व्यालकथा

0
158

मंदिर हा भारतीय समाजमनाचा सश्रद्ध सांस्कृतिक पैलू आहे. मंदिर निर्माणकलेच्या परमोच्च कालखंडात अनेक भव्य मंदिरांचं निर्माण झालं. स्थळ काळ व सामर्थ्याप्रमाणे मंदिरं सजली, नावारूपाला आली. आख्यायिका आणि स्थानमहात्म्य मंदिरांना उपकारक ठरलं. मंदिरं अधिकाधिक उत्तम अधिकाधिक सुंदर, कलापूर्ण करण्याच्या प्रयत्नामागची श्रद्धा नेहमीच विलक्षण वाटते.
मंदिर म्हणजे आश्‍वस्त करणारी आणि शांततेचा अनुभव देणारी संकल्पना. मंदिर परिसर आणि स्थापत्य हे नेहमीच मनावर गारूड करणारं असतं, याची प्रचिती गावोगावी उभी असलेली श्रीमंत संपन्न नक्षीवंत मंदिरं देतात. पण वर्तमानाच्या बदललेल्या गतीनं अनेक संकल्पना बदलून टाकल्या आहेत, सुखासीन केल्या आहेत. भव्य देखण्या मंदिरांना, अत्यंत मजबूत आणि निर्दोष असूनही सोयी सुविधांच्या नावाखाली किंवा जीर्णोद्धार म्हणून अनेक मंदिरांचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. यामुळे अनेक मूळ आणि महत्त्वाचे संदर्भ पुसले गेलेत. भडक रंग आणि सिमेंटच्या थराखाली मंदिरं कळाहीन केविलवाणी होऊन गेलीत.
अनेक मंदिरं रानोमाळ, आडवाटेला आहेत. काही उंच डोंगरावर तर काही दुर्गम स्थळी. तिथपर्यंत जायचं तर त्रास कमी झाला पाहिजे. यासाठीच पायर्‍या आणि रस्ता तयार करणे आलं. मग पाणी आणि स्वच्छतागृहं ही तर प्राथमिक आणि आवश्यक प्राधान्याची गरज. सर्वात महत्वाचं म्हणजे उजेड, त्यासाठी मंदिरात इलेक्ट्रीक फिटिंग. मग पंखे. सगळीकडे फरशी किंवा टाईल्स, चकचकीत संगमरवर. एवढं झालं की मग उठावदार भडक रंग. असं सगळं हळूहळू क्रमाक्रमानं घडत गेलं अन् त्याच गतीनं मंदिराचा जीवही निःप्राण होत गेला. शेवटी उभं राहिलं सजलेलं बेगडी कळाहीन कलेवर. मूळ उद्देश आणि आश्‍वस्त शांतता हरवलेलं. अनेक मंदिरांची हीच कथा. आणि हे सगळं सुद्धा त्याच श्रदधेतून घडलेलं. दोन्ही श्रद्धांमधला फरक अगदी दोन्हींमधल्या काळाएवढाच.
अशा मंदिराशी बसलं, थोडी विचारपूस केली की त्याचं अंतरंग सामोरं येतंच. संपूर्ण बदलून गेलेल्या अशा ‘नव्या’ प्राचीन मंदिराचा तसाच रंगलेपनाशिवायचा राहून गेलेला असा दुखरा हळवा कोपरा असतोच. तो सापडला, ओळखता आला की मंदिराच्या मनापर्यंत पोचता येतं. तो कोपरा जिवंत असतो, त्याची जखम ठसठसत असते. जराशा फुंकरीनं तो कोपरा आश्‍वस्त होतो अन् मग सगळा कालपटच नजरेसमोर उभा राहतो. वर्तमान बाजूला होऊन झगझगता गतकाळ पुन्हा जागा होतो. मंदिरावरची सारी शिल्प आपापली जागा घेतात, त्यांचे आविर्भाव सजीव होतात, नांदाचं अन् लयीचं आवर्तन साकारतं. मंदिर जिवंत होतं अन् शेकडो सुघड लयबद्ध प्रतिमा झळाळून उठतात, मंदिराचं ते रूप भुरळ घालणारं असतं. त्या प्रतिमांचं सौंदर्य अन् महत्त्व तेव्हा कळतं, एरवी त्या सगळ्या बनावट डामडौलात त्या तेजस्वी प्रतिमांकडे लक्ष जातच नाही कोणाचं.
