शशिकलांना चार वर्षांची शिक्षा

0
207

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल
– चिनम्मांना अटक; सत्तेचे स्वप्न भंगले
– तामिळनाडूत राजकीय भूकंप
वृत्तसंस्था
नवी दिल्ली/चेन्नई, १४ फेबु्रवारी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी बाशिंग बांधून सज्ज असलेल्या अण्णाद्रमुकच्या हंगामी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्या सत्तेच्या स्वप्नांचा पुरता चुराडा झाला आहे. सुमारे ६० कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी दोषी ठरविताना, चार वर्षांचा कारावास ठोठावला. तामिळनाडूतील राजकारणात भूकंप आणणार्‍या न्यायालयाच्या या निकालामुळे शशिकला यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही आणि १० वर्षे मुख्यमंत्रिपदी विराजमानही होता येणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् आणि शशिकला यांच्यात सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचला होता. यामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. आपल्या समर्थक आमदारांना शशिकला यांनी एका रिसोर्टवर डांबून ठेवले असतानाही त्यांच्या गटात दररोज फूट पडत होती.
शशिकला यांना बेहिशेबी संपत्ती प्रकरणातून निर्दोष मुक्त करणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश चुकीचाच होता. आमच्यापुढे जे पुरावे आणि दस्तावेज सादर करण्यात आले, त्या आधारावर आम्ही हा आदेश रद्द ठरवित आहोत. विशेष न्यायालयाने शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आम्ही ती कायम ठेवत असून, ही शिक्षा भोगण्यासाठी शशिकला यांना शरण येण्याचा आदेश देत आहोत, असे न्या. पी. सी. घोष आणि न्या. अमितवा रॉय यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
या प्रकरणात जयललिता या देखील दोषी आहेत. पण, त्यांचे निधन झाले असल्याने आम्ही त्यांच्यावरील कारवाई रद्द करीत आहोत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचाही समावेश असलेले हे प्रकरण १९ वर्षे जुने आहे. बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने या प्रकरणी जो निकाल दिला होता, तो आम्ही कायम ठेवत आहोत. विशेष न्यायालयाने शशिकला यांच्यासोबतच त्यांचे दोन नातेवाईक व्ही. एन. सुधारकन आणि इलावारसी यांनाही दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यामुळे शशिकला यांच्यासोबत त्यांच्या दोन नातेवाईकांनाही अटक करण्यात येणार आहे.
दरम्यान, शशिकला यांनी या प्रकरणात आधीच सहा महिन्यांची शिक्षा भोगली असल्यामुळे त्यांना आता साडे तीन वर्षांचीच शिक्षा भोगावी लागणार आहे.
पोलिसांची तातडीने कारवाई
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जारी होताच, पोलिसांनी तातडीने रिसोर्टच्या आत प्रवेश केला आणि शशिकला यांना अटक केली. न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याची जाणीव आधीपासूनच असल्याने शशिकला सोमवारपासून रिसोर्टमध्येच होत्या. न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने रिसोर्टच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. चेन्नई व अन्य शहरांमध्येही तगडी सुरक्षा होती.
शशिकला यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रिसोर्टच्या आत प्रवेश करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. पण, तिथे मोठ्या संख्येत उपस्थित असलेले कार्यकर्ते प्रतिकार करीत होते. यावेळी शशिकला रिसोर्टमधील एका खोलीत आमदारांसोबत बैठक घेत होत्या. कार्यकर्त्यांचा प्रतिकार मोडीत काढून पोलिस आत घुसले आणि शशिकला यांना अटक केली.

अवघ्या आठ मिनिटांत निकाल
न्या. घोष आणि न्या. रॉय सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी आपल्या कक्षात आले. वकील आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. न्यायालयातील कर्मचार्‍यांनी निकालाचे सीलबंद दस्तावेज त्यांच्यापुढे खुले केले. यानंतर दोन्ही न्यायमूर्तींनी काही क्षण एकमेकांशी चर्चा केली. यावेळी न्यायालयात कमालीची शांतता होती. न्या. घोष यांनी लगेच आपला निकाल वाचून दाखविण्यास सुरुवात केली आणि १० वाजून ४० मिनिटांनी निकालाचे वाचन पूर्ण झाले. आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार कदापि मान्य करणार नाही, असे न्या. घोष निकालाच्या शेवटी म्हणाले. त्यानंतर लगेच न्यायालयीन कक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

