वास्तववाद व आधुनिकता

0
238

आधुनिकतेचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे खंडमयता. तुकड्या-तुकड्यांमध्ये विचार करणे; परंतु हा विचार परिपूर्ण वस्तुनिष्ठतेकडे नेण्यासाठी आहे. तसेच हा विचार परिपूर्ण व्यक्तिनिष्ठतेकडे नेण्यासाठीदेखील आहे. याच संदर्भात स्वच्छंदवादाचाही विचार झाला. सौंदर्यशास्त्रीय आदर्श आणि व्यक्तिनिष्ठतेच्या स्वच्छंदवादात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. एकजिनसीपणा व सामंजस्यपणा यातून हे दृष्टिगोचर झाले. वास्तववादात जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व समावेशक असा झाला; परंतु वास्तववादाचा मुख्य उद्देश सौंदर्यापेक्षा जीवनाचे वास्तव समजणे असा राहिला. जीवनातील प्रमुख सामाजिक प्रक्रिया त्या जशा आहेत तशा समजणे असा राहिला. वास्तववादाने जीवनाकडे मानवीय दृष्टिकोनातून बघितले. वास्तववादाच्या मर्यादा आखणे खरे म्हणजे हितावह नाही. उदाहरणार्थ काका या लेखकाने तटस्थता व व्यक्तिगत जबाबदारी यासंदर्भात वास्तववादाचा विचार केला. ‘तटस्थता’ ही विसाव्या शतकातील महत्त्वाची समस्या काकाला जाणवली. तिचेच वास्तव रूप त्याने आपल्या लिखाणातून मांडले, परंतु एक विकसित व निश्‍चियात्मक आणि सिद्धहस्त पद्धतीत म्हणून वास्तववादाचा विचार केल्यास, कलावंताला जगाबद्दल काय वाटते केवळ एवढेच महत्त्वाचे नसून तो आपल्या कला-अभिव्यक्तीसाठी कोणता मार्ग निवडतो, कोणती सामुग्री गोळा करतो तसेच जीवनाविषयी त्याची संकल्पना काय आहे याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याशिवाय विषयाची हाताळणी कशी केली जाते याचाही विचार आवश्यक आहे. त्यातून रसनिर्मिती व काव्यमयता दिसून येते का, हेही महत्त्वाचे असे घटक आहेत. काकाच्या बाबतीत वरील दोन्ही घटक वास्तववादी नाहीत. जागतिक पातळीवर असलेल्या अमर्याद शत्रुत्वाची भावना भिनल्याचे त्याच्या लिखाणातून जाणवते. त्याचे काव्य तार्किक व अतार्किकतेचे मिलन घडवून आणते. त्यातून वास्तव व अवास्तव तसेच वास्तविक जाणीव व स्वप्नमयता यांचे दर्शन घडते. त्याच्या लिखाणातून विचित्र आणि विलक्षण अशा रूपांतरांची गुंफण साधारण वाटणार्‍या अशा घटनांशी होते. हे अगदी नैसर्गिक आहे, असेही काकाला वाटते. काकाचे स्वप्नमयी विचार वास्तववादाच्या सीमारेषेवर रेंगाळताना दिसतात; परंतु हे काही वास्तववादाचे लक्षण नाही. खरे म्हणजे, काकाला असे वाटणे म्हणजे मानवाच्या मानसिकतेची एक वैश्‍विक गुणवत्ता आहे. म्हणून त्याचे लिखाण अभिव्यक्तिवादी आहे, असे म्हणावे लागेल.
विलियम फॉकनर, थॉमस मॅन, अर्नेस्ट हेमिंग्वे, आणि बर्टोल्ट ब्रेश्त यासारख्या लेखकांनी वास्तववादाच्या प्रस्थापित सीमारेषांचा विस्तार केला. ज्यामुळे वास्तववादाचे सौंदर्य, वैविध्यता अबाधित राहील व त्याशिवाय वास्तववादाची मर्यादा निश्‍चित करणार, अशी वास्तववादाची व्याख्या करणे आवश्यक आहे.
