२५ वर्षांत एकही शिंतोडा नाही : मुख्यमंत्री

0
147

वृत्तसंस्था
मुंबई, १६ फेब्रुवारी
न्यायालयाने रद्दबातल केलेल्या नंदलाल समितीच्या अहवालाच्या आधारे शिवसेनेने नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत केलेले आरोप बिनबुडाचा आहे. २५ वर्षांच्या राजकारणात माझ्यावर एकही शिंतोडा उडाला नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
शिवसेना आमदार अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. त्यासाठी तत्कालीन सरकारने नेमलेल्या नंदलाल समितीचा अहवालही त्यांनी दाखविला. शिवसेनेच्या या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांदिवली येथील भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत चोख उत्तर दिले.
ते म्हणाले की, आता उद्धवजींचे पोपट बोलू लागले आहेत. पण, नंदलाल समितीचा अहवाल वाचण्याआधी त्या पोपटाने उच्च न्यायालयाचा निकाल वाचला असता तर आरोपच केला नसता.
तेव्हाच्या कॉंग्रेस सरकारने नागपूर महापालिकेविरोधात नंदलाल समिती बसविली होती. पुढे महापालिकाही बरखास्त केली. मात्र, नंदलाल समितीने ठोस पुरावे नसतानाही अहवाल बनविल्याचे सांगत न्यायालयाने तो अहवाल रद्दबातल केला. याविरोधात तेव्हाचे कॉंग्रेस सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही तेच घडले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबई विमानतळावरील खंबाटा एव्हिएशन प्रकरणातही त्यांच्या युनियनने साटेलोटे करीत कामगारांना देशोधडीला लावले.
खंबाटाच्या तिजोरीतून शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना, त्यांच्या नेत्यांच्या घरच्यांना पगार जातो, असा आरोपही फडणवीस यांनी केला.