वाघ, सिंह आणि डरकाळी!

0
223

अग्रलेख
राज्यात आणि देशात सध्या निवडणूकज्वर पसरला आहे. सगळीकडे फक्त निवडणुकीची आणि कोण जिंकणार, याचीच चर्चा आहे. राज्यातील दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांसाठी १६ आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार सत्तारूढ आहे. मात्र, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये युती झालेली नाही. प्रचारात दोन्ही पक्षांंचे नेते एकमेकांवर कठोर टीका करीत आहेत. आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रचारसभांमधून फक्त भाजपालाच लक्ष्य करताहेत आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातूनही फक्त भाजपा, भाजपाचे असलेले मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले जात आहे. आम्ही लाचार नाही, शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात, अपमान आता सहन करण्यापलीकडे आहे, जे वाद सुरू आहेत, त्यांना विराम द्यावाच लागेल, अशी भाषा उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलली जात आहे. दुसरीकडे, आपले सरकार स्थिर आहे आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठासून सांगत आहेत. त्यामुळे जनतेत संभ्रम आहे. स्वाभाविकही आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकारचे काय होईल, सरकारला कोण पाठिंबा देईल, असे प्रश्‍न जनतेला सतावत आहेत. शिवसेनेची टोकाची भूमिका ही सध्या कागदावर आहे. पण, ती १८ फेब्रुवारीच्या त्यांच्या मुंबईच्या सभेत प्रत्यक्षात येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनीच घोषित केले आहे. शिवसेनेच्या वाघाने आधीच गुजरातचा ढोकळा खाल्ला असल्याने तो वाघ सध्या ढेकर देत आहे. या ढेकराची हवा किती लांबपर्यंत जाते, यावर वाघाचेही भवितव्य अवलंबून आहे. शिवसेनेचा वाघ मुंबईत डरकाळ्यांवर डरकाळ्या फोडत असतानाही, भाजपाचे कमळ ताजेतवाने असताना वाघाची तडफड होताना दिसत आहे. मुंबईशिवाय ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरपालिकांच्याही निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषदांमध्येही निवडणुका होत आहेत. पण, शिवसेनेचा वाघ तिकडे डरकाळ्या फोडण्यासाठी जायलाच तयार नाही! एखाद्या राक्षसाचा जीव जसा पोपटात अडकला असतो, तसा शिवसेनेच्या वाघाचा जीव मुंबईत अडकला आहे! जीव वाचविण्यासाठी वाघाची तडफड चालली आहे, हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. भाजपाने आधीच स्वत:ला मोठा भाऊ आणि शिवसेनेला छोटा भाऊ संबोधले असल्याने, मुंबईतल्या बीकेसी ग्राऊंडवर महानगरपालिका निवडणुकीसाठी होणारी शेवटची प्रचारसभा भाजपाने लहान भावासाठी सोडली आहे. या मैदानावर सभा घेता यावी यासाठी वाघाने १२ जानेवारी रोजीच एमएमआरडीएकडे अर्ज केला होता, असे वाघाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एमएमआरडीएवर दबाव आणत असल्याचा आरोपही वाघाने केला होता. उगाच वाद नको, आपण मोठे आहोत, मोठ्यासारखे राहिले पाहिजे, या भावनेतून भाजपाने वाघासाठी मैदान मोकळे सोडण्याचा मोठेपणा दाखविला आहे. ढोकळा खाल्लेला वाघ शेवटच्या दिवशी किती जोराने ढेकर देतो, हे पाहण्यासारखे राहणार आहे. रोजच्या रोज भाजपावर आरोप करायचे, आम्ही लाचार नाही असे म्हणायचे आणि राज्यातल्या व केंद्रातल्या सरकारमध्ये कायम राहायचे, हा खरे तर वाघाला न शोभणारा दुटप्पीपणा आहे. वाघाच्या तोंडात हात घालून दात पाडण्याची भाषा करणार्‍या कमळाला कोमेजून टाकण्याची ताकद वाघ गमावून बसला असावा, असे चित्र पाहायला मिळते आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुुकीत कमळाची बाग फुलविणार्‍या भाजपा नेत्यांना लक्ष्य करून आपण मतदार राजाच्या मनावर अधिराज्य गाजवू, असे दिवास्वप्न वाघ दिवसाढवळ्या पाहात आहे! पण, आपण एवढे प्रयत्न केले असताना, भाजपाचे फुललेले कमळ कोमेजतच नाही, हे पाहून वाघ अधिकाधिक आक्रमक होत चालला आहे. वाघाचा स्वत:वरील ताबा सुटत चालल्याचे पाहून कमळ जरा जास्तच फुलताना दिसत आहे. कमळाचा सुगंध मतदारांना भाजपाकडे आकर्षित करण्यात यशस्वी होताना दिसतो आहे. कमळाच्या अतिसुगंधाने वाघालाही सुस्ती येईल की काय, असे वाटायला लागले आहे. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. भारतीय संस्कृतीत जी चार प्रमुख प्रतीकं सांगितली आहेत, त्या चारमध्ये कमळाचाही समावेश आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म ही भारतीय संस्कृतीची चार प्रमुख प्रतीकं मानली जातात. चौथं पद्म हे जे प्रतीक आहे, ते म्हणजेच कमळ! कमळ चिखलात उमलत असले, तरी त्याच्या सौंदर्याला कुठेही बाधा पोचत नाही. पाण्यात वाढूनही ते पाण्याचा स्पर्श स्वत:ला होऊ देत नाही. हे स्थितप्रज्ञतेचे लक्षण मानले जाते. कमळ चिन्ह असलेल्या भाजपाचेही तसेच आहे. भाजपाचे नेते स्थितप्रज्ञ आहेत. जे वास्तव आहे तेच जनतेपुढे मांडतात. होणार्‍या टीकेला उत्तर देतानाही पातळी न सोडता बोलतात. हे कमळाचे वैशिष्ट्य भाजपाने जपले आहे आणि म्हणूनच भाजपाची लोकप्रियताही जनतेत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भाजपाचे कमळ हे राष्ट्रीय फूल आहे आणि शिवसेनेचा वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे. पण, वाघ हे काही शिवसेनेचे निवडणूक चिन्ह नाही. तो वाघ फक्त लोकांना भीती दाखविण्यासाठी आहे, असाच त्याचा अर्थ निघतो. शिवाय, मांस-मटणाऐवजी ढोकळा खाणारा वाघ किती जोराने डरकाळ्या फोडतो आणि त्या डरकाळीला कोणकोण घाबरतो, हेही पाहण्यासारखे राहील. मुंबईत वाघाच्या दररोज सभा होत आहेत. हा वाघ जंगलाचा राजा असलेल्या सिंहावरच गुरकावत असल्याने सर्वच प्राण्यांचे मनोरंजन होत आहे. खरे तर महापालिकेच्या निवडणुकीत हरीण (कॉंग्रेस), सांबर (राकॉं) हेही लढत आहेत. पण, हरीण वा सांबराची शिकार करायची सोडून शिवसेनेचा वाघ सिंहाचीच शिकार करायला निघाला आहे! या वाघाला समजावून सांगणाराही कुणी नाही. उचकावणार्‍यांचीच संख्या जास्त दिसते आहे. सिंह मारला जाणार नाही आणि हरीण व सांबरही जिवंत राहतील. मग वाघ भूक भागवेल कसा? भुकेने व्याकुळ झालेला वाघ क्षीण होण्याची आणि मग त्याच्याकडून शिकार होण्याचीही शक्यता कमीच दिसते. अजूनही वेळ गेलेली नाही. वाघाने सिंहाची शिकार करण्याचा प्रयत्न सोडून हरीण व सांबराच्या मागे लागावे. भूकही शमेल अन् धाकही राहील. हरीण व सांबरावर वचक कायम राहिल्याने थोडी दादागिरीही करता येईल. अन्यथा, सिंहाची शिकार करताना कृश झालेल्या वाघाला हरीण-सांबरही घाबरणार नाहीत. अस्वलं (एमआयएम व सेनेचे बंडखोर) तर गुदगुल्या करून करून वाघाला हैराण करतील. वाघाने पाठिंबा काढला तरी माझे सरकार स्थिरच राहणार, असा विश्‍वास सिंहाने व्यक्त केलाच आहे. वाघाने डरकाळी फोडली की, त्यापेक्षाही जास्त जोरात सिंह डरकाळी फोडत आहे. सिंह राज्यभर डरकाळ्या फोडत फिरत आहे. वाघ मात्र मुंबईतच अडकून पडला आहे. २१ फेब्रुवारीला लोक फैसला करणार आहेत अन् २३ ला तो जाहीर होणार आहे. बघू या काय होते अन् कुणाची डरकाळी प्रभावी ठरते ते…!