नोटबंदीनंतरच्या विशेष रोजगार संधी

0
144

अर्थकारण

भारतीय अर्थव्यवस्थेतील विशेष स्थित्यंतरण म्हणून गाजलेल्या नोटबंदीच्या निमित्ताने विशेष रोजगार संधी पण उपलब्ध झाल्या आहेत. ‘ऑनलाईन’ म्हणजेच संगणकीय पद्धतीने आर्थिक व्यवहार आणि पैशाच्या देवाण-घेवाणीला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले सरकारी प्रयत्न व त्या दरम्यान जनसामान्यांना उपयुक्त ठरण्यासाठी घेण्यात आलेल्या कल्पक पुढाकारानेच हे शक्य झाले आहे.
यानिमित्ताने प्राप्त संधीचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने नोटबंदीनंतरच्या काळापासूनच ‘डिजिटल वॉलेट’ व ‘डिजिटल पेमेंट’ या जनसामान्यांसाठी आवश्यक ठरलेल्या आर्थिक व्यवहार क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांनी त्यासाठी आवश्यक संगणकीय सेवा-उपकरणांची विक्री करण्याचा जणू सपाटाच लावला. त्यासाठी फार मोठ्या संख्येने दुकानदार, विक्री करणारे व वस्तू आणि सेवांचे पुरवठादार यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यासाठी या कंपन्यांनी आपल्या मार्केटिंग विभागासाठी सुरू केलेली उमेदवार निवड-नियुक्तीची प्रक्रिया अद्यापही सुरूच असून, त्याचा मोठा फायदा नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना झाला आहे.
नोटबंदी निर्णयापूर्वी देशांतर्गत सुमारे २ लाख व्यापारी-व्यवसायी संगणकीय पद्धतीचे आर्थिक व्यवहार करीत होते. नोटबंदीनंतरच्या काळात ही संख्या २५ पटीने वाढली असून, आज सुमारे ५० लाख व्यापार्‍यांनी ई-पेमेंट पद्धतीचा अवलंब केला. त्यासाठी सुमारे २०,००० जणांना या नव्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाले आहेत, हे विशेष!
या अनुभवातून डिजिटल सेवा-उपकरणे उपलब्ध करून देणार्‍या सर्वच कंपन्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार तातडीने केला असून, ही प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या बंगळुरू येथील नोव्होपय या कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत नादमुनी यांच्यानुसार संगणकीय पद्धतीवर आधारित आर्थिक व्यवहार-पद्धतीचा विस्तार करण्यासाठी आम्हाला आगामी काळातही कर्मचार्‍यांची आवश्यकता पडणार आहे. याशिवाय यापूर्वी आणि सध्या विकलेल्या मशिनरी आणि उपकरणांची सेवा-निगा वा दुरुस्तीसाठीसुद्धा उमेदवारांची गरज राहणारच आहे.
गुडगाव येथील ‘मोबीक्विक’ या डिजिटल वॉलेट कंपनीचे सध्या २.५ लाख ग्राहक व त्यांच्या सेवेचा लाभ घेणारे सुमारे ४ कोटी लोक असून या कंपनीनेसुद्धा नजीकच्या भविष्यात सुमारे २०० कर्मचारी नव्याने घेण्याचे ठरविले आहे.
मुंबईच्या ‘इटझ्-कॅश’ या डिजिटल पेमेंट कंपनीचे थेट पूर्वोत्तर राज्यांपर्यंतच्या ३,००० नगरांमधील ७५,००० मुख्य ग्राहक असून, त्यांनाही नोटबंदीचा मोठा फायदा झाला आहे. कंपनीने यानिमित्ताने आपल्या ई-पेमेंट व्यवहारांचा आवाका थेट १५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू ठेवले असून, ‘इटझ्-कॅश’ने आपल्या कर्मचार्‍यांच्या संख्येत सुमारे १० टक्के वाढ करण्यासाठी पावले उचलली आहेत.
नव्या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध होऊ घातलेल्या डिजिटल पेमेंट वा ई-आर्थिक व्यवहार क्षेत्रातील मोठ्या संख्येतील या रोजगार संधीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी आवश्यक कौशल्य पात्रता वेगळ्या धाटणीची व वेगळ्या चाकोरीची आहे. म्हणजेच प्रचलित वा साचेबद्ध शैक्षणिक पात्रता व अनुभवापेक्षा या क्षेत्राच्या उमेदवारांच्या संदर्भातील अपेक्षा- आवश्यकता एकदम वेगळ्या आहेत.
मुंबई येथील बहुउद्देशीय बँंकिंग ऍप कंपनी ‘चिल्लर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष जुबीन शाजू यांच्या मते, डिजिटल पेमेंट क्षेत्रात विक्री-व्यवसायवृद्धी वा ग्राहकसेवा क्षेत्रात काम करण्यासाठी मूलत: आवश्यकता असते ती संगणकीय कार्यप्रणालीच्या माहिती व ज्ञानाची. त्यालाच साधारणत: एक वर्षाचे प्रशिक्षण वा अनभवाची जोड मिळाल्यास या क्षेत्रात सध्या सहजतेने रोजगार मिळू लागले आहेत. असे असले तरी ई-पेमेंेट क्षेत्रात नव्याने येणार्‍यांमध्ये उद्यमशीलता, ग्राहकाभिमुख वृत्ती व कल्पकता याची जोड असणे ही बाब पण तेवढीच आवश्यक असते या बाबीकडे पण ते लक्ष वेधतात.