वास्तववादी कलापद्धतीचा विस्तार करणे म्हणजे कलेच्या मर्यादा आखून देणे होय. पाब्लो पिकासोसारख्या प्रखर बुद्धी असलेल्या कलावंताची ओळख एक वास्तववादी कलावंत म्हणून करण्यासाठी त्याचे उन्नयन करायची आवश्यकता नाही. कलेत कुणाचाही ‘हुद्दा’ ठरविला जात नाही. तत्त्ववेत्ता रूसो हा भावनावादी आहे आणि पियर कार्नोली हा अभिजातवादी आहे. केवळ हे कारण देऊन त्यांच्यापैकी कुणाचेही महत्त्व कमी होऊ शकत नाही. अभिजातवादी असणे किंवा भावनावादी असणे याचा अर्थ एवढाच होतो की, यांच्यात त्यासंबंधीचे संवेदनात्मक सौंदर्यशास्त्रीय गुण आहेत. करमझीनची ‘लिझा’ भावनिक आहे, तर मोलिएरचा ‘तारतूफ’ विनोदी व ढोंगी वाटतो. वास्तव प्रतिमेला अनेक कंगोरे असतात. तसेच ती सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या वैभवसंपन्न असते. आपल्या जीवनमार्गाच्या शोधात तो वेडापिसा होतो. उन्नमय अवस्थेतील त्याचे क्षण, अक्सिन्यावर असलेले त्याचे अतोनात प्रेम, त्याचा गुंडप्रवृत्तीच्या लोकांत असलेला सहभाग, व्यामिश्र अशा ऐतिहासिक परिस्थितीत जो स्वत:ला सावरण्यात अयशस्वी झाला, असे चारित्र्य असलेले हे पात्र ‘ट्रॅजिक’ बनले आहे. एखाद्या विशिष्ट क्षणी मनुष्य एखाद्या उद्भवलेल्या परिस्थितीत ‘मुक्त’ असतो तसाच तो त्याच वेळी अवलंबूनदेखील असतो. त्याचे परिस्थितीवर अवलंबून असणे त्याला ‘मानवीय’ बनवते. मात्र कधी कधी त्याचे व्यक्तिमत्त्व परिस्थितीवर मात करते. वास्तववादी कलेत दुसरा प्रकार घडतो. वास्तववादी कलेत तार्किक कुशलता बघायला मिळते. वास्तववादाच्या मर्यादेत राहून जो कलाकार आपली कला घडवतो, त्याला अनेकदा व्यामिश्र परिस्थितीवर मात करण्यासाठी मर्यादेचे बंधन झुगारून द्यावे लागते. वस्तूंचे सामान्यत्व, त्यांचे साधारणत्व तसेच यासंबंधीचे जुनाट असे विचार म्हणजे वास्तववाद नाही. वस्तू जशा आहेत तशा दाखवणे म्हणजे वास्तववाद नाही. कलेतील वास्तववादात वास्तवाचा ‘आभास’ उत्पन्न करायचा असतो. लोकसमूहाला एक प्रचंड मोठी सामाजिक शक्ती मानणे व याची जाणीव ठेवून वास्तवाचा आभास निर्माण करणे हे कलेतील वास्तववादाचे सर्वात मोठे यश आहे. सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या संवेदनांच्या पातळीवर आशयपूर्ण प्रतिमांची निर्मिती करून कलेतील वास्तववाद अलंकृत झाला. त्याचा विस्तार झाला. त्याने सामाजिक जाणिवा प्रगल्भ झाल्या. त्यातील बौद्धिक व दर्शनशास्त्रीय घटकांचा विकास झाला. वास्तववादाने मानसशास्त्रीय मार्ग निवडल्या. त्यामुळे मानवीय आत्माची ‘खोली’ आपल्याला कळली. वैयक्तिक पातळीवर असलेली या खोलींची भिन्नता लक्षात आली. आंतरिकदृष्ट्या विचार केला तर मनुष्याचे जीवन वर वर दिसणार्‍या बाह्म जीवनापेक्षा किती भिन्न व स्वतंत्र आहे हे कळले. हे कळल्यामुळे मानवाच्या आत्मस्वरूपाचे तार्किक विश्‍लेषण शक्य झाले. कलेतील वास्तववादामुळे मनुष्याच्या जीवनाबद्दलच्या व जीवनातील अपरिहार्य संघर्षाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. वास्तववादी कलेने स्वत:चे संक्षिप्त व संकलित तंत्र विकसित केले. त्यामुळे जीवनातील वैविध्यतेचे दर्शन कलेतून घडविण्यास मदत झाली.
डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२