मायमराठी

0
221

आज आमच्या घरात असलेल्या बहुतांश वस्तूंची नावं इंग्रजी आहेत. शुद्ध मराठी संवाद अभावानेच कानी पडतात. दिवसरात्र कोकलणार्‍या दृक्-श्राव्य प्रसारमाध्यमातल्या मराठीत असंख्य अमराठी शब्द सर्रास वापरले जात आहेत. मराठी चित्रपटांना इंग्रजी नावं द्यायची चढाओढ लागली आहे. मराठी वर्तमानपत्रांमधून देवनागरीत लिहिलेल्या अमराठी शब्दांचा अतिरेक होतो आहे. आमच्या वसाहतींना, घरांना, पोरांना इंग्रजी नावे ठेवली जात आहेत. अमुक व्हिला, तमुक टॉवर, बंटी, मोंटी, जॅक, मॅक, डॉली, जॉली त्यामुळे बौद्धिक-सांस्कृतिक भिकेचे डोहाळे लागले आहेत; दुसरे काय?
माउली ज्ञानराजांच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या, आपल्या सर्वांच्या मायमराठीची आज फार केविलवाणी अवस्था झाली आहे. काळ बदलला, प्रतिष्ठेच्या कल्पनाही बदलल्या. इंग्रजी-हिंदीमिश्रित मराठीला सन्मान मिळू लागला. एखादा प्राध्यापक त्याच्या बायकोला मिसेस म्हणू लागला की त्याचे ऐकून गावाकडची अडाणी बायकोही तिच्या नवर्‍याला मिस्टर म्हणू लागते. आज आमच्या घरात असलेल्या बहुतांश वस्तूंची नावं इंग्रजी आहेत. शुद्ध मराठी संवाद अभावानेच कानी पडतात. दिवसरात्र कोकलणार्‍या दृक्-श्राव्य प्रसारमाध्यमातल्या मराठीत असंख्य अमराठी शब्द सर्रास वापरले जात आहेत. मराठी चित्रपटांना इंग्रजी नावं द्यायची चढाओढ लागली आहे. आमच्या वसाहतींना, घरांना, पोरांना इंग्रजी नावे ठेवली जात आहेत. अमुक व्हिला, तमुक टॉवर, बंटी, मोंटी, जॅक, मॅक, डॉली, जॉली त्यामुळे बौद्धिक-सांस्कृतिक भिकेचे डोहाळे लागले आहेत; दुसरे काय?
मायमराठीतून शिक्षण घ्यायला-द्यायला मराठी माणूसच तयार नाही. ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात त्यांना सामाजिक प्रतिष्ठा आणि ज्यांची मुलं मराठी माध्यमातून शिकतात त्यांची उपेक्षा. सरकारी-खासगी लघु-मध्यम-उच्च ध्वनिलहरींवर चालणारी आकाशवाणी केंद्रे; दृक्‌श्राव्य वाहिन्यांवरून प्रसारित होणारी बातमीपत्रं, चर्चासत्रं, मालिका, जाहिराती इत्यादींमधून मायमराठीची प्रचंड मुस्कटदाबी आणि तीही मायमराठीच्याच लेकरांकडून सुरू आहे. हिंदी-इंग्रजीतल्या जाहिरातीची भाषांतरित मराठी आवृत्ती ऐकताना तर शिसारीच येते. जरा बारकाईने पहा, वाचा आणि ऐका म्हणजे कळेल. हे सर्व थांबवायचे असेल तर मराठीप्रेमींनी त्यांच्यावर सामुदायिक बहिष्कार घातला पाहिजे. कारण यांचा जीव पैशात असतो. तामिळनाडूत हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे.
