बाल-युवा साहित्य, कला व चित्रपट महोत्सव

0
132

वरोड्यातील लोकमान्य कला अकादमीने या वर्षी साजरा केलेला वार्षिकोत्सव अनेक दिवसांपर्यंत रसिकांच्या स्मरणात राहील. दरवर्षी कोणत्यातरी नावीन्याने हा वार्षिकोत्सव रसिकांसमोर येत असतो. कधी कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचाच एक वाद्यवृंद तयार करायचा, वादक, गायक, एवढंच नव्हे, तर निवेदकसुद्धा बालकलावंतच असायचा. त्या वाद्यवृंदात बालवयातील ओठांवर शोभून दिसणारी, त्यांच्या बालवयातील भावनांना आविष्कृत करणारी गाणी सादर व्हायची. भरतनाट्याच्या किंवा कथ्थक नृत्याच्या पदन्यासांनी आपल्या परंपरेशी नाते घट्ट करणारे कलाविष्कार त्यांनी सादर करायचे; तर कधी लोककलेचा धागा पकडून भारूड, भुलाबाई, विरहिणी, भादव्याची गाणी, भराडीगौरीची गाणी सादर करायची. कधी शास्त्रीय संगीतातील एखादा राग निवडून त्या रागातील विविध गीतप्रकार-भावगीत, नाट्यगीत, चित्रपटगीत, लावणी या सार्‍या ाविविध गायनप्रकारांचे प्रकटीकरण सादर करावे, अशा वैविध्यांनी आतापर्यंतचे वार्षिकोत्सव सदैव नटलेले असायचे. तबलावादन, हार्मोनियमवादन, सिंथेसायझर, गिटार, ऑक्टोपॅड अशा वाद्यांचा सामूहिक आविष्कारतर दरवर्षी असायचाच. नुकतेच उडू पाहणार्‍या या पाखरांच्या पंखांत भरारी घेण्याचं बळ साठू लागलंय, याची चाहूलही लागलेली असायची तेव्हा!
साहित्याचे कलेशी नाते काय असावे, वगैरे वगैरे विद्वत्‌चर्चा माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार! ते ठरविण्याचा व त्यावर मनसोक्त चर्चा करण्याचा अधिकार व्यासपीठांवरील विद्वानांचा. पण, अखेरीस कलेचे आणि साहित्याचे आराध्य एकच आहे ना! शारदेच्या एका हातात पुस्तक आणि पुढ्यात वीणा. गणेश ही तर बुद्धीची देवता. तरीही गणराजाच्या नृत्य करण्याच्या कौशल्याचे गुणगान आपण करीतच असतो ना. गणेश असो की शारदा, ही सारी उपास्यप्रतीके कलेला आणि साहित्याला समृद्ध करीत असतात. एका अर्थाने ही उपासना म्हणजे साधकाची आनंदयात्राच असते!
लोकमान्य कला अकादमीने अशीच आनंदयात्रा आम्हा रसिकांना घडविली. बाल-युवा साहित्य, कला व चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाने ही आनंदयात्रा सुखद झाली. आदल्या दिवशीच म्हणजे १३ जानेवारीला ‘करीअरचे स्वप्न आणि स्वप्नातील करीअर’ या विषयावर डॉ. विवेक सावंत यांचा शाळकरी व महाविद्यालयातील तरुणांसोबत संवाद घडला होता. आपले छंद-त्या आवडणार्‍या छंदाची समाजात असलेली उपयुक्तता आणि या छंदकौशल्यासाठी आपण देऊ केलेला वेळ यातूनच प्रत्येकाचं करीअर घडायला हवं, हे त्यांनी त्यांच्या प्रासादिक शैलीतून सांगितलेलं होतं. कलाविष्काराकडे किती विविध अंगांनी बघता येतं आणि स्वतःचे करीअर घडविता येतं, हे त्यांनी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यासारख्या प्रतिभावंतांची उदाहरणे देऊन सांगितलं होेतं.
नेमका हाच धागा कळत-नकळत दुसर्‍या दिवशीच्या उद्घाटन सत्रात सहजपणे गुंफला गेला. १४ जानेवारीच्या मकरसंक्रांतीच्या प्रकाशपर्वावर उद्घाटनसत्राला सुरुवात झाली. भव्य शामियाना, देखणे व्यासपीठ, भव्य डिजिटल स्क्रीन, व्यासपीठावरील सजावट यात एक रेखीवपणा होता. १० वाजून ३० मिनिटे झाली आणि ठरल्याप्रमाणे, उद्घाटनसत्राचे पाहुणे बालकलावंत अथर्व कर्वे, चिन्मय देशकर, अथर्व भालेराव, स्वरश्री उपदेव आणि चंद्रपूरच्या चांदा पब्लिक स्कूलच्या रॉकबॅण्डचे कलावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. समईतल्या दीपकळ्यांनी सुहास्यवदनाने कलावंतांना आशीर्वाद दिलेत. लोकमान्य कला अकादमीच्या कलावंतांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, स्वागतनृत्याने केले. ‘तू बुद्धी दे तू तेज दे’ हे आत्मनमन गीत अकादमीची मुले गात होती. सोबतीला त्यांचाच वाद्यवृंद होता. त्या गीताच्या तालावर अकादमीच्या विद्यार्थिनींचा लयबद्ध पदन्यास गुंगवून टाकीत होता. त्या वेळी दोन बालचित्रकार अक्षता नक्षिणे आणि सागर शेठ्ये मंचाखाली लावलेल्या पोर्टे्रटवर गणेशाचे चित्र काढीत होते. गाणे संपले तेवढ्या अवधीत या बालचित्रकारांकडून चित्रे काढून झालेली होती. गायन, वादन, नृत्य आणि चित्रकला यांच्या सहजसंवादातून या मुलांनी त्यांच्या आनंदयात्रेला सुरुवात केली. सारा मंडप टाळ्यांच्या कडकडाटाने निनादला. हे आगळेवेगळे उद्घाटन होते. कुठेही हार-तुरे नव्हते, संदेशवाचन नव्हते, खुर्च्यांची गजबज नव्हती की, सत्कारसोहळे नव्हते. होती ती फक्त शारदेच्या उद्यानात बागडणारी फुलपाखरे!
