देखणे ते चेहरे….

0
153

कल्पवृक्ष
महर्षी अष्टावक्र एकदा राजर्षी जनकाच्या राजदरबारात गेले. त्यांचा देह आठ ठिकाणी वाकडा होता. त्यांच्या देहाची वक्रता पाहून दरबारातील विद्वान पंडित हसू लागले. प्रत्युत्तरादाखल अष्टावक्र मुनीही हसू लागले. सर्वांना आश्‍चर्य वाटले. अष्टावक्रांच्या चेहर्‍यावर विशाद नव्हता, तर हास्य होते. राजा जनकाने त्यांना हसण्याचे कारण विचारले. त्यावर अष्टावक्र म्हणाले, ‘‘जनकासारख्या राजर्षींच्या सभेत विद्वानांऐवजी निर्बुद्ध बसलेले पाहून मी माझे हसू रोखू शकलो नाही.’’ जनकाने विचारले, ‘‘आपण असे का म्हणता?’’ अष्टावक्र म्हणाले, ‘‘विद्वानांजवळ आंतरिक सौंदर्य पाहण्याचा डोळा असावा लागतो. तो ह्यांच्याजवळ नाही. त्यांनी माझे गुणसौेंदर्य, विचारसौंदर्य किंवा जीवनसौंदर्य पाहिलेच नाही. त्यांचे केवळ माझ्या कुरूपतेकडे लक्ष गेले. चामड्याकडे पाहण्याचे काम निर्बुद्धांचे असते विद्वानांचे नाही.’’ हे एकून सर्व पंडित शरमिंदे झाले.
कुरूपतेवर आणि विकलांगतेवर मात करून तेजस्विता, आत्मविश्‍वास आणि खरे सौंदर्य काय असते याचे विलक्षण उदाहरण अष्टावक्रांनी तरुणांसमोर ठेवले आहे. आपण सुंदर दिसावे, असे सर्वांनाच वाटते. यात काहीच चूक नाही. सुंदर दिसण्याकरिता प्रयत्न करणेही गैर नाही. हे करताना खर्‍या सौंदर्याची जाणीव व त्यासंबंधी योग्य दृष्टिकोन असणे मात्र आवश्यक आहे. गुळगुळीत मासिकांवरची छायाचित्रे, जाहिरातीत दिसणारे चकचकित चेहरे, वाहिन्या व चित्रपटातील आकर्षक नटनट्या पाहून सौंदर्याच्या भ्रामक कल्पनेत वाहून जाणे सहज शक्य आहे. या वाहत जाण्याला सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणार्‍या कंपन्या हातभारच लावत असतात. आपल्या या मानसिकतेचा फायदा घेऊनच पैशाची प्रचंड उलाढाल सुरू असते.
प्रश्‍न सौंदर्यप्रसाधने वापरण्याचा नाही. कधी कधी शारीरिक सौंदर्याच्या कल्पनेने माणसे इतकी पछाडली जातात की आपण कसे दिसतो याकडे प्रचंड लक्ष देणे सुरू होते. त्यापायी खूप पैसा आणि वेळ खर्च होतो. दिसण्याला अतिमहत्त्व दिल्यामुळे त्याचा परिणाम मानसिकतेवर, आत्मसन्मानावर, आत्मविश्‍वासावर होतो. अनेकांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. सुंदर दिसण्यामागे मुळात अनेकदा लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा हेतू असतो. मग त्याकरिता माणसे कोणत्याही स्तरावर जातात. शेवटी माणसाचे रूपांतर वस्तूमध्ये होते. हीच काय आपल्या सांस्कृतिक प्रगतीची खूण! समाजाच्या सौंदर्याच्या कल्पनेत त्यांची संस्कृती प्रतिबिंबित होत असते. एका पाहणीत ४५ टक्के मुलींनी त्यांच्या शरीरावर नाखुश असल्याचे सांगितले. अमेरिकेत नाक, चेहरा आणि ब्रेस्ट एनहान्समेंटच्या शस्त्रक्रियेत ५५ ते ६० टक्के वाढ झाली आहे. त्याकरिता बँका कर्ज देतात. यामुळे मित्र, आजूबाजूचे लोक, व्यावसायिक जगतात आत्मसन्मान व आत्मविश्‍वास वाढतो, असे त्यांना वाटते. या सुंदर दिसण्याच्या ताणातून, स्पर्धेतून नैराश्य व मनोविकार वाढत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. इतरांचे मत, लोकांनी चांगले ठरविणे, याला अतिमहत्त्व दिल्याचे दुष्परिणाम होणारच. प्लॅस्टिक सर्जरीसारख्या आधुनिक विज्ञानाचा योग्य उपयोग करून घेण्याला हरकत नाही, मुद्दा असतो त्याच्या आहारी जाण्याचा.
आपला रंग, उंची, बांधा, चेहरे यापैकी काहीच आपल्या हातात नाही. त्यात फार बदल करणे शक्यही नसते. मग खंत कशाला करायची? आपल्या हातात काय आहे, याचा विचार केला पाहिजे.
एकदा वर्गात शिक्षकांनी एक प्रयोग केला. (असतात बिचारे कोठे कोठे असे वेडे शिक्षक). त्यांनी मुलांना त्यांचा आवडता मित्र कोण व तो का आवडतो, याची दहा कारणे लिहायला सांगितली. नंतर एकेकाला वाचायला सांगितली. कितीतरी कारणे जमा झाली. पण मित्र दिसायला चांगला आहे, सुंदर आहे म्हणून चांगला मित्र आहे, असे एकानेही लिहिले नव्हते. शिक्षक म्हणाले, ‘‘मग तुम्ही दिसण्याला इतके महत्त्व का देता. ‘दिसण्या’सोबतच ‘असण्याला’ही महत्त्व द्या.’’ शरीराच्या पलीकडे, डोळ्यांना न दिसणार्‍या, हृदयाला जाणवणार्‍या खर्‍या आंतरिक सौंदर्यांचा शोध घेतला पाहिजे. द्वेष, मत्सर, राग माणसाला कुरूप करतात. ती नाहीसे करणारी क्रीम वापरलीच पाहिजे. प्रसन्न हास्य आणि आत्मविश्‍वास असलेलाच चेहरा खरा सुंदर असतो. आणि त्याही पलीकडे हँडसम बनायचे असेल तर ‘गिव्ह हँड ऑफ हेल्प टू समवन’ हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११