झटपट स्वयंपाकाचे नियोजन

0
275

सीमा-समीरची गाडी बंद पडली आणि त्यांना राधाकडेच यावे लागले, राधा म्हणाली, छान हातपाय धुऊन ताजेतवाने व्हा तोपर्यंत १/२ तासात स्वयंपाक तयार होईल, असे म्हणतच तिने कुकर लावला व फ्रीजरमधले एगकरीच्या तयार मसाल्याचे पाकिट गरम पाण्यात टाकले, एकीकडे अंडी उकडायला ठेवली, तर दुसरीकडे निवडून धुऊन ठेवलेली फुलकोबीची फुले फोडणीत टाकली व सकाळसाठी म्हणून भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या केल्या, अगदी खरंच ३०-४० मिनिटात स्वयंपाक तयार होऊन सर्व जेवायलाही बसले. अगदी कोथींबीर खोबर्‍यासह व जेऊन पुन्हा छान १-२ तास गप्पा मारत बसता आले.
राधाने इतक्या झटपट, नेहेमीचा वेळखाऊ स्वयंपाक केल्याचे पाहून सीमा समीर थक्कच झाले. कस शक्य झाले तिला हे सर्व? राधा म्हणाली, अग काही नाही, मी स्वयंपाकाची नेहेमीच तयारी करून ठेवते म्हणजे सकाळी आयत्या वेळी धावपळ होत नाही. रात्री जेवणे झाली की १/२-१ तास टीव्ही अथवा गप्पा मारता मारता आम्ही सर्वचजण एकीकडे काही ना काही करतो, त्याने काम तर होऊन जातेच पण ते जाणवतही नाही. अथवा काही तयारी योग्य नियोजन केल्यास एकीकडे स्वयंपाक करता करताही होते. आता सविस्तरच सांगते.
शनिवार/रविवार भाजी बाजार झाला की आम्ही ती १-१ तास घालवून स्वच्छ धुऊन निवडून ठेवतो, बाजारात अनेक भाज्या निवडून साफ करूनही मिळतात, पण त्या परत स्वच्छ धुऊन मात्र घ्यायला हव्यात. स्वच्छ धुऊन निवडून, ठेवलेली भाजी, ओलसर कोरड्या कपड्यात/कागदात गुंडाळून ठेवलेली भाजी सहज ५/६ दिवस छान ताजी राहाते व डबा उघडला की डायरेक्ट फोडणीतच टाकता येते. खूप थंडीच्या दिवसात थंडगार भाजी फोडणीत टाकली तर दाठरते, शिजत नाही, अशा वेळी भरपूर लवकर फ्रीजबाहेर काढून ठेवावी, अथवा थोडा वेळ गरम पाण्यात टाकून ठेवावी.
१. नारळ फोडला की तो खोवून गरजेप्रमाणे ३/४ डब्यांमध्ये ठेवावा व जरुरीप्रमाणे फ्रीजमध्ये काढून ठेवल्यास ३/४ दिवस उत्तम राहातो व पटकन वापरता येतो, हल्ली काही दुकानात, ताजा खोवलेला नारळही विकत मिळतो.
२. धुतलेली कोरडी कोथींबीर चिरून, घट्ट झाकणाच्या डब्यात, एखाद्या कापडाच्या तुकड्यावर ठेवल्यास ३/४ दिवस सहज कामी येते, डबा उघडा आणि पदार्थावर कोथींबीर पेरा.
३) आले, लसूण, मिरची ह्या गोष्टी वाटून डब्यांमध्ये ठेवल्यास, ८-१० दिवस छान राहातात व हव्या त्या वेळी हव्या त्या प्रमाणात उपलब्ध राहातात. आणि मग बाजारात मिळणार्‍या प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या व स्वाद कमी झालेल्या पेस्ट आणायची गरज नाही. परदेशातही अशा पेस्ट वापरण्याची क्रेझ कमी झाली आहे.
