विषय भाषा, एक समस्या की तपस्या?

0
166

प्रासंगिक
भाषा एक साधा, सोपा, सरळ शब्द. अगदी बालपणापासून अंगवळणी पडलेला, पण केवढे महान सामर्थ्य या शब्दात आहे याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. साहित्य संमेलनातही ती गाजते, वाजते. अनेकांच्या भिवया उंचावते, तर काहींच्या ओठातले हसू ओघळायला लावते. काहींना हसवते, त्याच क्षणी काहींना रडायला लावते. म्हटलं तर महान, नाहीतर लहान, पण अचाट सामर्थ्य भाषेत आहे हे सर्व मानतात. पण ज्यावेळेला ती एक विषय म्हणून शिकवली जातेे, तेव्हा तिची होणारी परवड मनाला वेदना देते. अति परिचयामुळे अवज्ञा होत असावी, असा माझा समज आहे.
घडले असे की, भाषा विषयाचे एक प्राध्यापक सकाळी भेटायला घरी कॉलेजमधून आले. आज तास नाहीत काय म्हणून मी सहज विचारणा केली. ते म्हणाले, दोन तास होते. पण एकही विद्यार्थी या मराठी भाषेच्या तासाला बसत नाही. जिथे मुख्य विषयालाच विद्यार्थी येत नाही, तर आमच्या विषयाला कोण येणार? अगदी निर्धास्तपणाने त्याचे हे निवेदन ऐकून मी अस्वस्थ झालो. कारण भाषा शिकवण्याचा आणि शिकण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. याचा अनुभव मी घेतला आहे. भलेही काळ बदलला, संगणक युग आले, घरे मुकी व्हायला लागली, माणसे अबोल झाली तरी भाषा ही जगायलाच पाहिजे.
माणसाच्या कातडीचा (त्वचेचा) शरीराशी जेवढा अविभाज्य संबंध आहे, तेवढाच भाषेचाही आहे. भाषा केवळ विचार व्यक्त करण्याचे साधन नाही किंवा देवाणघेवाण एवढीच निर्जीव प्रक्रिया नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अक्षय अशी ही महत्त्वपूर्ण ठेव आहे. कधीही न संपणारी ती शिदोरी आहे. जडणघडणीचे महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील उपयुक्त गाभा आहे. कमळात जर पराग आणि मकरंद नसेल तर भुंगे त्याच्याकडे वळतील काय? भाषेचे सामर्थ्य अतुलनीयच आहे.
कॉलेजमधून घरी जाताना एखाद्या चौकात वक्त्याचे होत असलेले भाषण कानावर पडते. घराची ओढ असली तरी पाय सहजपणे तिकडे वळतात. बेभान होऊन वक्ता बोलत असतो- ‘‘आम्ही सामान्य माणसे छत्रपती शिवरायांपासून अनेक महापुरुषांना आपल्या फुटपट्टीने मोजतो आणि मग दूषणे लावतो. अरे शिवाजीचे मोजमाप करायचे असेल तर त्यांची थोडीतरी उंची गाठा. मग जिभेला बोलती करा. बोलता येते म्हणून आपली बुद्धी आणि सुंदर भाषा भ्रष्ट करू नका.’’ आपले मन सुन्न होते. आतला आवाज बोलायला लागतो. संस्काराप्रमाणे विचारचक्र सुरू होते. घरी कसे पोहोचलो तेही कळत नाही. सोफ्यावर बसल्यावर त्या जोशपूर्ण भाषण देणार्‍या वक्त्याचेच शब्द कानात घुमत राहातात. काय वक्तृत्वशैली आहे, हे शब्द ओठी येतात.
सोफ्यावर बसल्यावर टीव्ही ऑन केला. आधुनिक वाल्मीकि ग. दि. माडगुळकरांचे गीतरामायण सुरू होते. ‘नच स्विकारा धना कांचना | नको दान रे नको दक्षिणा ॥ काय धनाचे मूल्य मुनिजना | अवघ्या आशा श्रीरामार्पण.’ हे काव्य ऐकताना भाषा विषय शिकवण्या मिळवून देत नाही, ही एका प्राध्यापकाची प्रस्तावना डोक्यात घोळत होती. सर्वच गोष्टी अर्थशास्त्रात तोलायच्या असतात काय? काही भावना, काही मूल्यही जीवनात असणे अनिवार्य नाही काय? मृतप्राय झालेली हिब्रू भाषा राष्ट्रभक्त इस्रायली लोकांनी राष्ट्र निर्माण करताच किती जोमाने, उत्साहाने जिवंत केली. यहूदाने हिब्रू शब्दकोशाचे सतरा खंड संपादित केले. १९४८ साली इस्रायल स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आले आणि त्यांनी आपली भाषा राजसिंहासनावर राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठापित केली. मनात उमंग, अंत:करणात ध्येयनिष्ठा आणि माणसात आत्मशक्तीचे बळ असले की काय चमत्कार घडू शकतो, याचे आधुनिक उदाहरण इस्रायल आहे.
