राजे…!

0
224

राजे, तुम्ही नसता तर आज आमचं अस्तित्व कदाचित राहिलं नसतं. परकीय सत्तेनं तेव्हा अख्खा मराठी मुलूख काबीज करून आजही आमच्यावर हुकमत गाजवली असती. आमच्या येणार्‍या पिढ्या युगानुयुगं आपली अस्मिता गमावून दुसर्‍यांच्या छत्रछायेत खितपत पडलेल्या असत्या. राजे, तुम्हीच होता, ज्यांनी अख्ख्या मराठी मुलुखाला एक करून स्वराज्याचे तोरण बांधले. गद्दारी करणार्‍या शत्रूंशी चार हात केले. तोफेनं त्यांचे मुंडके उडवून, त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मराठी राज्याची पताका उंचावली. या मराठी मुलुखाच्या मातीच्या कणाकणावर, इथल्या प्रत्येक हृदयावर, सह्याद्रीच्या कड्याकपारीवर तुमचेच नाव आहे ‘राजे!’

मुलं लहान असतात. प्रायमरी शाळेत जातात आणि वर्गातील गुरुजी शिवाजी महाराजांचा पाठ शिकवायला जेव्हा पुस्तक हाती घेतात, तेव्हा पहिल्यांदा मुलांचं लक्ष शिवाजी महाराजांच्या फोटोवर जातं आणि क्षणार्धात मुलं त्यांच्याकडे आकर्षित होतात. पुढं गुरुजी शिवाजी महाराजांचा इतिहास विस्तृत शिकवायला सुरुवात करतात आणि त्या बालवयातही, राजा काय असतो, राजानं कसं असावं, याची प्रचीती विद्यार्थ्यांना येते. इतकंच नाही, तर शिवाजी महाराज हेच आपले खर्‍या अर्थानं राजे होते, हे कायमच त्यांच्या मनावरही त्याच वयात कोरलं जातं! शिवाजी महाराजांची ओळख, त्यांच्या कार्याचा परिचय प्रत्येक मुलाला बहुतांशी असाच लहान वयात होतो. इतकंच नाही, तर शिवाजी महाराजांविषयी हृदयात प्रेम, जिव्हाळा मात्र कायमचा निर्माण होता. आणि का होऊ नये?
सोळाव्या शतकात ज्या वेळी परकीय राजवटी आपल्या देशात-महाराष्ट्रात आरूढ झाल्या होत्या, मराठी अस्मिता संपुष्टात येत होती. मराठी रयतेवर जुलूम होत होता. अशा वेळी आई भवानीनं या मुलुखाच्या रक्षणाकरिता शिवाजी राजांना पाठवलं. शिवनेरीवर या मुलुखाचा रक्षक जन्माला आला, हे कदाचित तेव्हा कुणालाच माहीत नसावं. आई जिजाई यांनी मराठी मुलुखावर होणारे अन्याय, अत्याचार, भर दिवसा अब्रू लुटणारी राजवट, यांचा अस्त करायचाच, हा पण बांधून शिवाजी महाराजांना त्यांनी स्वराज्य रक्षणाकरिता धडे दिले. महाराजांनाही याची जाण होती. आपला जन्म झाला तोच स्वराज्य रक्षणाकरिता, याची जाणीव ठेवून बरोबरीच्या मावळ्यांना सोबत घेऊन बलाढ्य अशा शत्रूंविरोधी कंबर कसली.
तेव्हा आधी परक्यांच्या हातात असणारा तोरणा व नंतर एक एक गड काबीज होत गेला. शिवाजी राजांचं नाव दुमदुमू लागलं. पहाडासारखं मोगलांचं राज्य बुरुजासारखं ढासळू लागलं. राजे शिवछत्रपती झाले!
शिवाजी महाराज आम्हा सर्वांसाठी एक महान प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे उपकार आम्ही कदापिही विसरू शकत नाही. स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधलं ते त्यांच्या सवंगड्यांच्या साथीनं. एकी असावी तर कशी, प्रेम असावं तर कसं, याची अनेक उदाहरणं आपल्या राजांच्या इतिहासात पाहायला मिळतील. जीवा महाला यांनी राजांना अफजल खान वधाच्या वेळी वाचवलं होतं. बाजीप्रभू यांनी शर्तीनं खिंड लढवली आणि राजे गडावर पोहोचेपर्यंत शत्रूंशी अखंड झुंज दिली. हा इतिहास आजच्या तरुणांना बरंच काही शिकवून जातो. आपल्या स्वराज्याच्या रक्षणाकरिता, आपल्या अस्तित्वाकरिता शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे लढा देऊन ज्या राज्याचे संरक्षण केले, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक तरुणानेही आपल्या अवतीभवती असणार्‍या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध लढा दिला पाहिजे. स्वराज्याची ही धुरा, ही जबाबदारी आज इथल्या युवकांच्या खांद्यावर आलेली आहे. त्याची जाणीव युवकांना होणे गरजेचे आहे, तेव्हाच शिवाजी महाराजांचा हा मुलूख आज शाबूत राहील…!
– दीपक वानखेडे /९७६६४८६५४२