समाजावर सर्वात जास्त इष्ट-अनिष्ट परिणाम तारे-तारका, खेळाडू, राजकीय नेते आणि हे सारे ज्यांच्या मार्फत घराघरांत पोहोचतात त्या प्रसारमाध्यमांकडून होत असतात. मातेला आई, पित्याला बाबा, पत्नीला बायको, पतीला नवरा म्हणणारे गावंढळ आणि त्याऐवजी मॉम, डॅड, मिसेस, मिस्टर म्हणणारे मॉडर्न? ही विकृती आली कुठून? आचार-विचार, आहार-विहार, भाषाशुद्धी इत्यादी बाबींचा आग्रह धरणार्‍यांना आम्ही बहिष्कृत केले, अडगळीत टाकले. तथाकथित प्रतिष्ठेच्या भंपक विदेशी मोठेपणाच्या मागे धावत सुटलो. जे जे आमच्याकडे आहे ते ते निकृष्ट आणि जे जे बाहेरून आले आहे, येत आहे ते ते उत्कृष्ट म्हणून स्वीकारत गेलो. त्यामुळेच संस्कृत लयाला गेली आणि मराठीही त्याच मार्गाने निघाली आहे. मेकॉले जर स्वर्गात गेला असेल तर तो आमच्या मूर्खपणावर गालातल्या गालात हसत असेल. मराठी माणूस महाराष्ट्रातही समोरच्या अमराठी माणसाला मराठी येत असली तरी त्याच्याच भाषेत बोलतो. दक्षिणेतला माणूस असे कधीच वागत नाही. ज्या मातेची सख्खी लेकरंच तिच्या जिवावर उठली असतील तिला वाचवणार कोण? आणि तिने तरी जगावं कुणासाठी? म्हणूनच मायमराठी संस्कृत आजीच्या भेटीला निघाली आहे आणि इंग्रजी मावशी गालातल्या गालात छद्मीपणे हसत आहे. मायमराठीला लाथाडणार्‍या मराठी माणसाच्या मूर्खपणावर तिने का हसू नये?
वर्षे पदव्युत्तर स्तरावर इंग्रजीतून गणिताचे अध्ययन, अध्यापन व संशोधन करणारा मी इंग्रजीच काय जगातील कुठलीच भाषा शिकण्याच्या विरोधात नाही. परंतु त्यासाठी पूर्वप्राथमिक पासून सर्वच विषय इंग्रजीतून शिकण्याची सक्ती आपण आपल्या पाल्यांवर कशी काय करू शकतो? अंगातून घामाच्या धारा निघत असताना, बाहेर उन्हाची काहिली होत असताना पायात बूट मोजे, गळ्यात घट्ट टाय घातलेला आपला चिमुरडा वर्गात रेन गो अवे अवे, रेन रेन गो टु स्पेन असे म्हणत असतो त्यावेळी त्याच्या मनात साहजिकच प्रश्‍न पडतो की मी असा परिस्थितीच्या विपरीत का वागतो आहे? इथे पावसाची अत्यंत आवश्यकता असताना त्याला मी स्पेनला जायला का सांगतो आहे? आपण पालक त्याच्या या प्रश्‍नाचे काय उत्तर देणार? स्वत:च्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी मराठी भाषक पालकांच्या अशा दांभिक वागण्याला माझा विरोध आहे. शिक्षण म्हणजे जोडणे. विपरीत परिस्थितीत शिकणारा आपला पाल्य परिसराशी कसा काय जोडला जाईल? त्याचे शिकणे आनंददायी कसे होईल?
विज्ञानात जागतिक कीर्ती गाजवण्यासाठी पहिलीपासूनच इंग्रजी माध्यमातून शिकण्याची अजीबात गरज नाही. मी मराठी माध्यमात शिकून वरिष्ठ महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक झालो. माझ्या तिन्ही मुली मराठी माध्यमातूनच शिकल्या व आज त्या वैद्यकीय आणि संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. म्हणून मला हे सांगण्याचा नैतिक अधिकार आहे की आपल्या पाल्यांना मायमराठीपासून तोडू नका. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे पाल्यांचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकास होतो, त्यातूनच निरोगी समाज निर्माण होतो. शिवाय असे आनंददायी शिक्षण घेतलेले पाल्य पुढे जगातील कुठल्याही परकीय भाषेवर सहज प्रभुत्व मिळवू शकतात. मराठी हा आमचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. वारसा अमूल्य असतो. त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. भाषा संस्कृतीचे माध्यम असते. एखाद्या भाषेचा र्‍हास म्हणजे संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण अंगाचा लोप. मराठी संस्कृतीवर मराठीच्या र्‍हासाचा विपरीत परिणाम होईल. तो परिणाम टाळण्यासाठी मराठीविषयी आस्था असणे ही एक सामाजिक गरज आहे. रोज प्रचंड वेगाने बदलणार्‍या परिस्थितीशी जुळवून घेताना आपल्या पाल्याने त्याची आर्थिक प्रगती, त्याच्या भावना आणि विचारांना इंग्रजीतूनच वाट करून द्यावी हा आग्रह घातक नाही का? मातृभाषा असणे ही गोष्ट बालकाला माता असण्याइतकेच महत्त्वाचे असते. कारण, अति आनंदाचे, अति दु:खाचे प्रत्येक हुंकार मातृभाषेतूनच व्यक्त होतात. मग इंग्रजीतून शिकले की आपला उद्धार आपोआपच होईल असे दिवास्वप्न आपण आपल्या पाल्यांना का दाखवत आहोत? आधीच आम्ही आमच्या संस्कृत आजीला गमावून बसलो आहोत, उद्या मायमराठीलाही आम्ही पोरके होऊ. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांत मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असताना आम्हीच गुलामगिरीचे प्रतीक असणार्‍या परकीय भाषा इंग्रजीचाच का आग्रह धरत आहोत? सातासमुद्रापार येऊन इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या देशात त्यांची इंग्रजी भाषा, त्यासाठी त्यांचे इंग्रजी संस्कार सर्व अडचणींवर मात करून आमच्यावर लादले, रुजवले. या मानसिक गुलामगिरीतून आम्ही बाहेर कधी येणार? आज आपल्याच देशात आपल्याच मातृभाषेतून शिक्षण घेण्यास, सर्व दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणींचा बाऊ का केला जातो आहे? हे पराभूत मनोवृत्तीच्या स्वाभिमानशून्य समाजाचे लक्षण आहे. तसे नसते तर इंग्रजीने, चिनी वस्तूंनी व विदेशी विकृतींनी थेट आमच्या देव्हार्‍यापर्यंत धडक मारलीच नसती. परकीय भाषेच्या कुबड्या वापरून व विदेशी विकृतींचे अनुकरण करून कुठलाही देश प्रगती करू शकत नाही. स्वाभिमानाने ताठ उभा राहू शकत नाही. स्वदेशी सभ्येतेची कास धरून या मानसिक गुलामगिरीतून देश ज्या दिवशी बाहेर येईल तो आमचा खरा मुक्तिदिन असेल.
प्रगतीच्या सर्वोच्च शिखराकडे झेपावणार्‍या चीन, जपानसारख्या देशांच्या नागरिकांची आपापल्या संस्कृती, मातृभाषा, मातृभूमीवर अढळ श्रद्धा आहे. या सर्व देशात शिक्षण, संशोधन, राजकारण, समाजकारण, दैनंदिन खाजगी व सरकारी व्यवहार या सार्‍यांचे माध्यम हे मातृभाषाच आहेत. जपान मुळातच प्रखर राष्ट्रप्रेम व कार्यनिष्ठा असणार्‍या नागरिकांचा स्वाभिमानी देश आहे. त्यामुळेच दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेला जपान नुसताच उठून उभा राहिला असे नाही, तर अमेरिकेसारख्या महासत्तेला टक्कर देण्यास समर्थ झाला. जपानच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनी अमेरिकेच्या बाजारपेठा काबीज केल्या. चीन अमेरिकेसारख्या महासत्तांना मागे टाकण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या जपानच्या यशाचे रहस्य आहे त्याची आपल्या जपानी मातृभाषेवर असलेली अढळ श्रद्धा व अपार प्रेम. म्हणूनच जपानी चॅनलवरच्या कार्यक्रमातील इंग्रजी शब्दांच्या वापरांमुळे मला भावनिक त्रास होतो असे म्हणून जपानी होजी आजोबा बंड करून उठतात, खटला दाखल करतात. हा जपानी संस्कृती रक्षणाचा विषय आहे. जपानच्या अस्मितेचा विषय आहे अशी आपली बाजू मांडतात. त्याला समाजाच्या सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो. संस्कृतीचे ठेकेदार, सांस्कृतिक घुसखोरी, संस्कृती म्हणजे काय रे भाऊ असे म्हणून त्यांना कोणी नाउमेद करत नाही.
