अभिनंदन…!

0
134

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात ‘इस्रो’चे आणि ‘इस्रो’तील शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे! एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करून ते सगळे उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये कौशल्यपूर्ण रीतीने स्थापित करण्याची ऐतिहासिक कामगिरी आमच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. ‘इस्रो’बद्दल आणि ‘इस्रो’त काम करणार्‍या आमच्या सर्व राष्ट्रभक्त शास्त्रज्ञांबद्दल भारतीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे. संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढविल्याबद्दल ‘इस्रो’चे हार्दिक अभिनंदन! राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी तर ‘इस्रो’चे अभिनंदन केलेच, पण समस्त भारतीयांनीही अभिनंदन केले पाहिजे. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, अशी दमदार कामगिरी आमच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे यान १०४ उपग्रह घेऊन अंतराळात झेपावले अन् इतिहास घडला. ‘इस्रो’च्या शिरपेचात मानाचे १०४ तुरे रोवले गेले! स्वत:चा टेंभा मिरविणार्‍या अमेरिका आणि ब्रिटनलाही मागे टाकत भारताने अतिशय देदीप्यमान यश संपादन केले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एकाच वेळी १०४ उपग्रह अंंतराळात पाठविण्याची धाडसी कामगिरी करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे! असे करून शास्त्रज्ञांनी ‘इस्रो’चे विश्‍वरूपदर्शन आंतरराष्ट्रीय समुदायाला घडविले आहे. विशेष म्हणजे भारताने ज्या १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे, त्यात १०१ विदेशी उपग्रह आहेत. इतर देशांना त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आता भारतीय तंत्रज्ञानाचा आणि भारताच्या भूमीचा आधार घ्यावा लागतो, ही आम्हा भारतवासीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ‘इस्रो’ला जे करणे शक्य झाले आहे, ते जगातल्या कुठल्याही देशाला आजवर शक्य झालेले नाही. अमेरिकेच्या ‘नासा’लाही हे साध्य झाले नाही. आज आमच्या देशातील मुलं प्रशिक्षणासाठी ‘नासा’त जातात, उद्या अमेरिका-ब्रिटनादी देशांमधील मुलं ‘इस्रो’त आली तर नवल वाटायला नको, एवढी चमकदार अन् दमदार कामगिरी आमच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. ‘इस्रो’च्या या कामगिरीमुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. शेजारच्या चीनला जरी ‘इस्रो’चे यश रुचले नसले, तरी प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली नसती तरच नवल! प्रत्येकाच्या तोंडून ‘इस्रो’च्या कौतुकाचेच शब्द निघत आहेत. ‘इस्रो’ची वाटचाल हळूहळू प्रगतिपथावर आहे आणि भविष्यात तिला आणखी वेग येईल, यात शंका नाही. २००८ साली ‘इस्रो’ने १० उपग्रहांच्या प्रक्षेपणासह हे अभियान हाती घेतले होते. त्यानंतर संख्या वाढत वाढत ३५ पर्यंत गेली आणि आज ‘इस्रो’ने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविले, ही भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात झालेली क्रांंतीच म्हटली पाहिजे! प्रत्यक्षात ‘पीएसएलव्ही’ या अंतराळ यानातून ४०० उपग्रह पाठविता येणे शक्य आहे, अशी जी माहिती, प्रसिद्ध अंतराळ संशोधक जी. के. माधवन् नायर यांनी दिली आहे, ती लक्षात घेता, ‘इस्रो’ने केलेली प्रगती अफाट असल्याचे म्हणावे लागेल. भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या परिश्रमाने, जिद्दीने, चिकाटीने, समर्पणभावाने केलेल्या कष्टाचे हे चीज आहे, असेही या कामगिरीचे वर्णन करता येईल! ‘पीएसएलव्ही’चे तंत्रज्ञान भारताने फार आधीच विकसित केले आहे. ते नवीन नाही. मात्र, यशस्वी प्रक्षेपणाची अन् एकाच वेळी अधिकाधिक उपग्रह पाठविण्याची क्षमता ‘इस्रो’ने विकसित केली, ही आनंदाची बाब होय. २००८ साली भारताने ‘पीएसएलव्ही’ या अंतराळ यानातून जे १० उपग्रह अवकाशात सोडले