पाकच्या मशीदमध्ये इसिसचा मानवी बॉम्बहल्ला, ७० ठार

0
208

१५० जखमी
वृत्तसंस्था
कराची, १६ फेब्रुवारी
येथून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या सेहवान शहरातील सुफी लाल शाहबाज कलंदर मशीद येथे इसिसने मानवीबॉम्ब हल्ला केला. या स्फोटात सुमारे ७० जण ठार आणि १५० जण जखमी झालेत.
मानवीबॉम्बधारी गोल्डन गेटमधून सुफी लाल शाहबाज कलंदर दर्ग्यामध्ये प्रवेश केला. दर्ग्यामध्ये जिथे धमाल हे सुफी पवित्र गायन सुरू होते. त्याच ठिकाणी आधी या मानवीबॉम्बधारीने ग्रेनेड फेकले, परंतु त्याचा स्फोट झाला नाही. नंतर त्याने स्वतःच्या अंगावर लावलेल्या बॉम्बचा स्फोट केला, असे सेहवान पोलिस स्टेशनचे तारिक विलायत यांनी सांगितले.
या मानवीबॉम्ब हल्ल्यात महिला, मुलांसह सुमारे ७० जण ठार झाले असून अडीचशे लोक जखमी झाले आहेत, असे सेहवान पोलिस स्टेशनचे रसूल बक्श यांनी सांगितले. बॉम्बस्फोट झाला, तेव्हा दर्ग्यामध्ये जवळपास शंभर भाविक होते. सिंधमधील दर्गा आमचे लक्ष्य होते, असे म्हणत इसिसने या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, असे आमाक या न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
हा दर्गा हैदराबादपासून १३० कि.मी. अंतरावरील दुर्गम भागात आहे. जखमींना रूग्णालयात हलविण्यासाठी हैदराबाद, जामशोरो, मोरो, दादू व नवाबशाह येथून रुग्णवाहिका व वाहने तसेच वैद्यकीय चमू पाठविण्यात आले. या ठिकाणच्या रूग्णालयात मदत कार्य सुरू आहे, असे हैदराबादचे आयुक्त काझी शाहीद यांनी सांगितले.
या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना तसेच जखमींना हलविण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्यदलाला रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टरची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे, असे सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी सांगितले. नवाबशाह येथून जखमींना सी-१३० विमानाने हलविता येईल, असे सैन्यदलाने म्हटले आहे.
या मानवीबॉम्ब हल्ल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून त्यांनी नागरिकांना संघटितपणे उभे राहण्याचे आवाहन केले. गतवर्षी १३ नोव्हेंबर रोजी बलुचिस्तानच्या लासबेल्ला जिल्ह्यात शाह नुरानी मशिदमध्ये झालेल्या इसिसच्या मानवी बॉम्ब हल्ल्यात ५२ जण ठार आणि सुमारे शंभरावर जखमी झाले होते. जुलै २०१० मध्ये लाहोरमधील दाता गंज बक्श हाजवेरी या सुफी मशिदमध्ये झालेल्या दोन मानवी बॉम्ब हल्ल्यात सुमारे ५० लोक ठार झाले होते. ऑक्टोबर २०१० मध्ये कराची येथील सुफी संत अब्दुल्लाह शाह गाझी मशिदमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात नऊ जण ठार झाले होते.