गीतरामायणातील ओघवती, अर्थपूर्ण आणि भक्तिरसात ओथंबलेले शब्द मनात घर करतात. ओठावर रुळायला लागतात, विचारांना आव्हान देतात आणि भावनांना बोलते करतात. याला प्रतिभा म्हणतात. सुसंवादी शब्द आणि अर्थगर्भ रचना ही तपश्‍चर्येतूनच घडत असते. ज्यांचे बोलणे, भाषण, लेखन, काव्यरचना याची शेकडो वर्षे मानवी जीवनावर छाप पडते ते लेखक, कवी, भाषेचे प्राध्यापक एका रात्रीतून घडत नाहीत. कापसासारखी पिंजलेली मुलायम आणि रेशमी धाग्यासारखी परिष्कृत, संस्कारित नाजूक साजूक पण, परिणामकारी भाषेची शब्दफेक ही साधनेतूनच जन्माला येत असते.
प्रतिभेची देणगी असली तरी ती प्रतिभा आंजरावी, गोंजरावी लागते. मग ती फुलते.
मातीत ते पसरले अति रम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघडी पद लांबविले
हे एका बाण लागलेल्या आणि मरणघटका मोजणार्‍या पक्षिणीचे कवी टिळकांनी किती हुबेहुब वर्णन केले आहे. बाबा आमटेंची ही अभिव्यक्ती पहा. ते म्हणतात- ‘मी श्रीमंती मागितली सुखी होता यावं म्हणून| मला दारिद्र्य मिळालं मी शहाणं व्हावं म्हणून॥ मी सामर्थ्य मागितलं माझा जयजयकार व्हावा म्हणून! मी दुबळा झालो ईश्‍वराची आठवण व्हावी म्हणून॥ मागितलं ते कधी मिळालं नाही| मिळालं ते भोगल्यावाचून राहिलं नाही॥ मुक्या प्रार्थनांना होकार आले| अन् दु:खच माझ्या सुखाचे साक्षीदार झाले. ही साधी सोपी शब्दरचना पण ती कागदावर उतरायला साधना लागते, तपस्या लागते. म्हणूनच ‘मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे तुकोबा म्हणतात. मानवी मनाचे पापुद्रे उलगडण्यासाठी भाषासिद्धी लागते आणि ती तपस्येतूनच हस्तगत करता येते. वाचन, मनन, चिंतन, स्वाध्याय यातूनच भाषेला फुलोरा येतो. सातत्याचं जलसिंचन, अर्थपूर्ण विचारांचे खत घालावे लागते. मग शरीर पण भाषा शिकतं. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी थोडे रूप, रंग, हावभाव बदलावे लागतात. जसे आलेल्या पाहुण्याला चहा द्यायचे मनात नसेल आणि तेव्हा तिरकस चेहर्‍यानी चहा घ्याल काय? म्हणून विचारले तर अपेक्षेप्रमाणे नकारात्मकच उत्तर येईल. पण प्रसन्न चेहर्‍याने गोड शब्दात चहा, कॉफी, सरबत यापैकी काय चालेल? याचे थोडा चहा चालेल असे होकारार्थी उत्तर येईल. कारण भाषा आपले आतिथ्य प्रगट करते.
वर्तमानपत्रे, पुस्तके यांच्या मैत्रीतून बहुश्रूतपणा, सम्यक विचारांची मनाची बैठक तयार होते. हंसक्षीर न्यायाने वागणारा स्वभाव बनतो. कथा, सुभाषित, म्हणी आणि समर्पक उदाहरणे देण्याची प्रवृत्ती बळावते. तिला सालंकृत, भारदस्त, काही प्रसंगी साधी, सोपी, सरळ, परिणामकारक, भाषेची सवय जडते. बोबडे बोल आणि वेडेवाकडे अक्षर लिहिणे याचे बालपणी कौतुक झाले. पण पुढील जीवनात कितीही ज्ञान मिळवले आणि ते भाषेतून व्यक्त करता येत नसेल, तर हसे झाल्याशिवाय राहाणार नाही. उगीचच अलिप्तपणा स्वभावात येईल. निराशा सदैव पदराला बांधलेली राहील.
प्रसंगी चिखलात राहावे लागले तरी त्याचा स्पर्श न होऊ देता कमलपुष्प ज्या जाणिवेने फुलते तसे आपले पुढील आयुष्य, जीवन सुंदर, सुखकारक, अर्थपूर्ण फुलण्यासाठी भाषेची कास धरा. वर्गात शिकवले जाणारे भाषेचे एक पुस्तकही फक्त एक खिडकी आहे. अनंत आकाश, ज्ञानाचा अफाट सागर बाहेर आहे. या कोषातून बाहेर या. भुंग्यासारखे आस्वादक व्हा. जीव तोडून भाषेवर प्रेम करा, स्नेहबंध जुळवा. मग पहा तुमच्या वाणीचे कसब. पण भाषा शिक्षकाला पण भाषेचे पुजारी व्हावे लागेल. ज्या दिव्यात तेल नाही तो अन्य दिवे कसे प्रज्वलित करणार? तेव्हा ज्योतिर्मय शिक्षक व्हा.
तात्पर्य भाषा, भाषेचे तास हे अडगळ, अडचण म्हणून किंवा ‘प्रॉब्लेम’ समस्या न समजता पुढच्या यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणून स्वीकाराल, तर यशाची गुरुकिल्ली निश्‍चित आपल्या हातात असेल.
– अरविंद खांडेकर
०७१२-२५४१९०१