५१४ एमबीबीएस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

व्यापमं घोटाळेबाजांना ‘सुप्रीम’ झटका

0
185

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १३ फेबु्रवारी
मध्यप्रदेशातील प्रचंड गाजलेल्या व्यावसायिक सेवा परीक्षा मंडळातील (व्यापमं) भरती घोटाळ्याच्या २००८ ते २०१२ या काळातील पाचशेपेक्षा जास्त एमबीबीएस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी दिला आहे.
परीक्षांमध्ये बोगस विद्यार्थी बसविणे, पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे व प्रवेश किंवा नोकरी मिळवून देणे यासारखे गैरव्यवहार या घोटाळ्यात आढळून आले होते. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने यात दोषी आढळलेल्या ५१४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी करताना सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायासनाने, २००८ ते २०१२ या कालावधीत एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतलेल्या ५१४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा आदेश दिला. या सर्वांनी एमबीबीएसच्या पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
व्यापमं घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयला मोठे यश आले आहे. देशभरातील ९.५ लाख विद्यार्थ्यांमधून सीबीआयने १२१ बोगस परीक्षार्थी शोधून काढले होते. हे सर्व अन्य विद्यार्थ्यांच्या नावाखाली परीक्षेला बसले होते.
व्यापमं घोटाळ्याचे वृत्तसंकलन करणार्‍या एका पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शिवाय जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि एका महिला पोलिस शिपायाने आत्महत्या केली होती.