४) आता नॉनव्हेजचे वेगवेगळे मसाले, रस्यांचे ओले मसाले, अथवा भरली वांगी, भरली भेंडी, भरली मिरची वगैरे भाज्यांचे मसाले. एकदा करतानाच सवडीप्रमाणे, अजून १/२ वेळचा करून फ्रीज/फ्रीजरमध्ये ठेवल्यास पुढच्या १/२ वेळाची झटपट सोय होऊन जाते. जो ओला मसाला वारंवार लागतो, तो एखाद्या वेळी भरपूर करून आपल्या आवश्यकतेनुसार पाकिटे करून फ्रीजरमध्ये टाकली तर हवी तेव्हा काढून वापरता येतील. जरी हे सर्व बाजारात मिळत असले तरी प्रत्येकाची आवड व पद्धत वेगळी असते व विशिष्ट चवच विशिष्ट व्यक्तीला समाधान देते.
५ ) अशाच प्रकारे ओल्या चटण्या, भेळ, पाणीपुरी, रगडा चटणी, पंचामृत, टोमॅटो प्युरी वगैरे गोष्टींचे. भेळेचे मिक्चर व चटण्या तयार असतील, तर कांदा, कोथींबीर चिरा आणि भेळ खा, अथवा, बटाटे व काळे वाटाणे/छोले उकडवा आणि पाणीपुरी, दहीपुरीचा आस्वाद घ्या.
६) पुर्‍या, वड्याचे पीठ, गोळेभाताचे वगैरे गोष्टींचेही तसेच करता येईल. एखाद्या वेळी पुर्‍या करताना थोडी जास्त कणीक भिजवावी व लाट्या करून प्लस्टिक पेपरमध्ये घट्ट गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा, जेव्हा हव्या तेव्हा
काढून स्वादिष्ट पुरीचा आस्वाद घ्या, हीच गोष्ट गोळेभाताच्या गोळ्यांची, प्रथम जेव्हा करू, तेव्हा पुढच्या एका वेळेची निश्‍चितच सोय करून ठेवू शकतो व झटपट आमटी किंवा गोळेभाताचा आनंद लुटू शकतो. पोळ्यांचीही
पुढच्या वेळेची कणीक पुष्कळजण भिजवून ठेवतात.
कोरडी तयारी तर करणे सोपे व सहज असते. आजकाल किराणा निवडण्याची गरजच नसते, पण डब्यात भरण्यापूर्वी एक नजर अवश्य टाकावी.
आणलेला रवा इतर स्वयंपाकाबरोबर, अथवा फुरसतीच्या वेळी भाजून ठेवावा व पाहिजे तर बाजारातल्याप्रमाणे त्याची उपमा, सांज्याची इन्स्टंट पाकिटे बनवून फ्रीजमध्ये टाकून ठेवावे, उकळते पाणी टाकून, दोन वाफा दिल्या की आपल्या पद्धतीचा, चवीचा गरम गरम उपमा, सांजा तयार! हा रवा वेळेप्रमाणे अर्धवट भाजूनही सोडता येतो व परतच्या स्वयंपाकाचे वेळी पूर्ण खमंग भाजून टाकू शकतो. सवडीने भाजल्याने छान मंद, खरपूस भाजला जातो. हीच गोष्ट दाणे, तीळ, खसखस, कोरड्या चटण्या यांची. भाजून कूट, पावडर करून ठेवले की १५-२० दिवसांची काळजी मिटली. ह्या सर्व गोष्टी, कामाचे व वेळाचे नियोजन व व्यवधान उत्तम ठेवले तर अगदी सहजगत्या इतर स्वयंपाक, कामे करता करताच होतात.
हीच गोष्ट वेगवेगळी पीठे, तयार असण्याची. अनेक भाजण्या, वडे, थालिपीठे ह्यांची तयार पीठे , अगदी सर्व तिखट, मीठ सर्व घालून तयार मिळतात, पण अनेकदा त्यांची चव आपल्याला आवडत नाही अथवा त्यात वापरलेल्या पदार्थांच्या उत्कृष्टतेची खात्री नसते, म्हणून आपणच आपले इन्स्टंट पाकिट, त्याच्या साईजप्रमाणे तयार ठेवू शकतो.
हा विचार एकदा मनात रुजला, की तुम्ही स्वत: त्यात संशोधन करून, आपल्या आवश्यकतेप्रमाणे त्यात भर घालू शकता. या सर्वांनी विकतचे, घरचे, बाहेरचे ह्याचा सुवर्णमध्य साधता येतो.
