नियतीने उगवला शशिकला यांच्यावर सूड

0
200

दिल्लीचे वार्तापत्र
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची स्वप्ने पाहणार्‍या शशिकला यांच्या पदरी आता तुरुंगात दिवस मोजण्याची वेळ आली आहे. बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शशिकला आणि अन्य दोघांना दोषी मानत ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. न्यायालयाने शशिकला यांना तत्काळ शरणागती पत्करण्याचे निर्देशही दिले आहेत.
चहाचा कप आणि ओठ यांच्यात खूप अंतर असते, अशी इंग्रजी म्हण आहे, त्याची प्रचीती आता शशिकला यांना आली असावी. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने शशिकला यांच्या तोंडी आलेला मुख्यमंंत्रिपदाचा घास हिरावल्या गेला आहे. १७ नोव्हेंबर २००४ ला ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या कारस्थानात तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता आणि त्यांच्या निकटच्या सहकारी शशिकला यांचा हात होता. विशेष म्हणजे पुढे उच्च न्यायालयाने शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची निर्दोष सुटका केली. पण शशिकला यांच्यावर आता जिवंतपणी राजकीय मरण भोगायची वेळ त्याच नियतीने आणली आहे.
मद्रास येथील मोक्क्याच्या ठिकाणी असलेले २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विकत घेऊन त्या ठिकाणी शशिकला यांना पंचतारांकित हॉटेल उभारायचे होते. पण रुग्णालय मालकाची हॉस्पिटल विकण्याची इच्छा नव्हती. शशिकला यांच्या इच्छेला दाद न दिल्यामुळे पुढे या हॉटेलमालकाचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्यात आला. मात्र, तरीसुद्धा तो बधला नाही. शशिकला यांना रुग्णालयाची जागा विकण्याऐवजी त्याने संपूर्ण रुग्णालयच कांची कामकोटी पीठाला न विकण्याच्या बोलीवर दान म्हणून दिले. यामुळे चवताळलेल्या शशिकला यांनी पाशवी सत्तेच्या बळावर हे रुग्णालय विकण्यासाठी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही डाळ न शिजल्यामुळे अखेर जयललिता आणि शशिकला यांनी राजकीय सूडबुद्धीने शंकराचार्यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली. या प्रकरणातील दुर्दैवी योगायोग म्हणजे एका रुग्णालयाच्या जागेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी शंकराचार्यांना अटक केली, त्याच जयललिता यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे चार महिने रुग्णालयात घालवावे लागले.
शशिकला यांची अति राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांना नडली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडे, तर पक्षाची सूत्रे शशिकला यांच्याकडे सोपवण्यात आली होती. दोघांनी आपापल्या मर्यादेत काम केले, तर तामिळनाडूत राजकीय पेचप्रसंगाची स्थिती उद्भवणार नाही, असे म्हटले गेले. मात्र, शशिकला यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांना चूप बसू देणार नाही, असे ८ डिसेंबरच्या दिल्ली वार्तापत्रात म्हटले होते. तसेच झाले, पक्षाच्या महासचिवपदासोबत मुख्यमंत्रिपदही आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शशिकला यांनी केला. पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनाम देण्यास बाध्य करण्यात आले. पन्नीरसेल्वम यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद आल्यानंतर त्यांनी शशिकलांविरुद्ध बंंडाचे निशाण फडकवले.
विशेष म्हणजे शशिकला या सहजासहजी हार मानणार्‍या नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या काही समर्थकांची पक्षातून हकालपट्‌टी करत आपले निकटवर्ती पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. पलानीस्वामी यांनी राज्यात सरकार बनवण्याचा दावाही राज्यपालांकडे केला आहे. राज्यातील विद्यमान पेचप्रसंगात पन्नीरसेल्वम बाजी मारणार की पलानीस्वामी हे आताच सांगता येणार नसले, तरी यामुळे राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये फूट मात्र निश्‍चित पडली आहे.
