छंद जिवाला लावी पिसे!

0
424

‘हा छंद जिवाला लावी पिसे!…’ काय चपखल वर्णन केलंय कवीनं छंदाचं. खरोखरी छंद असतोच असा. मला तर असं वाटतं की, छंद ही संसारात राहून लागणारी समाधीच आहे एक प्रकारची. एखादी लहानशी रांगोळी असो किंवा तल्लीन होऊन गायलेलं गाणं असो. पुस्तकात रममाण होणं असो अथवा मन:पूर्वक एखादा पदार्थ बनवणं असो. ज्या क्षणी तुम्ही अशा कुठल्याही कलेत गुंतता आणि डोकं वर काढल्यावर भावना मनात येते ‘‘बापरे! मला त वेळेचं क्षणभरदेखील भान नव्हतं.’’ ज्या क्षणी आसपासच्या सगळ्या जगाचा विसर पडतो तोच छंद आणि तीच समाधी, नाही का?
चहाची चुस्की घेताना सुडोकू सोडवणं असो किंवा रममाण होऊन देवाचा हार गुंफणं असो, घर टापटीप ठेवण्याची आवड असो वा बागेची मशागत असो. छंद तुम्हाला तुमच्या अशा विश्‍वात घेऊन जातो. मोहम्मद रफींनी प्रियतमेच्या रूपाच्या छंदात गायलेलं ‘हा छंद जिवाला लावी पिसे’ हे तर अजरामर झालंय्. राधेचं श्रीकृष्णभक्तीचं वेड ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे गं’ हे मनाचा ठाव घेणारं गीत आपण माणिक वर्मांच्या मुखातून ऐकलेच असेल. तुकाराम महाराजांना विठूनामाची धुनी होती, तर रामदास स्वामींना श्रीरामनामाची.
कुणाला ही रम्य दुनिया बघण्याचा छंद तर कुणाला नसर्ग, पक्षी, प्राणी आणि लोकांच्या अदा कॅमेर्‍यात टिपण्याचा छंद. एखाद्याला सुग्रास पदार्थ बनविण्याचा छंद, तर दुसर्‍याला रुचकर आणि वैविध्यपूर्ण पदार्थाचा आस्वाद घेण्याचा छंद, आजी-आजोबांचा नातवंडांचं कौतुक करण्याचा आणि बाललीलांमध्ये गुंग होण्याचा छंद तर फारच माधुर्यभरा.
चित्ताला मनापासून वाटणारी ऊर्मी छंद आणि क्षणभराचा विसावादेखील छंद. आजकालच्या व्यग्र जीवनात ठिकठिकाणहून हा सूर ऐकायला मिळतो- ‘‘छंद जोपासायला वेळच कुठे मिळतो?’’ आणि हो व्यग्र जीवन म्हणजे मी फक्त नोकरीपेशावर्गाबद्दल बोलत नाही, तर सकाळपासून मुलांचा आणि नवर्‍याचा डबा, नाश्ता यांबद्दल विचार करणारी आणि त्यांच्या रूटीननुसार आपलं वेळापत्रक बसवणारी आईदेखील बिझीच असते. सकाळपासून रात्रीपर्यंत शाळा आणि शिकवणी वर्ग करणारी मुलंदेखील व्यग्रच असतात. या सगळ्या बिझी जनतेला मन:पूर्वक सांगावंसं वाटतं की, देवानं प्रत्येकालाच काही ना काही गुण (इथे आवड या अर्थी) देऊन धाडलंय. आपल्यातला हा गुण, ही रूची ओळखा आणि थोडातरी वेळ नक्की काढा ही रूची जपण्याकरिता.
शरीराला आणि त्याहून जास्त मनाला तरतरी, नवतारुण्य देणारं एक ऍण्टिऑक्सिडण्टच आहे म्हणा की छंद. सभोवतालच्या विश्‍वात स्वत:चं असं छंदरूपी विश्‍व नक्की फुलवा जे तुम्हाला तुमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल. छंदरूपी मित्र किंवा छंदरूपी नातं हे तुम्हाला कधीच दगा देत नाही, देतो तो मात्र निर्भेळ आनंद!
इथे अजून एक विचार मांडावासा वाटतो. आपली आवड म्हणजे आपला धर्म आणि आपली जीविका चालविण्यासाठी आपण जी उपजीविका स्वीकारतो ते आपलं कर्म. ज्या मनुष्याच्या ठायी कर्मधर्मसंयोग घडून आला म्हणजेच आपला छंद/आवड हीच आपली उपजीविका, त्याच्यासारखा तर दुसरा सुखी प्राणी नाही. छंदाची आवड ही मनातून असते. तिला वाचनाचा नाद म्हणून मीही वाचणार, तो तबलावादनात गुंग होतो म्हणून मीदेखील तबला वाजवणार, असं मात्र चालत नाही. मुळातील रुची महत्त्वाची. हा काही जबरदस्तीचा मामला नाही.
तर मग तुम्हीदेखील क्षणभर का होईना, पण तुमच्या अनोख्या छंदाच्या होडीवर सवार होऊन मनरूपी उत्तुंग लहरींवर हेलकावे घ्याच…
– प्राजक्ता पितळे
९८६६१६८६७१