोपल्यावर त्या घरी गेल्या. तिथे मोठा खंबीरपणाचा आव आणला होता, पण घरी आल्याबरोबर तो सगळा गळून गेला. एखाद्या हारलेल्या खेळाडूप्रमाणे थकून बसल्या. कारण अक्का जाण्याने त्यांच्या जीवनातला रस संपल्याप्रमाणे झाला.
अक्का त्यांच्या हितचिंतक, मार्गदर्शक, आदर्श सगळं सगळं होत्या. आज त्या समाजात मोठ्या ताठ मानेने, आनंदाने जगत होत्या. त्यांची मुलं मार्गाला लागली होती ते अक्कांमुळेच. अक्कांची व त्यांची झालेली पहिली भेट अजूनही स्मरणात होती. त्या दिवशी वीणाताई जवळच्या राम मंदिरात गेल्या होत्या. तेथेच एका खांबाला टेकून बसल्या बसल्या सगळ्या जीवनाचा चित्रपट डोळ्यासमोरून जात होता आणि डोळ्यातून नकळत धारा बाहेर पडत होत्या. त्या पुसण्याचेदेखील वीणाताईंना भान नव्हते.
अक्काही देवदर्शनाला आल्या होत्या. देवळात जाताना खांब्याला टेकून बसलेल्या वीणाताईंना पाहिलं. देवदर्शन करून परत जाताना पण त्यांना त्या खांब्याजवळ बसलेल्या दिसल्या. उत्सुकतेने त्यांनी निरखून पाहिले. तो त्यांना त्या रडताना दिसल्या. डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि पुसतही नव्हत्या, हे पाहून त्यांना राहावलं नाही. त्या थेट त्यांच्या समोर उभ्या राहिल्या, पण कसचं काय! त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. तेव्हा अक्कांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा त्या एकदम दचकल्या. ‘‘कोण आहे, कोण आहे’’ म्हणून ओरडल्या.
‘‘मी, मी आहे. मला सगळे जण अक्का म्हणतात.’’ डोळे पुसून वीणाताई एकदम उभ्या राहिल्या व म्हणाल्या, ‘‘मी आपणाला ओळखत नाही.’’
‘‘हो, मी पण तुम्हाला ओळखत नाही, पण मला वाटतं आता आपली ओळख झाली. तुम्हाला आवडेल न माझ्याशी ओळख करायला?’’ अक्का म्हणाल्या.
‘‘हो नक्की आवडेल आणि खरं सांगू का तुम्हाला पाहिलं अन् वाटलं, आपलं कुणीतरी आहे. तशी माझी इथे कोणाशी ओळख नाही. बरं मी आता निघते. मुलं खेळून आली असतील,’’ असं म्हणून वीणाताई गेल्या.
दुसर्‍या दिवशी वीणाताई देवळात गेल्या आणि अक्कांची वाट पाहात बसल्या. दिसल्याबरोबर वीणाताईच्या चेहर्‍यावर हसू फुटले. हळूहळू दोघींची ओळख झाली. आणि एक दिवस अक्कांनी विषय काढला, ‘‘वीणाताई, मी तुम्हाला एक विचारू का?’’
‘‘हो विचारू शकता, पण वीणा म्हटले तर…’’
‘‘बरं बाई, वीणा म्हणेल. तर वीणा जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यातून सारखं पाणी येत होतं. का रडत होतीस? अर्थात सांगण्यासारखं असेल तरच सांग नाही तर…’’
‘‘नाही, नाही अक्का, तुमच्या प्रेमळ शब्दांनी व आपुलकीने मी केव्हाच तुमची झाले. अक्का माझे यजमान एका को-ऑपरेटिव्ह सोसायटीत क्लर्क होते. मला दोन नणंदा, सासुबाई व माझी दोन मुलं असं आमचं कुटुंब होतं. कुटुंबप्रमुख म्हणून यांना सर्व जबाबदार्‍या पार पाडाव्या लागल्या. त्यात माझे पूर्ण सहकार्य होते. नणंदा श्रीमंत घरात गेल्या. त्यांची काही मदत होण्याऐवजी त्यांच्या महागड्या मागण्या पूर्ण करता करता तारांबळ उडायची. त्यात आम्ही खूष होतो, पण नशिबाला हे सुख पाहावल्या गेलं नाही आणि किरकोळ तापाचे निमित्त होऊन यजमान गेले. सासूबाईची साथ पूर्वीच सुटली होती. पैसा नाही, कोणाचा आधार नाही. माझ्या भावाने मला इथे आणलं. दोन पोरं व थोडं सामान घेऊन भावाशेजारी बिर्‍हाड थाटलं. भावजयीला काही हे आवडलं नाही. तिची घालून पाडून बोलणी सुरू झाली. घरातला दाळदाणा संपला तेव्हा भावजयीने मला अक्षरश: घरातली कामवाली बनवलं. पोरं यातून सुटली नाहीत. यातून मार्ग कसा काढू?’’ बोलता बोलता वीणाचा कंठ दाटून आला. अक्काचे पण डोळे पाणावले.
