वेदाध्ययन म्हणजे काय?

0
260

इंजिनीअर असलेल्या आमच्या एका स्नेह्यासोबत वेदाध्ययन म्हणजे काय? या विषयाची चर्चा करीत असताना, आमच्या अभ्यासक्रमापेक्षा हे कठीण आहे आणि लोकांना याची फारशी माहिती नाही तेव्हा ती होण्यासाठी तरी तुम्ही त्यावर लिहा, अशी त्याने गळ घातल्याने हे लिहायला प्रवृत्त झालो. मग आधिकारिक माहितीसाठी पुणे येथील वैदिक पराग दिवेकर यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी यावरचा त्यांचा एक लेख पाठवला आणि आवर्जून लिहायला सांगितले. प्रस्तुत सर्व माहिती ही त्यावरून घेतली आहे. त्यामुळे वाचकांना थोडी तरी कल्पना यावी.
अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन|
अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः॥
(पैसे देऊन औषध मिळते, पण आरोग्य मिळत नाही. पैशाने पुस्तकांची चळत विकत मिळते, पण ज्ञान मिळत नाही. ते अपार कष्टाने मिळवावे लागते.)
एक वेद कंठस्थ होण्यासाठी किमान बारा वर्षांचा काळ लागतो. त्यासोबत त्याचे अन्य आरण्यक आणि ब्राह्मण ग्रंथसुद्धा अभ्यासावे लागतात. केवळ ऋग्वेद घेतला तरी त्याच्या १०५३४ ऋचा तोंडपाठ होणे सोपे नाही इतके कळून यावे. वेदपाठशाळेत ही मुले अपार कष्ट घेतात तेव्हा पुढे वैदिक बनतात. प्रचलित शालेय शिक्षणक्रमात पुढच्या इयत्तेत गेले की आधीच्या इयत्तेतील विसरले जाते. ती मुभा येथे नाही हे लक्षात घ्या.
येथील शिक्षण हे प्राय: गुरुगृही होते. याचा अर्थ आपले घर सोडून विद्यार्थी हे गुरुगृही म्हणजे पाठशाळेत राहातात. कित्येक ठिकाणी वेदशिक्षणासोबत शालेय शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या पाठशाळांना मदरशांसारखे सरकारी अनुदान नाही. शिक्षण कसे घेतले व दिले जाते ते पाहिले तर कष्ट कळतील.
आरंभी संथा देणे, म्हणजे वेदपाठ शिकविणारे गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे (चरण) पाडून ,आपल्या मागे घोकायला म्हणजेच मोठ्यांदा म्हणायला सांगतात. याला प्राथमिक अर्थानी संथा देणे असे म्हटले जाते. पाठांतराच्या या विशिष्ट पद्धतीला संथ घालणे अथवा संथा म्हणणे असे म्हटले जाते.
याचे चार टप्पे असतात. चरणाची संथा, अर्धनीची संथा, ऋचेची संथा आणि गुंडिकेची संथा होय.
१) चरणाची संथा- या संथेमध्ये गुरुजी हे प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात, मग विद्यार्थ्यांनी (ग्रंथ अथवा पोथीत बघून) तो त्यांच्या मागून सात वेळा घोकायचा. यात म्हणताना एक जरी चूक झाली, तरी पुन्हा सुरुवात. यात शुद्ध अक्षर, जोडाक्षर, त्याचे गुरुत्व, अनुस्वारांचे उच्चार, स्वराघात, र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-असे विसर्ग (आणि त्यांचे तसेच उच्चार) हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झाले की मेंदूत उमटलेली त्याची प्रतिमा पुसणे कर्मकठीण असते.) हे स्तोत्र अथवा ऋचेचे पाडलेले एकेक चरण सात वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र – पूर्ण केले जाते, याला ‘चरणाची’ पहिली संथा म्हणतात. अशा चार संथा झाल्या की ‘चरण’ पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजींसमोर होते. मंत्रात कोणतीही अशुद्धी येऊ नये यासाठी घेतली जाणारी ही काळजी आहे.
२) अर्धनीची संथा- यात सामान्यतः मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. आधी चरण डोक्यात बसलेला असतोच. त्यामुळे इथपासून गुरुजी समोर-नसले, तरी चालते. एकामागून एक ओळ पूर्ण सात वेळा घोकत संपूर्ण अध्याय पूर्ण केला की अर्धनीची एकसंथा झाली. अशाच आणखी तीन संथा म्हणायच्या म्हणजे अर्धनीच्या चार संथा होतात.
३) ऋचेची संथा- मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरू होतो आणि आता दोन ओळींची संपूर्ण ऋचा, आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण (धरून) असे सात वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण-घेण्याचे कारण असे, की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. यातल्या या (पहिल्या) संथेवर, शिकविणार्‍या गुरुजींचे अत्यंत बारीक लक्ष असते. म्हणण्यात अशुद्धी आली आहे अथवा नव्याने तयार झाली आहे का, ते पाहण्यासाठी असे लक्ष असणे अत्यंत जरुरीचे असते. आता या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे याच्यासुद्धा एकंदर चार संथा पूर्ण होतात.
४) गुंडिकेची संथा- हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथांनी हीचे निम्मे काम पार पडलेले असते. पण तरिही, आता कितीही पाठ येत असले तरी (यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच, सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) घेऊन तो सात वेळा म्हणायचा असतो, अशा प्रकारे तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.
अशा आणखी तीन संथा म्हणून चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून, विद्यार्थ्याची इच्छा अगर तयारी असो वा नसो तरी त्याने पोथीत न पाहाता आणि मान वर करून संथा म्हणायची असते. त्याशिवाय पाठ होणे ही क्रियाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्वसामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या दोन संथांमधे सर्वकाही बिनचूक आणि तोंडपाठ येतेच. पण त्याहून(बुद्धीने) आगे/मागे जे असतील, त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या एकंदर सोळा संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो. यात उच्चार चुकला अथवा क्रम चुकला की शिक्षा ही ठरलेली.
आवृत्ती- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषयाध्याय हा किमान दोन वर्षे तरी दररोज किमान एक आवृत्ती म्हणून जिवंत ठेवावा लागतो. अन्यथा पहिले पाढे पंचावन्न, अशी गत होईल. हे पाठांतराचे काम सोपे नव्हे. ऋग्वेदाची संहिता घेतली, तरी त्यात आठ अष्टके म्हणजे चौसष्ट अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाईल तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो आणि दर दोन वर्षानी बॅलन्स होत राहातो. मग पुढे ब्राह्मण/आरण्यक/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष (फलज्योतिष नव्हे, बरे का!)/शास्त्र/ निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत अध्ययन करावे लागते. एका वेदाच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला दररोज सहा तास इथून सुरुवात होऊन शेवटच्या वर्षाला हा कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी १२ वर्षे आहे. पाठांतरातील अग्निदिव्य म्हणजे संचार जाणे होय. संचार जाणे हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे.
त्याबद्दल पुढच्या भागात माहिती घेऊ…!
डॉ. सच्चिदानंद शेवडे