चीन घेणार सर्वात मोठ्या ड्रोनची चाचणी

0
187

– सौर ऊर्जेपासून संचलित होणार
– ताशी २०० किलोमीटर वेग
वृत्तसंस्था
बीजिंग, १५ फेब्रुवारी
सौर ऊर्जेपासून संचलित होणार्‍या जगातील सर्वात मोठ्या ड्रोनची चाचणी यावर्षी चीनकडून घेतली जाणार आहे. हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा ड्रोन असल्याचे म्हटले जाते.
चायना ऍकॅडमी ऑफ एअरोस्पेस एअरोडायनॅमिक (सीएएए)च्या ड्रोन प्रकल्पाचे प्रमुख अभियंते शी वेन यांनी सांगितले की, या ड्रोनचे पंख प्रवासी विमान बोईंग ७३७ पेक्षाही मोठे आहेत. म्हणजेच ते ४० मीटरपेक्षाही जास्त लांब आहेत. तर बोईंगचे पंख ३४ मीटर लांब असतात.
रेनबो मालिकेतील हा ड्रोन पहिल्या उड्डाण चाचणीत यशस्वी ठरला आहे. आता जास्त उंचीवर त्याची क्षमता तपासली जाणार आहे. हा ड्रोन नासाच्या मॉडेलनंतरचा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा ड्रोन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याची तांत्रिक क्षमता अमेरिकेन ड्रोनपेक्षाही अधिक दर्जेदार असल्याचा दावा केला जात आहे.
चीनच्या या ड्रोनमध्ये जास्तीत जास्त उंचीवर जास्तीत जास्त उड्डाण करण्याची क्षमता आहे. सर्वसामान्यपणे ड्रोन हे ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतात. मात्र, हा चिनी ड्रोन ताशी १५० ते २०० किलोमीटर वेगाने अंतर कापणार आहे. याचा वापर हेरगिरी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लक्ष ठेवणे, हवामान व संचारासाठी केला जाणार आहे.