शशी ‘कला’- अंत्यविधीनंतर शपथविधी!

0
213

जयललिताचा मृत्यू संशयास्पद आहे आणि संशयाची सुई एका महिलेवर आहे, असे आजवर दबल्या आवाजात म्हटले जात होते. ती महिला अखेर समोर आली. सारे स्पष्ट झाले. जयललिताची ‘पीए’ म्हणून काम करणारी शशिकला आता तामिळनाडूची मुख्यमंत्री होण्याची तयारी करीत आहे. जयललिताचे निधन होऊन दोन महिने झाले. तिच्यावर उपचार सुरू असताना एकही वैद्यकीय निवेदन जारी करण्यात आले नाही आणि आता तिच्या मृत्युनंतर, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर पत्रपरिषदा घेत आहेत. अशा डॉक्टरांवर कसा विश्‍वास ठेवायचा? जयललिता ही काही शशिकलाची खाजगी मालमत्ता नव्हती. जयललिताला रुग्णालयात दाखल केल्यापासून एकही वैद्यकीय निवेदन जारी करण्यात आले नाही. जयललिताची प्रकृती सुधारत आहे, आज त्यांनी इडली खाल्ली, आज सांबारवडा खाल्ला, आता त्या केव्हाही घरी जाऊ शकतात, असे सांगितले जात होते. आणि हे सारे सारे सहजपणे सांगितले जात होते. ‘मेडिकल बुलेटिन’ नावाचा जो प्रकार आहे तो कधीच झाला नाही आणि अचानक जयललिताची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगितले गेले, तिचे निधन झाले, अंत्यविधी झाला. दोन दिवसांत तिचे मृत्युपत्र समोर आले. सारी संपत्ती शशिकलाला मिळाली.
पहिला संकेत
जयललिताच्या मृत्यूत काहीतरी गडबड आहे, याचा पहिला संकेत, जयललिताचे पार्थिव पाहताच येत होता. ७४ दिवस मृत्यूशी झुंज देणारे ते पार्थिव वाटत नव्हते. चेहर्‍यावर ताजेपणा होता. ७४ दिवस रुग्णालयात दाखल असणार्‍या व्यक्तीच्या चेहर्‍यावर ताजेपणा कसा राहू शकतो? जयललिताचे निकटवर्ती तिच्यावर विषप्रयोग करत आहेत, याची चर्चा उच्चपदस्थांमध्ये मागील काही वर्षांपासून केली जात होती. हा विषप्रयोग म्हणजे तिला विष वगैरे न देता चुकीची औषधे दिली जात होती. त्याचे सारे सूत्रसंचालन शशिकला करीत होती. विधानसभा निवडणुका झाल्या. पाच वर्षांची सत्ता मिळाली आणि चार महिन्यातच जयललिता आजारी पडते, सरळ अपोलो रुग्णालयात आणि नंतर तिचे पार्थिवच बाहेर येते. दोन महिन्यात शशिकलाच्या शपथविधीची तयारी.
एक सुनियोजित हत्या
जयललिताचा मृत्यू सुनियोजित हत्या मानली जावी, एवढा हा सारा प्रकार संशयास्पद आहे आणि त्या संशयाला बळकटी देत आहे शशिकलाचे वर्तन! जयललिता आजारी असताना एकाही नेत्याला तिला भेटू देण्यात आले नाही. तिच्यावर कोणते उपचार केले जात आहेत, हे कधी सांगण्यात आले नाही. शशिकला व तिचा पायाळयंत्री पती डॉ. नटराजन् या दोघांनी जयललिताचा ताबा घेतला होता. तिच्यावर सौम्य विषप्रयोग सुरू झाले होते. पण, आयुष्यात एकाकी पडलेल्या जयललिताला काहीच करता आले नाही. सारे निर्णय शशिकला करत होती. जयललिता नामधारी मुख्यमंत्री होती, सारे अधिकार शशिकलाकडे होते. जयललिताला गुंगीची औषधे देण्यापर्यंत शशिकलाची मजल गेली होती. ते सारे आता समोर येत आहे आणि येणार्‍या काळात आणखीही काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
अण्णाद्रमुकची मजबुरी
तामिळनाडूत अण्णाद्रमुकचे खासदार-आमदार शशिकलाच्या बाजूने आहेत हे खरे आहे. याची दोन कारणे आहेत. जयललिता मुख्यमंत्री असतानाही सारे निर्णय शशिकला घेत होती. त्यामुळे प्रत्येक खासदार-आमदाराशी तिचा व्यक्तिगत संपर्क व संबध आहे आणि दुसरे कारण म्हणजे जयललिताच्या निधनानंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. प्रत्येक नेत्यास मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. ते शक्य नसल्याने त्यांनी शशिकलास पाठिंबा दिलेला आहे. मात्र, जनतेत व अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांमध्ये यावर नाराजी आहे. शशिकला मुख्यमंत्री झाली, तरी तिचे ते पद टिकण्याची शक्यता कमी आहे. शशिकलाची जागा कुठे आहे, हे जनताच तिला दाखवून देईल!
शशी ‘कला’