क्षण दोन क्षण स्तब्धता पसरली. नंतर अक्का म्हणाल्या, ‘‘असं आहे तर. बरं मला सांग तुझी मुलं कोणत्या वर्गात आहेत?’’
‘‘मोठा आठवीत व धाकटा सहावीत.’’
‘‘मोठ्याने काम केलेल तुला चालेल का?’’
‘‘पण त्याची शाळा!’’
‘अग, शाळा सांभाळूनच काम करायचं.’’
‘‘माझ्या मुलाच्या ओळखीने त्याला आपण पेपर वाटायचं काम देऊ. सकाळी तास दोन तास पेपर वाटेल, मग शाळेत जाईल. काय चालेल न?’’
‘‘अहो, चालेल काय विचारता. मला पण काही काम द्या. पोळ्या करेल, स्वयंपाक करेल.’’
‘अगं हो हो, किती घाई, मी तुला म्हणणारच होते की, नुसत्या पेपरच्या भरवशावर तुझं घर चालणार नाही. तू असं कर माझ्याकडे स्वयंपाकाला ये. तू किती शिकलीस ग?’’
‘‘मला कुठलं शिक्षण. जेमतेम मॅट्रिक झाले अन् हात पिवळे झाले. मी काय म्हणते, मी तुमच्या घरी स्वयंपाक करते. आणखी तुमच्या ओळखीच्या घरी पण सांगा.’’
‘‘जन्मभर काय पोळ्याच करते का?’’
‘‘मग काय करू?’’
‘‘माझ्या डोक्यात एक विचार आहे. आपण तुझ्या डी.एड.साठी प्रयत्न करू.’’
‘‘डी.एड. अन् मी. नाही नाही मला काही येत नाही.’’
‘‘अगं वेडाबाई, जन्मत: कोणाला काही येतं का? शिकावं लागतं अन् तुझ्या नशिबाने जर डी.एड. झाली तर तुला चांगली नोकरी लागेल. मुलांना पण काम करावं लागणार नाही. त्यांना तू चांगलं शिक्षण देऊ शकशील.’’
‘‘हो हो मी डी.एड. करीन. होईल का हो हे सगळं?’’
‘हो ग, घाबरू नको. परमेश्‍वर प्रयत्न करणार्‍याच्या पाठीशी उभा असतो.’’
‘‘अक्का माझं केवढं पुण्य म्हणून तुम्ही मला भेटलायत. नाहीतर एखादी विहीर नाही तर तलाव जवळ करण्याची वेळ होती.’’
अक्कांच्या म्हणण्याप्रमाणे डी.एड. झाले. जवळच्या शाळेत नोकरी लागली. जगण्याला नवा अर्थ प्राप्त झाल्या. आधीपासून अक्कांच्याबद्दल आदर होता आणि तो कैकपटीने वाढला होता. एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांना मानत होत्या.
वीणाताई अक्कांकडे स्वयंपाकाला जायच्या तेव्हा अक्कांच्या स्वभावातला एकेक पैलू उलगडत होता. एका चौकटीत त्यांनी त्यांचं जीवन बसवलं होतं. प्रत्येक क्षणाचा त्यांच्याजवळ हिशोब होता. म्हणजे केव्हा काय करायचे ते ठरलेले असायचे. त्यात त्या कोणत्याही परिस्थितीत बदल होऊ देत नव्हत्या.
अत्यंत कठोर परिश्रमाने त्यांनी भौतिक व आंतरिक वैभव वाढविले होते. कुठल्यातरी कारणाने त्यांच्या यजमानांवर बालंट आणून त्यांना सस्पेन्ड केले होते, पण अक्का डगमगल्या नाही. नोकरी नाही म्हटल्यावर नातेवाईकांनी पाठ फिरविली. अक्का शिकल्या नव्हत्या. तेव्हा पापड-लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. पिशवीत माल भरून त्या घरोघरी न्यायच्या. त्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून यजमानांना पुन्हा नोकरी लागली.
