इस्रोचे विश्‍वरुपदर्शन

0
225

वृत्तसंस्था
श्रीहरीकोटा, १५ फेबु्रवारी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज बुधवारी ऐतिहासिक आणि विश्‍वविक्रमी अंतराळभरारी घेत, एकाचवेळी १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही सी-३७ यानाच्या माध्यमातून १०४ उपग्रहांना अंतराळातील त्यांच्या कक्षेत यशस्वीपणे सोडून भारताने रशियाचा विक्रम मोडित काढला आहे. पीएसएलव्ही यानातून वेगवेगळे झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांच्या आत हे सर्व उपग्रह अंतराळातील आपापल्या कक्षेत स्थिरावले.
आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ हे संपूर्ण स्वदेशी यान आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी १०४ उपग्रहांसह अंतराळात झेपावले. यात १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रहांचा समावेश आहे. भारताच्या हवामानाचा अचूक अंदाज घेणार्‍या ‘कार्टोसॅट-२’ या सर्वात जड उपग्रहाचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या मोहिमेची २३ तासांची उलटगणती मंगळवारी सकाळी सुरू झाली होती. आयएनएस-१ए आणि आयएनएस-१बी हे अन्य दोन भारतीय उपग्रहही अंतराळात झेपावले.
यापूर्वी, रशियाने २०१४ मध्ये एकाचवेळी ३७ उपग्रहांना अंतराळात पाठविले होते. भारताच्या इस्रोने आज रशियाचा हा विक्रम मोडीत काढला आणि अंतराळ क्षेत्रात भारताचा दबदबा वाढविला. इस्रोने जून २०१५ मध्ये एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात पाठविले होते. आजच्या कामगिरीमुळे एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात पाठविणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.
कार्टोसॅट उपग्रहाचे वजन ७१४ किलो इतके असून, हा उपग्रह पृथ्वीवरील हवामानाच्या निरीक्षणाचे कार्य करणार आहे. सर्वप्रथम कार्टोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्यापाठोपाठच एकूण ६६४ किलो वजनाचे १०३ उपग्रह अंतराळात झेपावले. या १०३ उपग्रहांमध्ये भारताचे दोन नॅनो उपग्रह, अमेरिकेचे ९६ तर इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे, अशी माहिती इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
इस्रोने आजच्या मोहिमेसाठी एक्सएल श्रेणीतील सर्वात शक्तिशाली प्रक्षेपकाचा वापर केला. यापूर्वी हे प्रक्षेपक चांद्रयान मोहिमेसाठी वापरण्यात आले होते. पीएसएलव्ही यानाच्या माध्यमातून इस्रोची ही सलग ३९ वी यशस्वी अंतराळभरारी असून, इस्रोने आतापर्यंत २२६ उपग्रहांना अंतराळात सोडले आहेत. यातील १७९ उपग्रह विदेशी आहेत.
उलटगणती पूर्ण झाली अन्…
मंगळवारी सकाळी सुरू करण्यात आलेली २३ तासांची उलटगणती आज सकाळी संपली आणि दुसर्‍याच क्षणी इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ यानाने ९ वाजून २८ मिनिटांनी अतिशय कर्कश आवाजासह पहिल्या उपग्रहाला अंतराळात सोडले. त्यानंतर काही क्षणातच इतर उपग्रहही अंतराळात झेपावले. मोहीम यशस्वी होताच सतीश धवन अंतराळ केंद्रात एकच जल्लोष झाला. वैज्ञानिक आणि या प्रकल्पावर गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत असलेल्या अधिकार्‍यांनी टाळ्या वाजवून आणि एकमेकांना आलिंगन देऊन आनंदोत्सव साजरा केला.
भारताची क्षमता वाढली
इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आजच्या ऐतिहासिक यशामुळे इस्रोची अर्थात भारताची अंतराळक्षमता प्रचंड वाढली आहे. तर, प्रकल्प संचालक बी. जयकुमार म्हणाले की, आपल्या विदेशी ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात आम्ही यशस्वी झालो, याचे आम्हाला सर्वाधिक समाधान आहे. हा आमच्यासाठी अतिशय नवीन अनुभव होता.
४०० नॅनो उपग्रह पाठविण्याची क्षमता : नायर
इस्रोने आज एकाचवेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. पण, प्रत्यक्षात एकाचवेळी किमान ४०० नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची पीएसएलव्हीच्या या आधुनिक यानाची क्षमता आहे. हे तंत्रज्ञान नवीन नाही. आम्ही सुरुवातीला १० उपग्रहांच्या प्रक्षेपणासह हे तंत्रज्ञान हाती घेतले होते. त्यानंतर संख्या वाढत ३५ पर्यंत गेली आणि आता १०४ उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. जर उपग्रह तीन ते चार किलो वजनाचे असतील, तर एकाचवेळी किमान ४०० उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य आहे, असे प्रख्यात अंतराळ वैज्ञानिक जी. के. माधवन नायर यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिनंदन
एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करीत नवा इतिहास रचल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इस्रोचे कौतुक केले. इस्रोची कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद आहे. इस्रोतील शास्त्रज्ञांना देश सलाम करतो, असे ट्विट मोदी यांनी केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही, इस्रोची कामगिरी भारताच्या अंतराळ मोहिमेतील मैलाचा दगड ठरली असून, देशाला इस्रोचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.