होते, त्यात ‘कार्टोसॅट-२ ए’ आणि ‘आयएमएस’ असे दोन भारतीय उपग्रह होते आणि आठ विदेशी उपग्रह होते. जपान, जर्मनी, कॅनडा, डेन्मार्क आणि नेदरलॅण्ड या देशांचे ते उपग्रह होते. उपग्रह अवकाशात पाठविण्याचे हे संपूर्ण मिशन २० मिनिटे चालले होते आणि उपग्रह यशस्वी रीत्या अवकाशात पाठवून ते कक्षेत कुशलतापूर्वक स्थापित करून ‘इस्रो’ने अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहून पूर्ण केला! संपूर्ण जगाला भारताने आश्‍चर्यचकित केले होते. भारताच्या आधी रशियाने एकाच वेळी १३ उपग्रह पाठविल्याची बातमी आली होती. परंतु, ना रशियाने त्याला पुष्टी दिली होती, ना अन्य कुणी! पण, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने २०१३ मध्ये एकाच वेळी २९ उपग्रहांचे प्रक्षेपण करून एक नवा विक्रम स्वत:च्या नावे नोंदविला होता. मात्र, नंतरच्या काळात लागलीच रशियाने एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात पाठवून अमेरिकेच्या ‘नासा’चा विक्रम मोडीत काढला अन् सर्वाधिक उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठविण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला. संपूर्ण जगात त्या वेळी रशियाचीच चर्चा होती. याच मालिकेत २२ जून २०१६ रोजी एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडून ‘इस्रो’ने एक अभिनव विक्रम स्वत:च्या नावे नोंदविला. या २० मध्ये तीनच उपग्रह भारताचे होते आणि १७ इतर देशांचे. यात एकट्या अमेरिकेचे १३ उपग्रह होते, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. अमेरिकेला उपग्रह पाठवायला जेवढा खर्च लागतो, त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात ‘इस्रो’कडून उपग्रह पाठविले जातात, हे भारतीय शास्त्रज्ञांचे यशही विलक्षण मानले पाहिजे. अन्य देश आपले उपग्रह भारताच्या ‘इस्रो’मार्फत अवकाशात सोडताहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. मागे, भारताने जेव्हा ‘रोहिणी’ नावाच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते, तेव्हा त्याला एक ‘खेळणे’ संबोधून अमेरिकेने आमच्या अंतरिक्ष कार्यक्रमाची थट्‌टा केली होती. भारत कधीच रॉकेट बनवू शकत नाही, असेही अमेरिका म्हणाली होती. एवढेच नाही, तर अमेरिकेच्या सिनेटमध्ये असे बोलले गेले होते की, यापुढे भारतीय भूमीवरून अमेरिका आपला उपग्रह प्रक्षेपित करणार नाही. स्वत:च्या क्षमतेवर अमेरिकेला जो गर्व होता, तो यातून दिसून पडला होता. पण, हिंदीत म्हणतात की, ‘समय बलवान होता हैं,’ याची प्रचीती अमेरिकेला आली. अमेरिकेने सिनेटमध्ये घेतलेली भूमिका बदलली. भारताने तसे करण्यास अमेरिकेला बाध्य केले! आज तर परिस्थिती अशी आहे की, जगातील समस्त देश ‘इस्रो’मार्फत त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यास आतुर झाले आहेत. अमेरिकाही यात मागे नाही! प्रत्यक्षात ‘इस्रो’ने आपली रॉकेट प्रणाली एवढी सक्षम, मजबूत, प्रगत अन् परिपक्व बनविली आहे की, जगातले सगळे देश डोळे बंद करून त्यावर विश्‍वास ठेवायला लागले आहेत! ही आम्हा भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. ज्या अमेरिकेने एकेकाळी आमच्या अंतराळ संशोधन कार्याची टिंगलटवाळी केली, तीच अमेरिका आता डोळे झाकूून आमच्या संशोधनावर विश्‍वास ठेवते, ही आमच्या संशोधकांच्या यशाची पावतीच आहे! ‘इस्रो’च्या संशोधनकार्यात एकाच अपयशाची नोंद तेवढी झाली आहे. २० सप्टेंबर १९९३ रोजी श्रीहरिकोटाहून प्रक्षेपित झालेला उपग्रह निर्धारित कक्षेपर्यंत पोचू शकला नव्हता. पण, त्यानंतर ‘इस्रो’ला कधीही अपयश आले नाही आणि आमच्या शास्त्रज्ञांनी मागे वळूनही पाहिले नाही. ‘इस्रो’ची ताजी कामगिरी लक्षात घेतली, तर भविष्यात यापेक्षाही मोठमोठ्या मोहिमा यशस्वी केल्या जातील अन् देश गौरवान्वित होत राहील, यात तिळमात्र शंका नाही! आता मिळविलेल्या यशासाठी ‘इस्रोे’चे पुनश्‍च अभिनंदन अन् भावी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा…!