द्रमुककडून स्वागत
बेहिशेबी संपत्ती प्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असाच आहे. आम्ही या निकालाचे स्वागत करतो, असे द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन म्हणाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यात आता स्थिर सरकार स्थापन करण्याच्या दिशेने तातडीने पावले उचलावी, असे आवाहनही त्यांनी केले. तब्बल दोन दशकानंतर निकाल आला असला, तरी तो ऐतिहासिकच आहे. राजकारण्यांनी सार्वजनिक जीवनात कसे राहायला हवे, हाच धडा या निकालातून मिळतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शशिकला खटल्याचा घटनाक्रम
– १९९६ मध्ये हा खटला दाखल झाला होता. जयललिता यांनी ज्ञात स्रोतापेक्षा ६६ कोटी रुपयांची जास्त संपत्ती जमा केला असल्याचा आरोप होता.
– बनावट कंपन्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप जयललितांवर ठेवण्यात आला. त्यांच्यासोबत शशिकला, त्यांचा मुलगा सुधाकरन आणि भाची इल्वारासी यांनाही आरोपी करण्यात आले.
– जयललितांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या धाडीत ८८० किलो चांदी, २८ किलो सोने, १०,५०० साड्या, ७५० चपलांचे जोड, ९१ घड्याळे आणि अन्य महागड्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
– २००२ मध्ये जयललिता मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा खटला कर्नाटकात वर्ग केला.
– बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने २७ सप्टेंबर २०१४ रोजी जयललितांना चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, शशिकला, इल्वारासी आणि सुधाकरन यांनाही चार वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर चौघांचीही तातडीने तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
– ११ मे २०१५ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याचे सांगताना चौघांचीही निर्दोष मुक्तता केली होती. जयललिता तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पन्नीरसेल्वम् यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अम्मांची सुटका होताच पन्नीरसेल्वम् यांनी राजीनामा दिला.

शरण जाण्यासाठी चार आठवडे मागणार
सर्वोच्च न्यायालयाने शशिकल यांना तातडीने शरण येण्याचा आदेश दिला असला, तरी शशिकला यासाठी किमान चार आठवड्यांचा अवधी मागण्याची शक्यता आहे. त्यांच्यावतीने उद्या बुधवारी याबाबतची याचिका दाखल केली जाणार आहे. चार आठवड्यांची मुदत मागण्यासाठी शशिकला आपल्या प्रकृतीचे कारणही देऊ शकतात, असे त्यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले.
‘‘मतभेद बाजूला ठेवा
-पन्नीरसेल्वम्
दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम् यांनी पक्षातील सर्व आमदारांना मतभेद बाजूला ठेवण्याचे व पक्ष मजबूत करण्यासाठी एकत्र काम करून अम्माची सत्ता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. अम्मांची धोरणे व योजना यापुढेही कायम सुरू राहतील. कायदा व सुव्यवस्था राखणे आपली जबाबदारी आहे. मला पाठिंबा देणार्‍या सर्व नेते, कार्यकर्ते व तरुणांचे मी आभार मानतो, असे पन्नीरसेल्वम् यांनी म्हटले आहे.’’
शशिकलांनी नेहमीच अम्मांचा भार उचलला : अण्णाद्रमुक
दरम्यान, न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना, शशिकला यांनी आजवर नेहमीच जयललिता यांचा भार आपल्या खांद्यावर उचलला असल्याचे अण्णाद्रमुकने म्हटले आहे. जयललितांवर जेव्हा जेव्हा एखादे ओझे आले, त्या प्रत्येक वेळी शशिकला यांनीच ते ओझे उचलले आहे. आताही त्यांनी तेच केले, असे पक्षाच्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे.
निवडणूक लढण्यास अपात्र
न्यायालयाच्या या निकालामुळे शशिकला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरल्या आहेत. याशिवाय, त्या ज्या दिवशी कारागृहातून बाहेर येतील, त्यानंतरचे सहा वर्षे त्या मुख्यमंत्रिपदीही विराजमान होऊ शकणार नाहीत. लोकप्रतिनिधी कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्यानंतर त्यात याबाबतची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.
वेळ लागला, पण यश मिळाले : स्वामी
मी २० वर्षांपूर्वी दाखल केलेल्या खटल्याचा अंतिम निकाल आज अखेर आला आहे. दीर्घ प्रतीक्षा केली, पण मला यश मिळाले आहे. भ्रष्टाचार कोणत्याही पक्षाचा असो, न्यायालयाने आजवर नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी व्यक्त केली. १९९६ मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष असताना स्वामी यांनी सर्वप्रथम हा खटला दाखल केला होता.