पाकिस्तानात बंदी, मग भारतात का नाही?

0
117

मनोगत
व्हॅलेंटाईन डे काल सगळीकडे साजरा झाला. पण, आपल्या शेजारच्या पाकिस्तानात तिथल्या कोर्टाने बंदी घातल्यामुळे तो साजरा झाला नाही. पाकिस्तानचे कोर्ट बंदी घालते आणि तिथले सरकार कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करते. तसे भारतात का होत नाही. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे हे गैरइस्लामी आहे आणि म्हणून त्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका एका नागरिकाने दाखल केली व कोर्टाने लागलीच आदेशही दिला. आपल्याकडे अशी याचिका दाखल करणार्‍याला लागलीच प्रतिगामी ठरविले जाते. स्वत:ला पुरोगामी म्हणविणार्‍यांनी जरा पाकिस्तानी कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवून दाखवावा.
बाळासाहेब काटे
नागपूर

पाठिंबा काढाच
राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने भाजपावर टीका करत असते. आता भाजपानेही सेनेला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते जास्तच आगपाखड करीत आहेत. शिवसेनेने तर आता फडणवीस सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेत हिंमत असेल तर त्या पक्षाने एकदाचा पाठिंबा काढूनच घ्यावा. होऊन जाऊ द्या मध्यावधी निवडणुका, बघू या मग कोण पुन्हा सत्तेत येते आणि कोण घरी बसते ते. रोजरोजच्या कटकटीपेक्षा एकदाचा काडीमोड झालेलाच बरा.
जीवन के. राजकारणे
महाल, नागपूर

अभिनंदन!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग १९ कसोटी सामने जिंकून एक विक्रम केला आहे. शिवाय, सलग चार मालिकांमध्ये द्विशतक झळकावून विराट कोहलीनेही एक विक्रमच केला आहे. या दमदार कामगिरीसाठी विराट कोहलीचे आणि भारतीय संघाचे मन:पूर्वक अभिनंदन.
चंद्रशेखर नागनाथ जोशी
मेहकर

मतदान करा
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण नेहमी फक्त आपल्या अधिकारांबाबत जागरूक असतो. कर्तव्याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यामुळे राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. योग्य उमेदवार निवडून पाठविण्याची संधी आपल्याला घटेनेने उपलब्ध करून दिली आहे. तिचा लाभ घेतला पाहिजे. अन्यथा, पश्‍चात्तापाशिवाय काहीही हाती राहणार नाही. त्यामुळे मतदान हे केलेच पाहिजे. सुटी न उपभोगता स्वत:ही मतदान करा, इतरांनाही त्यासाठी आग्रह करा.
प्रा. धनंजय किंबहुने
बुलडाणा

पवार टपलेलेच!
सत्तेबाहेर शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची अवस्था ही पाण्याबाहेर मासोळीची होते तशी झाली आहे. त्यामुळे शिवसेना पाठिंबा केव्हा काढते आणि सरकार केव्हा पडते याची शरद पवार वाटच पाहात आहेत. त्यांना सत्तासुंदरीशिवाय करमेनासे झाले आहे. त्यामुळेच ते मध्यावधी निवडणुकीचे भाकीत करीत आहेत. त्यांचे भाकीत खरे ठरू नये, यासाठी हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या भाजपा-शिवसेनेने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
राम वसंत आमले
डोणगाव