युतीमुळे वेगळ्या विदर्भ निर्मितीत अडचण : जोगी

0
168

तभा वृत्तसेवा
नागपूर, १६ फेब्रुवारी
भारतीय जनता पार्टीने नेहमीच छोट्या राज्याच्या निर्मितीला समर्थन दिले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात झारखंड, छत्तीसगड यासारख्या छोट्या राज्यांची निर्मिती झाली. तेलंगणा राज्य निर्मितीसाठी सुद्धा भाजपाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती होण्यात भाजपा-सेना युती हीच खरी अडचण आहे. सेनेचा विदर्भ राज्य निर्मितीला विरोध असल्याने विदर्भाचा मुद्दा मार्गी लागणे कठीण आहे. या दोन्ही पक्षांची युती जास्त काळ चालली नाही तर विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्‍वास छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व जनता कॉंग्रेस छत्तीसगडचे (जे) पार्टीचे सर्वेसर्वा अजित जोगी यांनी आज पत्रपरिषदेत व्यक्त केला.
मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राजकुमार तिरपुडे यांच्या विदर्भ माझा पार्टी या विदर्भवादी पक्षाच्या प्रचारार्थ आज अजित जोगी नागपुरात आले असता श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी जोगी म्हणाले, आमची भूमिका नेहमीच लहान राज्य निर्मितीच्या बाजूने राहिली आहे. विदर्भ माझा पार्टीला काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेने विदर्भाच्या मुद्यावर सेवेची संधी दिली. त्यामुळे विदर्भातील जनतेची भावना विदर्भ राज्याच्या बाजूने आहे, हे दिसून येते. नागपूर शहरात छत्तीसगडमधील शाहू समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबरीने छत्तीसगड येथील नागरिकांच्या वस्त्या आहे. त्या छत्तीसगडबहुल भागात आपण मनपा निवडणुकीसाठी विदर्भ माझा पार्टीचा प्रचार करणार आहोत. कॉंग्रेसने नेहमीच छोट्या राज्यांच्या निर्मितीला विरोध केला आहे, हा या देशाचा इतिहास आहे. तशी विदर्भाची मागणी फार जुनी आहे. मात्र राज्य व केंद्र शासनाच्या आजवरच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे विदर्भ राज्य होऊ शकले नाही. संयुक्त मध्यप्रदेशातून आम्ही बाहेर पडलो तेव्हा छत्तीसगडचे बजेट ४ हजार कोटींचे होते. आज ते ८० हजार कोटींचे आहे आणि पुढचे बजेट १ लाख कोटींचे राहील. या आकड्यावरूनच छोट्या राज्यांच्या विकासाची गती लक्षात घ्यावी, असेही जोगी म्हणाले.
सर्वच स्तरावरील निवडणुकांमध्ये वैदर्भीय पक्षांनी उतरणे हा सुद्धा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्यासाठीच्या चळवळीचा एक भाग आहे. लहान राज्ये निर्माण करण्यास अनुकूल असणारी भाजपा विदर्भाच्या मुद्यावर निर्णय का घेत नाही, याचे उत्तर त्यांनी लवकरात लवकर द्यावे,
असेही अजित जोगी म्हणाले. पत्रपरिषदेला राजकुमार तिरपुडे, डॉ. गोविंद वर्मा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.