कमी अधिक फरकानं ही कथा सगळीकडे सारखीच. मंदिराच्या भवतीचे हे सारे आधुनिक संदर्भ दूर करून पाहिलं की श्‍वास गुदमरत असलेले प्राचीन संदर्भ दिसतात. यात मंदिरावरच्या बाह्य भागातील किंवा परिसरातील प्रतिमांकडे विशेष लक्ष जातं. अनेकदा मंदिरातल्या मुख्य प्रतिमेशिवाय इतर प्रतिमांना विशेष महत्त्व दिलं जातच नाही कारण त्या विशेष ओळखीच्या नसतात. विदर्भातल्या अनेक मंदिरांवर आढळणार्‍या व्यालप्रतिमा सुद्धा अशाच दुर्लक्षित. मंदिर उभारणी आणि सुशोभनात अंदाजे नवव्या दहाव्या शतकापासून या प्रतिमा दिसून येतात. इतरत्र त्याही आधीपासूनचे संदर्भ आढळतात. मनुष्य आणि प्राणी असा समन्वय या प्रतिमांत दिसतो. प्राण्याचे शरीर आणि मनुष्याचे मुख किंवा मनुष्याचे शरीर आणि प्राण्याचे मुख अशा साधारण या प्रतिमा असतात. दुर्दैव हे की या प्रतिमांना व्यालप्रतिमा म्हणतात हेच अनेकदा माहित नसतं आणि वर्तमान स्थितीचा विचार करता ते साहजिकही आहे.
वराल, वरालक, बिडाल, व्याल अशा संज्ञा या प्रतिमांना आढळतात. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर या प्रतिमा दिसतात. याभागात अनेक दैवतांच्या, सुरसुंदरींच्या प्रतिमाही असतात. दर्शनीय आणि ओळखीच्या असल्याने त्या प्रतिमांपुढे व्यालप्रतिमा दुर्लक्षितच राहतात. पण लक्षपूर्वक पाहिलं की त्यांचंही सौंदर्य आणि डौल ध्यानी येतो. शिर साधारणपणे हत्ती, वाघ, सिंह अशा प्राण्यांचे दिसून येते. या प्रतिमा सुट्या एकट्या किंवा पायाशी इतर प्राणी असलेल्या अशा दिसतात. चेहर्‍यावरचे भाव अत्यंत सुस्पष्ट असतात, अर्थात हे भाव दिसणं जाणवणं प्रतिमेच्या स्थितीवर अवलंबून.
या प्रतिमा म्हणजे एक विलक्षण तरीही सौंदर्यशाली असा कल्पना विस्तार आहे. ही संकल्पना अर्थातच परकीय आहे. प्राचीन काळातला भारताचा सागरी मार्गाने होणारा इतर देशांशी असलेला व्यापार अनेक सांस्कृतिक संदर्भांची देवाणघेवाण करणारा ठरतो. इजिप्त, इराण भागातून याच माध्यमातून ही संकल्पना भारतात दाखल झाली असावी. कलात्मक बदल होऊन विकसित स्वरूपात ही संकल्पना स्थापत्यात रूढ झाली आणि मंदिराच्या शिल्पांकनात सुशोभनात तिचा वापर होऊ लागला असे म्हणता येते. मंदिराच्या बाह्यंगावर भिंतींचे कोन सांधले जाण्याच्या स्थानी-सांध्यांवर योजिलेल्या मानव आणि प्राणी यातून सांधलेल्या या प्रतिमा नकळत ‘सांधले जाणे’ यातला जीवनावश्यक व्यापक अर्थ मंदिराच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त करतात.
व्यालप्रतिमांच्या देखण्या कलापूर्ण अनुभूतीशिवाय मंदिरानुभव पूर्णच होऊ शकत नाही.
– संजीव देशपांडे
९०१११६५०७९