अथर्व कर्वे आणि चिन्मय देशकर हे चित्रपट बालकलावंत, सिनेमा व मालिका यातून सगळ्यांना परिचित होते. डॉ. प्रशांत खुळे, डॉ. जयश्री शास्त्री यांनी त्यांच्याशी गप्पा केल्या आणि दोन्ही बालकलावंतांनी व्यासपीठावरून खाली उतरून विद्यार्थ्यांशी गप्पा केल्या. दोघांनीही, त्यांचे करीअर कसे घडले ते सांगितले. करीअर घडविताना ९४ टक्के गुण शालान्त परीक्षेत मिळाल्याचेही अथर्वने सांगितले. व्यासपीठावर भाषणे नव्हती, तर फक्त दिलखुलास गप्पा! नागपूरचा व्हायोलिनवादक अथर्व भालेराव हाही बारावीचा विद्यार्थी. त्याने व्हायोलिनवर ‘वृंदावनीसारंग’ हा राग सादर केला. मुख्य वैशिष्ट्य की, त्याच्या व्हायोलिनला तबलासंगत केली लोकमान्य कला अकादमीच्या बालवादकाने-आयुष दीपक मडावी याने. मध्यलयीत आणि द्रुतलयीत त्याची तबल्यावर थिरकणारी बोटे थक्क करून सोडणारी होती. चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॉकबॅण्ड सादर केला आणि उद्घाटनसत्राचा समारोप स्वरश्री उपदेव या दहा वर्षांच्या चिमुकलीच्या कथ्थक नृत्याने झाला.
दुपारच्या सत्रात, ‘चित्रपट-दिग्दर्शन-पटकथा-ध्वनी व तंत्र’ या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद झाला. शाळेचे माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, प्रसिद्ध पटकथा लेखक शाम पेठकर आणि चित्रपट ध्वनितंत्रज्ञ मंदार कमलापूरकर यांनी चित्रपटातील विविध रचनातंत्रावर प्रकाश टाकला. एक चित्रपट तयार कराना केवढी मेहनत आणि तंत्र वापरावे लागते, याचे चित्रफितींमधून वक्त्यांनी सादरीकरण केले.
त्यानंतरच्या सत्रात पाहुण्या बाल-साहित्यिकांचे काव्यगायन आणि कथाकथन झाले. सातव्या वर्गात शिकणारी यवतमाळ जिल्ह्यातील सोनाली कुपरे या विद्यार्थिनीने तिची कविता सादर केली. विशेष म्हणजे सोनालीची कविता सहाव्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात नेमलेली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील आर्या पिंगे व श्रुती ताजणे, तिरवंजा, नागपूरची श्रवंती देशपांडे आणि मैत्रयी धनोटे यांनी कथा सादर केल्या.
शेवटच्या दिवशी लोक शिक्षण संस्थेच्या बालकलावंतांनी कथा व कविता सादर केल्या. कथांची निवड, सादरीकरण, शैली यातून कथा-कविता कशा रंगतात, हे या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून स्पष्ट होत होते. त्यासोबतच नागपूरच्या स्वरश्री दिगंबर नाईक हिचे बालकीर्तन झाले.
शेवटचे सत्र कला अकादमीच्या वार्षिकोत्सवाचे होते. तबला, हार्मोनियम, गायन, नृत्य या सर्व कलाप्रकारांची मेजवानीच अकादमीने दिली. विशेष म्हणजे एकाच वेळी पन्नास विद्यार्थ्यांनी तबला सोलो वादनाचा प्रकार सादर केला. अकादमीच्या माजी विद्यार्थ्यांनी या वार्षिकोत्सवात त्यांची कला सादर केली.
भव्य ग्रंथप्रदर्शन, मुलांसाठी चित्रपट व कलाप्रदर्शन, आनंदमेळावा या विविध उपक्रमांनी संस्थेचा विशाल परिसर गजबजून गेला होता. विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली ‘ग्रंथदिंडी’ हे या महोत्सवाचे आकर्षण होते. मुख्य म्हणजे तीनही दिवसांच्या विविध सत्रांमध्ये कुठेही अध्यक्षांचे स्थान नव्हते. कोणत्याही सत्राला अध्यक्ष नव्हता. व्यासपीठावरील नटेश्‍वराच्या मूर्तीने या सर्व सत्रांचे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यामुळेच सर्व कार्यक्रम सुसूत्रपणे पार पडत होते. असा हा लोकमान्य कला अकादमीचा वार्षिकोत्सव विद्यार्थ्यांच्या मनावर केवळ संस्कार घडवीत नाही, तर या परिसरात वावरणार्‍या कोवळ्या कळ्यांत प्रतिभेचा अंकुर कुठे आहे, याचा शोध घेत असतो. या सर्व बालकलावंतांना ज्यांनी कलेचे संस्कार दिले, त्या मंगेश मल्हार, गजानन कन्नोजवार, अविनाश कांबळे, राजेंद्र धर्मेलवार, संदीप कन्नोजवार, सोनी दडमल या कलाशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
– उमेश लाभे/वरोडा