शशिकलांचे सत्तास्वप्न भंगणार!

0
312

१८ आमदार, १० खासदार पन्नीरसेल्वम्‌च्या गोटात
आणखीही काही आमदार बंडाळीच्या तयारीत
वृत्तसंस्था
चेन्नई, १२ फेबु्रवारी
अण्णाद्रमुकमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शनिवारी चार खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांच्याप्रती आपली निष्ठा जाहीर केल्यानंतर आज रविवारी पक्षाच्या आणखी सहा खासदारांनी पन्नीरसेल्वम् यांच्या गटात प्रवेश केला. यात राज्यसभेतील दोन सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, १८ आमदारांनीही पन्नीरसेल्वम् यांच्या गटात प्रवेश केला असल्याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याच्या शशिकला यांचे सत्तेचे स्वप्न भंगण्याचीच शक्यता सध्यातरी दिसत आहे. कारण, २३५ सदस्यीय विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी ११८ सदस्यांचे पाठबळ आवश्यक असून, शशिकला यांच्या गटात सध्या केवळ ११० पेक्षाही कमी सदस्य राहिले आहेत.
या सर्व खासदार व आमदारांनी पन्नीरसेल्वम् यांनाच आपला नेता मानले आहे. पक्षाच्या हंगामी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी ११३ आमदारांना रिसोर्टमध्ये डांबून ठेवले असतानाच पक्षातील खासदार व आमदारांचा कल मात्र पन्नीरसेल्वम् यांच्याकडेच असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
पक्षाचे लोकसभेतील सदस्य जयसिंह तियागराज नट्टेरजी, सेनगुट्टूवन, आर. पी. मरुतराजा आणि एस. राजेंद्रन, तसेच राज्यसभा सदस्य आर. लक्ष्मणन् व व्ही. मैत्रेयन यांनी पन्नीरसेल्वम् हेच आपले नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे खरे वारसदार असल्याचा दावा केला. या खासदारांनी आज सकाळी पन्नीरसेल्वम् यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांना समर्थन दिले.
शनिवारी पी. आर. सुंदरम्, के. अशोक कुमार, व्ही. सत्यभामा आणि वनरोज या खासदारांनी पन्नीरसेल्वम् यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. याशिवाय, राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानेही त्यांच्या गटात प्रवेश केला आहे.
११ आमदारही गेले
दरम्यान, अन्य एका घडामोडीत पक्षाच्या ११ आमदारांनी शशिकला यांचे नेतृत्व झुगारून पन्नीरसेल्वम् यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
२३५ सदस्यीय तामिळनाडू विधानसभेत अण्णाद्रमुकचे १३५ सदस्य असून, यातील सात आमदार पन्नीरसेल्वम् यांच्या गटात आहेत. अण्णाद्रमुकचे लोकसभेत ३७ आणि राज्यसभेत १३ खासदार आहेत.
कोर्टात धाव घेणार : स्वामी
राज्यपाल विद्यासागर राव यांनी उद्या सोमवारपर्यंत तामिळनाडूत सरकार स्थापन करण्याबाबत निर्णय घ्यायलाच हवा. अन्यथा आमदारांच्या खरेदी-विक्रीला वाव दिल्याचा मुद्दा घेऊन आपण न्यायालयात याचिका दाखल करू, अशी भूमिका भाजपाचे खासदार सुब्रमण्यम् यांनी ट्विटरवर विशद केली.
राज्यपालांनी निमंत्रण दिले नाही तर बेमुदत उपोषण
महिला राजकारणात टिकणे कठीणच
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्याला तातडीने सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले नाही, तर आपण जयललिता यांच्या समाधीजवळ बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा अण्णाद्रमुकच्या हंगामी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी दिला आहे. शशिकला यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ते पाठबळ आहे. त्यांनी याबाबत राज्यपालांना पत्रही लिहिले आहे. त्यामुळे राज्यपालांनी शशिकला यांना सत्तेचे निमंत्रण द्यायलाच हवे. हेच त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पूर्ण करावे. शशिकलांना निमंत्रण दिले नाही, तर बेमुदत उपोषण हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे राहणार आहे, असे त्यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले.
महिला राजकारणात टिकणे आजच्या काळात कठीणच आहे. एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर जेव्हा जयललितांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती, त्यावेळी त्यांनाही अशाच स्थितीचा सामना करावा लागला होता. आज जी स्थिती निर्माण झाली आहे, ती माझ्यासाठी नवीन नाही, अशी प्रतिक्रिया शशिकला यांनी रविवारी व्यक्त केली.
माझा पक्ष लोकशाहीवादी आहे. पण, आज पक्षात जे काही घडत आहे, त्यामागे कोण आहे, याची माहिती सर्वांनाच आहे. आमदार आणि खासदार पन्नीरसेल्वम् यांच्या गटात का जात आहेत, हेदेखील आता लपून राहिले नाही, असे शशिकला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता यांनाही पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले होते. आता मला देखील परिश्रम घ्यावे लागणार आहे. अशा प्रकारची नकारात्मक स्थिती माझ्याकरिता नवीन नाही, असे त्या म्हणाल्या.