राजकीय पक्ष- नेते यांच्यात परस्परांचे राजकारण संपविण्याची कला असतेच. मात्र, आपल्या नेत्याचे आयुष्यच संपविण्याची एक नवी कला तामिळनाडूत दिसत आहे आणि ही कला आहे शशी ‘कला!’
कॉंग्रेसचा संताप
कॉंग्रेस उपाध्यक्ष संसदभवनात बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात ते कॉंग्रेसला मान्य आहे आणि आता मोदी राज्यसभेतील भाषणात, रेनकोट घालून आंघोळ कशी करावी हे मनमोहनसिंग यांच्याकडूनच शिकावे, असे विधान करतात, त्याने कॉंग्रेसमध्ये भूकंप होतो, वादळ-वादंग होते. मोदी यांच्यावर बहिष्काराची भाषा उच्चारली जाते.
मोदी आपल्या भाषणात काही चुकीचे बोलले आहेत असे वाटत नाही. भारतात सर्वात मोठे घोटाळे मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात झाले आणि तरीही त्यांच्यावर एक शिंतोडा कसा उडला नाही, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. राजधानीत एक हत्या वा बलात्कार झाला की, गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला जातो, रेल्वेचा अपघात झाला की रेल्वेमंत्र्याचा राजीनामा मागितला जातो. पण, मनमोहनसिंग यांच्या बाबतीत तसे झाले नाही.
घोटाळा युग!
१९९१ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाले. खातेवाटप होण्यास विलंब होत होता. पंतप्रधान व अन्य मंत्र्यांचा शपथविधी होऊन ७२ तास उलटले होते, तरीही खातेवाटप झाले नव्हते. फक्त एका मंत्र्याने आपल्या विभागात जाऊन काम करणे सुरू केले होते व ते मंत्री होते मनमोहनसिंग! नॉर्थ ब्लॉकमध्ये जाऊन त्यांनी अर्थमंत्रालयाचे महत्त्वाचे निर्णय घेणे सुुरू केले होते. मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना पहिला मोठा घोटाळा झाला- हर्षद मेहता घोटाळा- मुंबई शेअर बाजार घोटाळा! यात चार हजार कोटींची लूट झाली. २५ वर्षांपूर्वी ४००० कोटी रुपये म्हणजे आजच्या काळात ४० हजार कोटी रुपये! या घोटाळ्यासमोर बोफोर्स वगैरे काहीच नव्हते. याचा परिणाम म्हणजे शेअर बाजार कोसळला. अनेकांचे पैसे बुडाले. काहींनी आत्महत्या केल्या. घोटाळ्याची चौकशी सुुुरू झाली. संयुक्त सांसदीय समिती स्थापन झाली आणि या घोटाळ्यातून मनमोहनसिंग एकदम स्वच्छ होऊन बाहेर पडले. हा घोटाळा कसा झाला, हे आजवर कळलेले नाही.
मनमोहनसिंग पंतप्रधान झाले आणि घोटाळ्यांची संख्या वाढू लागली. स्पेक्ट्रम, २-जी, इस्रो, कोळसा, कॉमनवेल्थ घोटाळा ही एक मालिका आहे. म्हणजे देशात आजवरचा सर्वात स्वच्छ पंतप्रधान सत्तेवर असताना त्याच्याच कार्यकाळात सर्वाधिक घोटाळे झाले. देशात खासदारांची खरेदी-विक्री अनेकदा झाली. पण, मनमोहनसिंग पंतप्रधान असताना खासदारांची खरेदी खुलेआम झाली. मनमोहनसिंग यांचा अंतरात्मा कधीच जागा झाला नाही काय? मनमोहनसिंग स्वच्छ आहेत, तर हे सारे घोटाळे झाले कसे? म्हणूनच मोदी म्हणतात ते बरोबर आहे. मनमोहनसिंग यांच्या आजूबाजूला घोटाळ्यांचा चिखल उडत असताना, एकही शिंतोडा मनमोहनसिंग यांच्यावर उडला नाही. याचे कसब फक्त तेच जाणू शकतात! मोदी यांच्या या उपरोधिक टोमण्याचा अर्थ कॉंग्रेस सदस्यांच्या लक्षात आला असावा आणि त्यानंतर मोदींच्या विधानाचा विरोध सुरू झााला.
राहुलचा सल्ला
मोदी यांनी माजी पंतप्रधानाबद्दल शालीनतेने बोलण्यास शिकावे, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. कॉंगेे्रसनेही, संसदेतील मोदींच्या भाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राहुल गांधींनी संसदभवनात मोदींवर व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेव्हा कॉंग्रेस मौन का राहिली? म्हणजे राहुल गांधी मोदींवर भ्रष्टाचाराचे सरळ आरोप करणार ते चांगले आणि मोदींनी मनमोहनसिंगांना रेनकोट म्हणताच ते झोंबणार? कॉंग्रेसने ही दुटप्पी फुटपट्‌टी लावू नये. ज्या मोदींना कारागृहात टाकण्याचा निकराचा प्रयत्न मनमोहनसिंग सरकार व कॉंग्रेसने केला, त्यांना मोदी पंतप्रधानपदावर आसीन असणे या पक्षाला कसे पचणार?

रवींद्र दाणी