देशातील पहिला पथदर्शी कार्यक्रम आर्वी तालुक्यात

0
202

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला
४० गावांतील ८,५०० हेक्टरमधील शेतीला पाईप लाईनने पाणी
प्रफुल्ल व्यास/रितेश लुनावत
वर्धा, १२ फेब्रुवारी
कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे पाणी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याऐवजी मातीत मुरले आणि शासकीय अधिकार्‍यांच्या डोळेझाक वृत्तीमुळे अनेक प्रकल्प अर्थवट असून ठेकेदारांचे खिसे गरम झाले. त्यावर उपाय म्हणून सिंचनासाठी पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यावर सरकारने विचार केला असून देशातील पहिला पथदर्शी कार्यक्रम आर्वी तालुक्यात वर्धा नदीवर तयार करण्यात आलेल्या निम्नवर्धा प्रकल्पावर राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून आर्वी ते पुलगावपर्यंत ४० गावांतील ८,५०० हेक्टर शेतीला निम्नवर्धा प्रकल्पाचे पाणी पोहोचणार आहे. त्यासाठी २५१.७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
राज्यात शेकडो प्रकल्प अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. त्यात आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. १७ वर्षांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे पाणी अजूनही शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पोहोचले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली होती. शेतकर्‍यांना लवकरच निम्नवर्धा प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वसन दिले होते. आर्वी येथील असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमीत वानखेडे यांनी निम्नवर्धा प्रकल्पातून शेतकर्‍यांना पाणी मिळून आपल्या मातृ तालुक्यातील शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला असून देशातील २५१.७५ कोटी रुपयांचा हा पथदर्शी प्रकल्प देशात आर्वी तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
यात आर्वी तालुक्यातील इस्माईलपूर, बाजारवाडा, हैबतपूलर, वाठोडा, हसीमपूर, खूपगाव, हर्दली, भडसूर, पाचेगाव, पिपरी, हातला, सावंगी, मिर्झापूर, हरिषवाडा, रोषणपूर, पारगोठान, धनोडी, पडगाव, दिघी, नागापूर, हिवरा, बोथली, गौरखेड, शिरपूर, अंबापूर, रोहणा, वाई, गाजीपूर, हमदापूर, रामपूर, विरुळ (आकाजी), रसूलाबाद, मर्डा, हुसेनपूर, सोरटा, टाकळी, निझामपूर, पिंपळगाव, दर्यापूर, दत्तपूर, आदी ४० गावातील ८,५०० हेक्टरमधील शेतीला पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
आर्वी तालुक्यात पिकांची उत्पादन क्षमता ११९ टक्के असून त्यात कापूस १८ टक्के, सोयाबीन ४० टक्के, ज्वारी ५ टक्के, गहू १० टक्के उत्पादन होत असल्याने या परिसरात आज पाणी मुबकल असले तरी शेतकर्‍यांपर्यंत ते अद्यापही पोहोचू शकले नव्हेत. गेल्या आठवड्यात आर्वी तालुक्यातील बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा प्रश्‍न निकाली निघत नाही तोच पुन्हा आर्वी तालुक्याला या निमित्ताने दुसरा बोनस मिळाला आहे.
पाईपलाईनद्वारे निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याच्या या योजनेमुळे सरकारला शेती अधिग्रहित करावी लागणार नाही. परिणामी, त्यातील अधिकार्‍यांचे दलाल, ठेकेदारांवरही त्याचा वचक बसेल. कालव्यासाठी घेण्यात येणार्‍या जागेचा मोबदला, त्यासाठी होणारे न्यायालयीन खटल्यातून सरकारची मुक्तता होणार आहे. पाटसर्‍यांची दुरुस्ती करणे आदी कामांवर होणारा सरकारचा खर्च वाचणार असून शेतकर्‍यांचीही डोकेदुखी कमी होणार आहे. या पथदर्शी उपक्रमाच्या कामाचा डीपीआर ठरला असून टेेंडरही निघाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आधारकार्डसह अनेक पथदर्शी प्रकल्प राबवल्या गेले असून केंद्र आणि राज्य सरकारने वर्धा जिल्ह्याचे कौतुक केले आहे.