शशिकला काय आहे, हे जयललिता यांनी पूर्णपणे ओळखले होते, पण त्यांची व्यक्तिगत अपरिहार्यता अशी होती की, त्या शशिकला यांना आपल्यापासून दूर करू शकत नव्हत्या. एकदा आपल्या निवासस्थानातून हाकलल्यानंतरही जयललिता यांना शशिकला आणि त्यांच्या परिवाराला आपल्या निवासस्थानी परत घ्यावे लागले. याचाच अर्थ जयललिता यांच्या अशा काही गोष्टी शशिकला यांना माहीत होत्या, ज्याच्या आधारे शशिकला त्यांना ब्लॅकमेल करत असाव्या, अशी शंका घ्यायला पूर्ण जागा आहे.
शशिकला या कधीच मुख्यमंत्री होऊ नये, अशी जयललिता यांची इच्छा होती, त्यामुळे एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले असताना आणि दुसर्‍यांदा आजारी पडल्यावर जयललिता यांनी मुख्यमंत्रिपद शशिकला यांच्याकडे नव्हे, तर पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवले होते. जयललिता यांच्या मनात असते तर त्यांनी आपल्या कार्यकाळातच मुख्यमंत्रिपद शशिकला यांच्याकडे सोपवले असते आणि त्यावेळी कोणीही शशिकला यांना विरोध केला नसता. पण जयललिता यांनी तसे केले नाही, यामागे निश्‍चितच काही कारण असावे, हे जयललिता यांचा रात्रंदिवस उदोउदो करणार्‍या अण्णाद्रमुकच्या खासदारांना आणि आमदारांनांही माहीत आहे.
तामिळनाडूतील अंतर्गत राजकीय पेचप्रसंगाच्या स्थितीत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. राज्यपालांसमोर काही पर्याय आहेत. राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. त्यांनी बहुमत सिद्ध केले तर प्रश्‍नच नाही, पण ते बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर आपल्या पाठीशी बहुमत आहे, हे सिद्ध करायला राज्यपाल पलानीस्वामी यांना सांगू शकतात. पलानीस्वामी यांनी बहुमत सिद्ध केले आणि सरकार स्थापन केले तर तुरुंगातून शशिकला यांचे त्या सरकारवर पूर्ण नियंत्रण राहाणार आहे.
दुसर्‍या पर्यायानुसार राज्यपाल पक्षांतर्गत बहुमत कोणाच्या पाठीशी आहे, हे सिद्ध करायला राजभवनात आमदारांचे शक्तिप्रदर्शन करायला पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांना सांगू शकतात. बहुमत या दोघांकडेही नाही असे लक्षात आले तर राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे पुन्हा दोन पर्याय उरतात, एक म्हणजे विधानसभा प्रलंबित ठेवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे. दुसरा म्हणजे विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणुका घेणे आणि निवडणुका होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे. कारण राज्यात द्रमुक आणि अन्य पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाही. २३४ सदस्यांच्या तामिळनाडूत अण्णाद्रमुकचे १३४, तर द्रमुकचे ८९ आमदार आहेत. कॉंग्रेसचे फक्त आठ आमदार आहेत, राज्यात भाजपाचा एकही आमदार नाही.
जयललिता तुरुंगातून पन्नीरसेल्वम यांच्या सरकारवर पूर्ण नियंत्रण ठेऊन होत्या, तशी भूमिका पार पाडण्याची शशिकला यांची इच्छा आहे. पण जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असले तरी त्या राज्यातील प्रचंड लोकप्रिय नेत्या होत्या, हे शशिकला यांनी विसरू नये. शशिकला यांच्यावर फक्त भ्रष्टाचाराचे आरोपच आहेत. त्यामुळे जयललिता आणि शशिकला यांची तुलनाच होऊ शकत नाही. हेच कारण आहे, आज अनेक आमदार शशिकला यांच्या पाठीशी दिसत असले तरी अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते आणि राज्यातील सर्वसामान्य जनता शशिकला यांच्या विरोधात आहे. आणि जे आमदार आज शशिकला यांच्यासोबत दिसतात, ते उद्या त्यांच्यासोबत राहातीलच याची कोणतीही खात्री नाही. पन्नीरसेल्वम यांच्या बाजूला बहुमत आहे आणि ते सरकार स्थापन करू शकतात, हे लक्षात आल्यावर हे सर्व आमदार कोणत्याही क्षणी पन्नीरसेल्वम यांच्यासोबत जाऊ शकतात. शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्यात पन्नीरसेल्वम यांची स्थिती दगडापेक्षा वीट मऊ अशी आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७