दोन हजार वर्षे मातृभूमीला पारख्या झालेल्या यहुदी लोकांनी त्यांची हिब्रू भाषा व त्यांची अग्निपूजक संस्कृती जिवापाड जपली. जाज्वल्य राष्ट्रप्रेमातून स्वातंत्र्य खेचून आणले. सभोवताली परंपरागत शत्रूंचा विळखा असताना, अत्यंत तोकड्या पर्जन्यमानावर त्यांनी त्यांचा इस्राईल हा देश सुजलाम् सुफलाम् केला ते त्यांच्या मातृभाषा व मातृभूमीवरच्या निस्सीम भक्तीच्या जोरावरच. युक्रेनच्या संसदेत मातृभाषेतून भाषणे करण्यासाठी हाणामार्‍या होतात. आमच्या संसदेचे सोडाच परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण खेड्यापाड्यातही तथाकथित शिक्षण सम्राट इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी अत्यंत उतावीळ असतात व अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश करण्यासाठी सर्वच स्तरातील पालक रात्रंदिवस रांगा लावून बसतात. विशेष नवल असे की मराठी मातीत जन्मलेले, वाढलेले, मराठी माध्यमात शिकलेले पालकच आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालण्यासाठी जास्त आतुर असल्याचे पहावयास मिळते. चीन, जपान, रशियासह कुठल्याच देशात त्यांच्या मातृभाषांऐवजी इंग्रजी ही परकीय भाषा त्यांच्या व्यवहाराचे, शिक्षणाचे माध्यम नाही. तेथील शासनकर्ते देशात व देशाबाहेरही फक्त स्वत:च्याच भाषेत बोलतात. सोबत दुभाषी ठेवतात. इस्राईल, जपान, चीन, रशिया, जर्मनी, कोरिया, मलेशिया इत्यादी देश स्वत:ची सर्वांगीण प्रगती करून आज भारताच्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. हे सर्व देश आज जगासमोर ताठ मान करून स्वाभिमानाने उभे आहेत, त्याचे कारण या देशांची शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था त्यांच्या त्यांच्या राष्ट्रभाषेतून, मातृभाषेतून संचलित केल्या जातात. अनेक देशांत एकापेक्षा अधिक राष्ट्रभाषा आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासात कुठलीच आडकाठी आली नाही. कॅनडामध्ये दोन, स्वित्झरलॅण्डमध्ये चार, तर रशियात डझनाहून अधिक राष्ट्रभाषा आहेत. त्या त्या प्रांतापुरती ती ती भाषा राष्ट्रभाषा मानली जाते. कुठल्याही प्रांतातील सर्व व्यवहार संबंधित राष्ट्रभाषेतच चालतात. तिथे इतर भाषांना दुय्यम स्थान असते. इतरही काही देशांत अनेक राष्ट्रभाषा आहेत. भारतीय राज्य घटनेचाही तोच हेतू आहे. राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रथमपासून चौदा आणि आता बावीस भारतीय भाषांना विशेष दर्जा दिलेला आहे. त्यात इंग्रजीचा समावेश कुठेच नाही, हे विशेष! घटनेप्रमाणे इंग्रजीचे स्थान भारतीय भाषांच्या मानाने गौण आहे. आजही इंग्रजी भाषेविषयी भारतीयांच्या मनात अनेक भ्रामक समजुती आहेत. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे ही त्यापैकीच एक. इंग्रजी ही जागतिक भाषा नसून ती पूर्वी इंग्रजांनी राज्य केलेल्या काही देशांत वापरली जाणारी भाषा आहे. दुसरी भ्रामक कल्पना अशी की इंग्रजी ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की महाबलाढ्य चीन व प्रखर राष्ट्राभिमानी जपान यांनी सारी तांत्रिक वैज्ञानिक प्रगती त्यांच्या चित्रलिपी भाषा वापरूनच केली आहे. बहुतेक सर्व शोध रशियन, जर्मन, फ्रेंच आदी युरोपीयन देशात लागले आहेत. हे सर्व शोध साहित्य भारतीयांच्या समोर इंग्रजी भाषेतूनच आल्यामुळे इंग्रजी हीच आधुनिक तंत्र शास्त्रांची भाषा आहे अशी आमची गैरसमजूत झाली आहे. आमच्या देशातील कुठलीही प्रादेशिक भाषा इंग्रजीपेक्षा सर्वार्थाने वरचढ व समृद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात माय, माती, मातृभाषा, आणि मातृभूमी यांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. माय जन्म देते, माती भरण पोषण करते, मातृभूमी आसरा सुरक्षा देते आणि मातृभाषा योग्य असे संस्कार करते. या संस्काराच्या शिदोरीवरच प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखी व संपन्न होते. म्हणूनच किमान प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर तरी शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असले पाहिजे, असे अनेक भाषातज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, माणसशास्त्रज्ञ तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील संस्था ओरडून सांगत आहेत. युनेस्को ही युनोची शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी उपसंस्था आहे. युनेस्कोने केलेल्या संशोधनात मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकलनशक्ती व गुणवत्ता ही मातृभाषेतर माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांपेक्षा किती तरी चांगली व सरस असते असे आढळून आले