वाचकांचे मनोगत

0
91

केंद्र देणार तीन लाख नोकर्‍या
सुशिक्षित बेरोजगारांसाठी नुकतीच आनंदाची बातमी तभात झळकली. केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील तीन लाख पदे पुढील वर्षी भरल्या जातील, असे या बातमीत म्हटले आहे. तीन लाख ही संख्या लहान नाही. यामुळे किमान तीन लाख लोकांना केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळणार आहे. तीन लाख लोकांना नोकरी म्हणजे सात लाख लोकांचे जीवनमान उंचावणे होय. मोदी सरकार आपल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. मोदी सरकारचे अभिनंदन.
विशाल पटवर्धन
नागपूर
एसएफआयचा खरा चेहरा उघड
डाव्या विचारसरणीचे लोक किती जातीयवादी आहेत, हे तभातील वृत्ताने लक्षात आले. हैदराबाद विद्यापीठ असो की, कोट्टायममधील महात्मा गांधी विद्यापीठ, तेथील दलित आणि ओबीसी विद्यार्थी, प्राध्यापक यांना जातीय विद्वेषाची वागणूक देणारी एसएफआय ही डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना किती जातीयवादी आहे, याचा दुसरा चेहराही समोर आला. आमचीच विचारसरणी माना अथवा छळाला सामोरे जा, असा त्यांचा अट्टहास आहे. दलित, ओबीसी विद्यार्थ्यांनी आतातरी सावध असावे.
प्रकाश गजभिये
वर्धा
शिवसेनेच्या माजी महापौर कोट्यधीश!
शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांची पाच वर्षात एक कोटीची संपत्ती २५ कोटीपर्यंत वाढल्याचे वृत्त वाहिन्यांवर पाहिले आणि शिवसेनेचा जीव त्या मुंबई महापालिकेत कशासाठी आहे, याचा उलगडा झाला. जर महापौरच पाच वर्षांत २५ पटीने संपत्ती गोळा करीत असेल, तर अन्य नेत्यांनी किती जमा केली असेल, याची कल्पनाही करवत नाही. भाजपा सरकारने या सर्व लोकांची चौकशी केली पाहिजे.
विवेक देशमुख
नागपूर
आठवलेंचा थयथयाट
रिप. पक्षाचे खा. रामदास आठवले यांना भाजपा सरकारने आपल्या कोट्यातून खासदारकी दिली, केंद्रात मंत्रिपद दिले तरीही ते भाजपाला ब्लॅकमेल करीत आहेत. मनपा आणि जिप निवडणुकीची इतकीच तिकिटे पाहिजे, असा आग्रह त्यांनी केला. आधी आठवलेंनी राज्यात आपली शक्ती किती आहे, आपण स्वबळावर एक आमदार तरी निवडून आणू शकतो का, याचा आधी तपास घ्यावा आणि नंतरच ब्लॅकमेल करावे. किंवा मग थेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
अमोल पाटील
नागपूर
उद्धव ठाकरे यांचा विदर्भद्वेष
कोणत्याही निवडणुका आल्या की, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना एक साक्षात्कार होतो व ते भाजपावर बालिश आरोप लावत असतात. यांना एकसंध महाराष्ट्र नको आहे, यांना विदर्भ वेगळा करायचा आहे वगैरे. आतापर्यंत दहादा हे ऐकले आहे. पण, उद्धवजी तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार असाल तर विदर्भात येऊन आमचा विदर्भाला तीव्र विरोध आहे, हे एकदाचे सांगून टाकावे. म्हणजे विदर्भातील शिवसेनेचे काय करायचे ते इथली जनता पाहून घेईल. उगीच वल्गना करण्यात काहीही अर्थ नाही.
पुरुषोत्तम जाधव
नागपूर