शशिकला शरण, कारागृहात रवानगी

0
189

आता सर्वांच्या नजरा राज्यपालांवर
वृत्तसंस्था
बंगळुरू/चेन्नई, १५ फेबु्रवारी
सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यासाठी मुदत देण्यास नकार दिल्यानंतर अण्णाद्रमुकच्या हंगामी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी आज बुधवारी सायंकाळी बंगळुरू येथील विशेष न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने लगेच त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील होसूर येथून २८ किलोमीटर अंतरावर पाडापन्ना अग्रहारा येथील कारागृहात त्यांना नेण्यात आले. तत्पूर्वी, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
दरम्यान, बंगळुरू येथील विशेष न्यायालयात शशिकला आपल्या ताफ्यासह आल्या होत्या. यावेळी संतप्त जमावाने दगडफेक करून त्यांच्या ताफ्यातील चार कारचे प्रचंड नुकसान केले. तथापि, हे कृत्य नेमके कोणी केले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
तीन वर्षे, १० महिने २७ दिवस
शशिकला यांना या कारागृहात तीन वर्षे, १० महिने आणि २७ दिवस मुक्काम करावा लागणार आहे. विशेष न्यायालयाने त्यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले होते. पण, या काळात त्यांनी काही महिन्यांची शिक्षा भोगली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना आता उर्वरित शिक्षा भोगावी लागणार आहे.
राज्यपालांची भूमिका महत्त्वाची
शशिकला यांनी कारागृहात जाण्यापूर्वी ई. के. पलानीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. पलानीस्वामी यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्तेचा दावाही सादर केला आहे. मात्र, त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही, हे सध्यातरी अस्पष्ट आहे. अशा स्थितीत राज्यपाल काय भूमिका घेतात, याकडे राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे.
मुदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी चार वर्षांचा कारावास ठोठावण्यात आलेल्या अण्णाद्रमुकच्या हंगामी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना शरण येण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी नकार दिला.
आमचा मंगळवारचा निकाल अंतिम होता. त्यात सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या असून, आता कोणताही बदल करण्याची आणि नव्याने कोणताही अंतरिम आदेश पारित करण्याची आमची तयारी नाही. आदेशातील एक शब्दही बदलणार नाही, असे न्या. पी. सी. घोष यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
शशिकला यांना पक्षाची आणि स्वत:ची काही प्रलंबित कामे पूर्ण करायची असल्याने बंगळुरू येथील न्यायालयाला शरण जाण्यासाठी त्यांना काही अवधी देण्यात यावा आणि त्यासाठी याचिकेवर आजच सुनावणी करण्यात यावी, अशी विनंती त्यांचे वकील के. टी. एस. तुलसी यांनी याचिकेतून केली होती. पण, सुनावणी तर सोडाच, याचिकेवर विचार करण्याचीही आमची तयारी नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
अम्मांच्या समाधीचे घेतले दर्शन
सर्वोच्च न्यायालयाने वेळ देण्यास नकार दिल्यानंतर हतबल झालेल्या शशिकला यांनी शरण जाण्यासाठी बंगळुरूचा प्रवास दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रारंभ केला. अम्मांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अण्णाद्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या निवासस्थानाला भेट दिली. तिथे काही काळ त्यांनी घालविला. मरिना बीचवरील जयललिता यांच्या समाधीला त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.