आहे. माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षांच्या मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या उत्तरपत्रिका तपासणार्‍या अनेक परीक्षकांचा अनुभव असा आहे की इंग्रजी माध्यमांच्या उत्तरपत्रिका स्वछ व नीटनेटक्या असतात परंतु उत्तरे व्यवस्थित व परिपूर्ण नसतात. उलट मराठी माध्यमांच्या उत्तरपत्रिकांत व्यवस्थितपणा नसला तरी उत्तरे सविस्तर व मुद्देसुद असतात. माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांनी माध्यमिक स्तरावर मराठी व इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा तौलनिक आढावा घेतला. यात मराठी माध्यमातून आलेल्या विधार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगली प्रगती केल्याचे आढळून आले आहे. तशीच परिस्थिती वैध्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची आहे. येथेही मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व विषयात नियमित उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सुरुवतीपासून इंग्रजीत शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी अधिक असते.
यवतमाळच्या रस्त्यावर भाजी विकणारी राधाबाई. एक निरक्षर, विधवा महिला. पाच मुली पदरात आणि अठराविश्‍वे दारिद्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लंडवरून तिच्याच समाजातील एक माणूस यवतमाळात उगवला. त्याची बायको नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथेप्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा एका मध्यस्थाने या दोघांचे लग्न लावून दिले. नवीन नवरा राधाबाईला घेऊन बोटीने लंडनला रवाना झाला. राधाबाईने पाचातल्या दोन मुली बरोबर घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले. तिथे परक्या देशात पोहचल्यावर नव्या नवर्‍याच्या मुलांनी हिला ठेवून घ्यायला नकार दिला. भांडणं झाली आणि मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला.
राधाबाई आणि तिच्या मुलींवर एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन राधाबाईच्या नवर्‍याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्या सावत्र मुलांनी ह्या बाईच्या हातात बोटीची तीन तिकिटे आणि पन्नास पौंड ठेवले आणि घराबाहेर काढले, तेही जीवघेण्या हिवाळ्यात. आईच्या हाताला धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द यावर ही अशिक्षित, नऊवारी नेसलेली बाई लंडनच्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. जवळच राहणार्‍या एका भल्या ज्यू माणसाने तिला आपल्या घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते असे विचारले. राधाबाई म्हणाली, स्वयंपाक. त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला, मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला आणि असा आजीबाई वनारसे खानावळ या लंडनमधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडनमध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली. पुढे राधाबाईंनी कॉट बेसिस तत्त्वावर राहायला जागा द्यायला सुरवात केली. असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिद्ध झाली की लंडनला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही. पु. ल., अत्रे, यांच्यापासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेवून गेले. राधाबाई नऊवारी साडी नेसून लंडनच्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत असत. शेवटपर्यंत त्या मराठमोळी नऊवारी साडीच नेसत होत्या. स्टेशनांची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन आले ते विचारून घेत आणि मोजून उतरत असत. राधाबाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडनमध्ये पाच घरे होती. लंडनमधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळही त्यांनीच बांधले. त्यांच्या अंत्ययात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचा मेयर-महापौर हजर होता आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम राधाबाई अशी इंग्रजीतून स्वाक्षरी करीत असत.
जगात कुठेही जाण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व हवेच अशा लोणकढी थापा मारणार्‍या खोटारड्या आणि इंग्रजीचे मानसिक गुलाम बनलेल्या लोकांसाठी वरील उदाहरण नाउमेद करणारे आहे. मायमराठीचे बाळकडू प्यायलेला, किमान प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेला मराठमोळ्या मायीचा कुठलाही लाल जगातल्या कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतो; कुठलेही ज्ञान लीलया आत्मसात करू शकतो. जन्मताच त्याच्या गळ्यात इंग्रजी भाषेचा फास टाकण्याची अजीबात गरज नसते.
सोमनाथ देविदास देशमाने/९७६३६२१८५६