कामगार अधिकारी संध्या पेंदोर एसीबीच्या जाळ्यात

0
82

तभा वृत्तसेवा
गडचिरोली, १४ फेब्रुवारी
न्यायालयात प्रकरण दाखल न करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी येथील सरकारी कामगार अधिकारी संध्या देवराव पेंदोर यांना मंगळवार, १४ फेब्रुवारीला रंगेहाथ पकडल्याने येथे खळबळ माजली.
तक्रारदार गडचिरोली शहरानजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर लिमिटेड कंपनीत कंत्राटदार म्हणून वीज तयार करणे व इतर कामांसाठी कामगार पुरविण्याचे व त्यांना मजुरी देण्याचे काम कमिशनवर करीत असून त्याच्याविरुद्ध किमान वेतन अधिनियम १९४८, किमान घरभाडे अधिनियम १९८३ व वेतन प्रदान अधिनियम १९६३ अन्वये कारवाई करण्यात आली होती.
त्याच्याविरुद्ध झालेल्या कारवाईबाबत तक्रारदाराने गडचिरोलीच्या सरकारी कामगार अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) संध्या पेंदोर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरील अधिनियमांतर्गत केलेल्या निरीक्षण शेर्‍यात नमूद त्रुटीबाबत तक्रारदाराविरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.
पेंदोर यांनी मागितलेली रक्कम देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्यानी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवार, १४ रोजी सापळा रचला. दरम्यान, सरकारी कामगार अधिकारी श्रीमती संध्या पेंदोर यांना ५० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये पेंदोर यांच्याविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव टेकाम, पोलिस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, मिलिंद गेडाम, महेश कुकूडकर, महिला पोलिस शिपाई सोनल आत्राम, चालक पोलिस शिपाई घनश्याम वडेट्टीवार यांनी केली आहे.