गुडगाव येथील ऑक्सिजन सर्व्हिसेस ही कंपनी व्यापारी-दुकानदारांना फुटकळ वा छोटेखानी आर्थिक व्यवहारांसाठी विशेष संगणकीय सेवा पुरविण्याचे काम करते. कंपनीने नव्यानेच आपल्या अचानक वाढलेल्या व्यवसायासाठी ५०,००० थेट विक्री प्रतिनिधी व ५०० सुपरवायझर्सची नेमणूक केली असून, त्याद्वारे बाजारातील वाढती मागणी पुरविण्याचे काम सुरू झाले. त्याशिवाय कंपनीद्वारे पुरविण्यात आलेल्या उपकरणांच्या वाढत्या दुरुस्तीच्या कामासाठी नव्याने २०० सुपरवायझर्सची नेमणूक केली आहे.
याशिवाय ऑक्सिजन सर्व्हिसेसने आपल्या नजीकच्या व्यवसाय विस्तार योजनेत चिल्लर दुकानदार, भाजी विक्रेते, आठवडे बाजारातील व्यावसायिक, हातगाडीवाले, फेरीवाले, टपरीवजा विक्रेते इ.साठी खास डिजिटल पेमेंट उपकरणे आणली असून, या उपकरणांची विक्री करण्यासाठी खास प्रादेशिक भाषांचे पुरेसे ज्ञान असणार्‍या उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे कंपनीचे कॉर्पोरेट अफेअर्स ऍण्ड एचआर विभागाचे अध्यक्ष मेहेर सरीद यांनी नमूद केले. त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍या व स्थानिक भाषांचे ज्ञान असणार्‍या उमेदवारांना सुगीचे दिवस आले आहेत.
रोजगारांच्या संदर्भात नव्याने व मोठ्या प्रमाणात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देणार्‍या डिजिटल कंपन्यांच्या संदर्भात सध्या प्रचलित उल्लेखनीय बाब म्हणजे त्यामध्ये डिजिटल पेमेंटशी संबंधित तांत्रिक क्षेत्र, विक्री-व्यवसायवृद्धी, ग्राहक सेवा, दुरुस्ती इ. विविध विभागात सारख्याच स्वरूपात व संख्येत रोजगार संधी उपलब्ध होत असून, कॅशलेस व्यवहारांना- व्यवसायाला अल्पावधित व मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सरकारी प्रयत्नांपोटीच हे शक्य झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
या संदर्भात क्वोलॅरिटी या आर्थिक व्यवहारविषयक संगणकीय सेवा देणार्‍या कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरिश गुप्ता यांनी नमूद केल्यानुसार मोदी सरकारने ‘लेस कॅश’ व ‘कॅश लेस’ या दुहेरी स्वरूपात घेतलेल्या पुढाकारामुळे देशांतर्गत आर्थिक व्यवहार आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल स्वरूपात होणे अपरिहार्य असून, या नव्या संधीचा व्यावसायिक फायदा करून घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची संगणकीय पद्धतीने आर्थिक व्यवहारांशी सांगड घालणार्‍या व त्याचा निमशहरी वा ग्रामीण भागातील जनसामान्य नागरिक व छोट्या व्यावसायिकांना सहज सुलभ व फायदेशीर ठरेल अशा तंत्रज्ञ-इंजिनीअर्सची या क्षेत्राला तातडीने गरज आहे.
परिणामी संगणक क्षेत्रासह विविध उद्योगांसाठी उमेदवारांची निवड करण्याचे काम करणार्‍या अथवा त्यांना थेट उमेदवारांचा पुरवठा करणार्‍या निवड-सल्लागार संस्थांना सध्या विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थातच कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात करावयाची उमेदवारांची निवड हे मोठेच आव्हानपर पण तेवढेच फायदेशीर काम असून, त्यासाठी संगणकीय आर्थिक व्यवहार क्षेत्रात आपण सुचविलेल्या उमेदवारांची निवड व्हावी यासाठी काही रोजगार-सल्लागार कंपन्यांनी तर मूलभूत कामाचा परिचय करून देण्यासाठी विशेष मार्गदर्शनपर प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात केली आहे. या संदर्भातील या कंपन्यांचा अनुभव उत्साहवर्धक ठरला आहे. ‘पेटीएम’ने डिजिटल स्वरूपातील आर्थिक सेवा व व्यवहार क्षेत्रातील आघाडी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या व्यवसाय क्षेत्रात नव्याने ५० लाख मध्यम व छोट्या व्यापार्‍यांची भर घालण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पण या क्षेत्रातील रोजगार संधीमध्ये नजीकच्या काळात मोठी भर पडणार आहे. हे सारे नोटबंदीमुळेच शक्य झाले असून, यानिमित्ताने नोटबंदीचा एक मोठा फायदा वेगळ्या संदर्भात सर्वांपुढे आला आहे.

दत्तात्रय आंबुलकर