वाचकांचे मनोगत

0
106

क्रांतिकारकांची आठवण ठेवा!
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांना २३ फेब्रुवारीला फाशीची शिक्षा झाली. आम्ही त्यांचे स्मरण न करता, या दिवसाच्या आठवडाभर आधी परदेशी संस्कृतीने बरबटलेला व्हॅलेंटाईन डे म्हणून आनंद साजरा करतो, हे या देशाचे केवढे मोठे दुर्दैव! नवीन पिढीचे जर हेच विचार असतील, तर या देशाची संस्कृती बासनात बांधायची काय? वास्तविक, प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही या देशाचे नागरिक असू, तर प्रथम त्या हुताम्यांना अभिवादन करणे आमचे कर्तव्य ठरते, हे नवीन पिढीने लक्षात ठेवावे!
अमोल करकरे
पनवेल
मातोश्री रमाईवर चित्रपट काढावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात- त्यांच्या सुखदु:खात- समर्थपणे साथ देणार्‍या मातोश्री रमाई यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा एखादा चांगला चित्रपट निघावा, अशी इच्छा आहे. डॉ. आंबेडकर यांनी स्वत: असे म्हटले होते की, चळवळीमुळे रमाईकडे माझे दुर्लक्ष झाले, याचे मला फार दु:ख होते. रमाईंनी रात्रंदिवस मेहनत करून एकटीने संसार चालविला, पण आंबेडकरांना नाउमेद केले नाही. त्यांच्यावर शासनाने चित्रपट काढावा, अशी विनंती आहे.
लक्ष्मणराव दांडगे
नागपू
भक्त आणि पुजारी
देशातील प्रसिद्ध देवालये, मंदिरात भक्तिभावाने देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांना दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला आहे. देव आणि भक्त यांच्या संवादात अडथळा नको, असे त्यांनी पुजारीवर्गाला सुनावले आहे. मोठ्या मंंदिरातील अनुभव असा आहे की, तासन्‌तास रांगेत उभे राहिल्यानंतर जेव्हा देवदर्शनाचा क्षण येतो, तेव्हा हेच पुजारी बळजबरी केल्याप्रमाणे निकलो, निकलो, असे बजावून पाच सेकंदही तेथे उभे राहू देत नाहीत आणि धड देवदर्शनही करू देत नाहीत. पुजारीवर्गाने धडा घ्यावा.
रमेश वाढवे
यवतमाळ
केेवढी ही शोकांतिका!
एका गरीब महिलेल्या घरात वानरांच्या सतत धुमाकूळ घालण्यामुळे असह्य होऊन तिने आत्महत्या करण्याची घटना विषण्ण करून गेली. एकीकडे प्राणी संरक्षक संघटना प्राण्यांना मारण्यास विरोध करतात, पण ते उपद्रवी कुत्रे आणि वानरांच्या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी कधीही मदत करीत नाही. त्यांना फक्त सरकारी अनुदान तेवढे लाटायचे असते. एकीकडे लोकांचा जीव जात असताना, दुसरीकडे हे एनजीओ गब्बर झाले आहेत. सरकारनेच आता याकडे लक्ष देऊन जनतेच्या जीविताचे रक्षण केले पाहिजे.
अमोल पाटील
नागपूर
अ. ल. देशपांडे यांची दिलगिरी
११ फेब्रु.च्या अंकातील ‘एक सर्वांगसुंदर कार्यक्रम’ या माझ्या लेखात माझ्याकडून एक चूक झाली आहे. ‘डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर यांच्या संस्कृत व संगणक या व्याख्यानाची सुरुवात देववाणीतून झाली व बाकी सर्व व्याख्यान बहुसंख्य श्रोत्यांची अडचण लक्षात घेऊन मराठीतच झाले. त्यावर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले,’ असे वाचावे.
अ. ल. देशपांडे
अमरावती