अखेर पलानीस्वामी मुख्यमंत्री

३१ मंत्र्यांनाही शपथ • उद्या बहुमत सिद्ध करणार

0
211

वृत्तसंस्था
चेन्नई, १६ फेबु्रवारी
तामिळनाडूत गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेला राजकीय पेच आज गुरुवारी अखेर निवळला आहे. ई. के. पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या नऊ महिन्यात या पदाची शपथ घेणारे ते तिसरे व्यक्ती ठरले आहेत. पलानीस्वामी शनिवारी बहुमत सिद्ध करणार आहे.
अण्णाद्रमुकच्या हंगामी सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर इकडे तामिळनाडूतील रिसोर्टमध्ये शशिकला यांनी पलानीस्वामी यांची पक्षनेतेपदी निवड केली होती. त्यांनी बुधवारी सायंकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल केला होता.
आज सायंकाळी साडेचार वाजता राजभवनात आयोजित समारंभात राज्यपालांनी पलानीस्वामी आणि अन्य ३१ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पलानीस्वामी हे शशिकला यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी आहेत. त्यामुळे आगामी काळात अण्णाद्रमुकची सूत्रे शशिकला यांच्याच हातात राहणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
रिसोर्ट रिकामे
तत्पूर्वी, आज सकाळी रिसोर्टमधून आमदारांनी चेन्नईकडे कूच करण्यास सुरुवात केली होती. गेल्या १० दिवसांपासून पक्षाचे ११८ आमदार याच रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. या आमदारांना रिसार्टमध्ये डांबून ठेवले असल्याचा आरोप ओ. पन्नीरसेल्वम् यांच्या गटाने केला होता. पण, पोलिसांनी तो फेटाळून लावला होता.