त्या दिवशी वीणाने अक्कांना विचारले, ‘‘अक्का असं स्वत:ला कामात गुंतवून ठेवता, तुम्हाला कंटाळा नाही येत काहो?’’
‘‘अग, कंटाळा अन् मला. या शब्दापासून दूर पळण्यासाठी तर हा मार्ग शोधला. मी पण चारचौघींसारखे वागत होते. सगळी कामं झाली किंवा व्हायची असली तरीही मन निराशेने भरून जायचे. काहीही करावेसे वाटत नव्हते. कितीतरी वेळ असाच निघून जायचा. प्रत्येक वेळी कुठे बाहेर जाणार, कोणाकडे जाणार, काय नवीन खायला करणार प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न होते. कुठेही चार दिवस गेलो तरी घरी परत यावंच लागतं. वैताग, वैताग आला होता, पण एकदा अचानक मला याची किल्ली मिळाली.’’
‘‘कोणती किल्ली?’’
‘‘अग दिवाळी तोंडावर आली होती. आधीपासून तयारी. खरेदी, रंगरंगोटी, घरकाम यात दिवस कसा जायचा कळतच नाही. कुठली काळजी मनाला शिवली नाही. कारण काळजी करायला वेळच नव्हता.’’
‘‘अहो, सणावारी सगळ्यांचंच होतं अक्का असं.’’
‘‘हो सगळ्यांचं होतं कबूल आहे, पण आपण यातून काय शिकतो? काहीच नाही.’’
‘‘म्हणजे’’
‘‘म्हणजे सणावारी आपण लवकर उठतो. सगळी कामं कशी टाईमटेबल आखून ठरल्याप्रमाणे करतो. तसंच आपण नेहमी केलं तर हा विचार माझ्या मनात आला.’’
‘‘कसं शक्य आहे अक्का! आपण नेहमी गोडधोड कुठे करणार?’’
‘‘गोडधोड नाही, पण स्वयंपाक तर रोज करतो. मी ठरवलं की, रोजचा दिनक्रम आखायचा. त्यात रोजची कामं, छंद, वाचन, बाहेर जाणे, शेजारच्यांशी गप्पा इ. अगदी सगळं सगळं त्यात येऊ द्यावं. प्रत्येकाला ठरावीक वेळ द्यावा. कामात बदल हीच विश्रांती असते. त्यामुळे मनात कंटाळवाणेपणा, निराशा प्रवेश करायला वेळच नसतो. सुरुवाती सुरुवातीला कठीण गेले पण, हळूहळू जमायला लागले.’’
आपण आपले आयुष्य क्षणाक्षणाने जगतो. एखादा मनुष्य ऐंशी वर्षे जगला म्हणजे तो एकदम ऐंशी वर्षे जगत नाही. क्षण क्षण, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष होेते, पण प्रत्यक्षात जगतो एक क्षण. प्रत्येक क्षण नवीन असतो. नवीन क्षणाचे स्वागत उत्साहात व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळी हा क्षण आनंदच आणेल असे नाही तर कधी दु:ख अपमान, मनाला त्रास देणार्‍या घटना घेऊन येईल, पण एक लक्षात ठेवावं प्रत्येक येणारा क्षण जाणारा आहे म्हणजे त्रास होणार नाही.
प्रत्येक घटना आयुष्यात योग्य वेळी घडतेच, पण आपण आधीपासून काळजी करून आयुष्य वाया घालवतो. याचा अर्थ आपल्या प्रयत्नांना थांबवणे किंवा हातावर हात देऊन बसणे असा नाही. प्रयत्न तर चालू ठवायचे, पण रिकाम्या वेळाची किंवा पूर्ण दिवसाची आखणी करावी. एखाद्या सणासारखा, उत्सवसारखा दिवस घालवावा.
‘‘अक्का, तुम्ही मोलाचे शिक्षण मला दिले.’’
‘‘याप्रमाणे वाग. आयुष्य उजळून जाईल.’’
‘‘नक्की प्रयत्न करेन. तुम्ही केवढं मोठ तत्त्वज्ञान सोप करून सांगितलं.’’
पुढच्या क्षणी अक्का गेल्याचं आठवलं अन् पायातलं बळच गेलं, पण अक्कांचे शब्द आठवले- ‘‘जाणे येणे निसर्गाचा धर्म आहे. मनाला शांत ठेवावं. प्रत्येक गोष्टीला मार्ग सापडतोच. नवीन क्षणाचं स्वागत मात्र तेवढ्याच उत्साहाने करावं उत्सवासारखं. जीवनाला उत्सवाचे स्वरूप द्यावे.’’
माधुरी पंडित/७७०९०३७५९९