मी अतिरेकी नाही, प्रवासबंदी उठवा

0
190

वृत्तसंस्था
लाहोर, १६ फेबु्रवारी
मी आणि माझी जमात-उद-दावा ही संघटना दहशतवादी नाही आणि माझ्यामुळे पाकिस्तान सरकारला कोणताही धोका नाही. तेव्हा माझ्यावर व संघटनेच्या काही बड्या नेत्यांवर देश सोडण्यासंदर्भात घालण्यात आलेली बंदी तातडीने उठविण्यात यावी, असा इशारा या संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने नवाज शरीफ सरकारला दिला आहे.
माझ्या संघटनेने आजवर पाकिस्तानात कधील कोणतेही दहशतवादी कृत्य केले नाही आणि बॉम्बस्फोटही घडविले नाही.
सरकारलाही माझ्यापासून कोणताच सुरक्षाविषयक धोका नाही, असा दावा सईदने केला आहे. पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात सईद, त्याची फलाह-ए-इन्सानियत ही धर्मादाय संस्था आणि जमात-उद-दवाशी संबंधित ३७ जणांवर पाक सोडून जाण्यावर निर्बंध लादले आहेत. सोबतच, सईद व त्याच्या चार साथीदारांना तीन महिन्यांसाठी नजरकैद करण्यात आले आहे.
आमच्यावरील बंदी अन्यायकारक आहे. कारण, मी आणि माझी संघटना देशात कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालो नाही.
आमच्यामुळे सार्वजनिक संपत्तीचेही नुकसान झाले नाही. आम्ही केवळ लोकांची सेवाच केली आहे. असे असतानाही आमच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रांतीय तसेच स्थानिक न्यायालयांमध्ये आमच्याविरोधात कोणताही पुरावा सादर करण्यात आला नसल्याचा दावा सईदने केला आहे.
हाफिजला मुक्त करा : मुशर्रफ
दरम्यान, पाकचा माजी हुकुमशाह आणि कारगिल युद्धाचा जनक परवेझ मुशर्रफ याने हाफिजची नजरकैदेतून तत्काळ मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हाफिजची जमात-उद-दावा ही संघटना समाजसेवी असून, लोकांच्या मदतीला ती नेहमीच धावून जात असते, असा युक्तिवादही मुशर्रफ यांनी केला आहे.
हाफिज हा दहशतवादी नाही. हाफिज व त्याच्या संघटनेने आजवर केवळ देशसेवाच केली आहे. महाविनाशी भूकंपानंतर त्याच्याच संघटनेने लोकसेवा केली होती, अशी आठवणही मुशर्रफ यांनी करून दिली.