अनेक वेळा वेळ असतो, तेव्हा लक्षात येत नाही. प्रत्यक्ष कृतीपेक्षा विचारातच जास्ती वेळ जातो. म्हणून एखाद्या सोयीस्कर जागी, स्वयंपाकघरात, फ्रीजजवळ बोर्ड लावून ठेवावा व त्यावर टिपणे, याद्या कराव्यात. एकेका आठवड्यांचे फ्लेक्झिबलही टाईमटेबल तयार करून ठेवावे. घरात तयार असलेला पदार्थ, तयारीही विसरली जाते, ह्यासाठी विशिष्ट गोष्टींच्या विशिष्ट जागा, विशिष्ट बरण्या, बाटल्या ठरवून ठेवाव्यात. स्मरणचिठ्‌ठ्या व लेबल्स यांची मदत घ्यावी. छोट्या मोठ्या सोयीच्या भरपूर डबे बाटल्या उपलब्ध ठेवाव्या, नाहीतर तयार पदार्थाला योग्य तो कंटेनर शोधण्यातच जीव जातो.
अजूनही एक करता येईल, समविचारी, आचारी कोणत्याही व्यक्तीशी या तयारीची देवाण घेवाण होऊ शकते, स्वयंपाकाच्या तयारीची भीशी, बँक ह्याची निर्मिती होऊ शकते.
आजच्या आधुनिक स्त्रीला पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत, बाई, किंवा पंडितही. पण आपल्यापेक्षाही बाहेरून येणार्‍या स्वयंपाक्याचा वेळ अजूनच मर्यादित व फ्लेक्झिबलही नाही, म्हणून तयारी अत्यावश्यक होते. पुष्कळ पर्याय असले तरी आठवड्याचे ३ गुणिले ७ वेळचे नियोजन करणे म्हणजे कर्मकटकटच, कारण उपलब्धतेमुळे प्रत्येकाच्याच वाढलेल्या अवास्तव अपेक्षा आणि स्वत:ला सुपरवुमन सिद्ध करण्याची आजच्या स्त्रीची अतिरेकी ओढ! यामुळे आठवड्याच्या २१ वेळाचे नियोजन म्हणजे तारेवरची कसरतच आहे. त्यामुळे नियोजन पूर्वीपेक्षाही कठीण झाले आहे. त्यातही आधुनिक स्त्री कुटुंबाच्या आरोग्यदायी आहाराविषयी जास्त जागरूक आहे.
बाहेरगावी एकट्या राहणार्‍या माणसाला, अशी तयारी उपलब्ध असेल, तर त्याला आरोग्यपुर्ण आहार घेणे बर्‍याच अंशी सोपे जाईल. साधारणपणे ५०-७० वयोगटातल्या अनेक जणांना असे वाटते की, आजकालच्या या तरुण मुलींना स्वयंपाकाचा काय प्रश्‍न आहे, अर्ध्यावेळ बाहेर जेवायचे, बाकी वेळ बाहेरचे आणायचे, सर्व तयारी उपलब्ध! ही गोष्ट बर्‍याच अंशी खरी असली तरी वस्तुस्थिती तशी अजीबातच नाही. त्यांच्या व्यस्त व तणावपूर्ण जीवनात रोज ३/४ वेळा सर्वांना काय खायला द्यायचे याचा ताण सततच घेरून टाकत असतो व तो वाटतो तितका सोपाही नसतो.
तोचतोचपणा टाळून, विविधता आणणे, फार महत्त्वाचे असते. पूर्वीपेक्षा आमची स्त्री कुटुंबाच्या आरोग्याविषयी, पौष्टिक आहाराविषयी जास्त जाणकार व दक्ष आहे. तर चव, आहार व पौष्टिकता यांचा संगम साधून कुटुंबाने समाधानाची ढेकर देण्यासाठी तिला कराव्या लागणार्‍या धडपडीची तुलना करणे कठीण आहे.
सर्वात शेवटी नव्याचे कितीही स्वागत केले तरी तुम्हाला नेहेमी जे पिढीजात खायची सवय असते, तेच आवडते, भावते, रुचते, पचते, असे आधुनिक आहारतज्ज्ञांचेही मत आहे.
रजनी अनिल पेंडसे,७३८७६९६१३२