फुलझाडाचे मनोगत

0
326

ज्यांनी झाड लावले आहे किंवा ज्यांच्या कम्पाऊंडमध्ये झाड आहे त्यांच्यासाठी आपण फुले ठेवावीत ही भावनाच नष्ट झालेली आहे. ही जमात इतकी धीट झाली आहे की, आपण चौर्यकर्म करतो हेही ध्यानात येत नाही. आपल्या घरातील आजी-आजोबा, आई-वडील लहान मुलांना शिकवितात, ‘चोरी करू नये,’ ‘फुलझाडांना हात लावू नये,’ ‘फुले तोडू नये,’ पण स्वत: मात्र दुसर्‍यांच्या घरची फुले, फळे तोडतात.
मला तुम्ही सगळे ओळखता. माझी महती संत तुकारामांनी गायलेली आहे. माझे महत्त्व शास्त्रज्ञ, संत, सामान्य जनता सगळ्यांना माहिती आहे. मी परोपकारासाठी प्रसिद्ध आहे. मी जर नसलो तर पृथ्वीवर हाहाकार माजेल. माझ्यावर अनेक सुभाषितेही आहेत. निसर्गाचे चक्र सुव्यवस्थित चालावे यात माझा खारीचा वाटा आहे. अनेक जिवांचे आश्रयस्थान मी आहे. माझ्यामुळे सगळ्यांना आश्रय मिळतो. थकल्या-भागल्या जिवांचा मी विसावा आहे. माझ्या वापराशिवाय मनुष्याचे जीवनच चालत नाही. ओळखलंत का मला?
नाही ना! मग मीच सांगतो मी कोण? मी म्हणजे फलाफुळांनी डवरलेले झाड. मला बघून सगळ्यांचे मन प्रसन्न होते. विविध प्रकारची फुले, फळे, पाने यांना बघून मन आल्हाददायक होते. माझे किती म्हणून फुलांचे रंग, निरनिराळे आकार, विविध फळे, रसयुक्त वेगवेगळ्या चवींची, मनाला भुलवणारी, जिभेला सुखावणारी, शरीराला पोषक अशी. म्हणूनच म्हणतात- ‘‘परोपकाराय वहन्ति नद्या: परोपकाराय फलन्ति वृक्षा:|’’ असा मी परोपकारी. पांथस्थ थकले असता माझ्या सावलीत विश्राम करतात. उन्हे, पावसापासूनही मी संरक्षण करतो. अन्नाची, घराची गरज भागवतो. माझ्या प्रत्येक अवयवाचा उपयोग होतो. जमिनीची धूप थांबते. पर्जन्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठीदेखील माझा उपयोग होतो. असा मी. तुमच्या आयुष्यात माझे महत्त्वाचे स्थान आहे. घर सुशोभित करणे, अभिनंदन करणे, आपल्या भावना व्यक्त करणे इतकेच नव्हे, तर देवापासून तर शवापर्यंत माझा उपयोग केला जातो.
पण…! मला आज माझी वेगळीच व्यथा मांडायची आहे. विशेषत्वाने माझ्या शहरातील अस्तित्वाची. पूर्वी सारे वनजंगल होते, पण आज मात्र सिमेंट कॉंक्रीटचे जंगल झाले आहे. मोठमोठ्या इमारती, प्रचंड मोठे रस्ते, कारखाने इ.साठी माझी वृक्षतोड होते. पूर्वी प्रत्येकाचे स्वप्न असायचे- ‘‘असावे घर ते आपुले छान, पुढे असावा बागबगिचा, वेलमंडपी जाई-जुईचा,’’ पण आज मात्र फ्लॅट संस्कृती बोकाळली आहे आणि बगिच्यांना जागाच शिल्लक राहिली नाही. त्यातही आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत शोभेची व फुलांची झाडे लावणारे शिल्लक आहेत. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे. खाली भिंतीशी प्रांगणात झाडे लावली जातात, पण त्यांचे संगोपन फक्त रखवालदाराने करायचे असते. फळे, फुले लागली तर सर्व फ्लॅटधारकांचा त्यावर अधिकार असतो. काही फ्लॅट स्कीम्स्‌मध्ये तर झाडे लावण्यास, कुंड्या ठेवण्यास मनाई आहे.
प्रत्येकाला देवपूजेला, घर सजविण्याकरिता, हार, गजरे करण्याकरिता फुले लागतात. महानगरपालिकेनेही रस्त्यांच्या शेजारी झाडे लावली आहेत, पण त्यांच्या फांद्यांना फुलेच शिल्लक राहात नाहीत. शहरात पहाटपक्षी नावाची एक जमात सध्या हेल्थ अवेअरनेसच्या नावाखाली उदयास आली आहे. प्रत्येक जण सकाळी उठून शुद्ध हवेत (जी माझ्यामुळेच मिळते) फिरायला जातात. जाताना हातात एक फ्लास्टिकची पिशवी व काठी घेऊन जातात. म्हणायला ही काठी चालताना आधार असते, पण वस्तुत: तिचा वापर माझ्या फांद्या वाकविण्यासाठी असतो.
लोकांच्या कम्पाऊंडशेजारील बाहेर व आतून जी फुलझाडे लावलेली असतात त्यांचा उपयोग केवळ लोकांसाठीच असतो. ही पहाटपक्षी जमात पहाटे-पहाटे लोकांच्या कम्पाऊंडशी जाऊन फुलांनी डवरलेले झाड ओके-बोके करण्यात एक्सपर्ट झाली आहे. ज्यांनी झाड लावले आहे किंवा ज्यांच्या कम्पाऊंडमध्ये झाड आहे, त्यांच्यासाठी आपण फुले ठेवावीत ही भावनाच नष्ट झालेली आहे. ती इतकी धीट झाली आहे की, आपण चौर्यकर्म करतो हेही ध्यानात येत नाही. आपल्या घरातील आजी-आजोबा, आई-वडील लहान मुलांना शिकवितात, ‘‘चोरी करू नये,’’ ‘‘फुलझाडांना हात लावू नये,’’ ‘‘फुले तोडू नये,’’ अशी शिकवण देतात, पण स्वत: मात्र दुसर्‍यांच्या घरची फुले-फळे तोडतात. असा हा तुमचा अजब न्याय. तुम्हाला त्याचे काहीच वाटत नाही.
मला मात्र हल्ली आपण परोपकारी न राहता कृतघ्न झालो आहेत असे वाटते. बघा ना! याचे कारण तुम्ही आहात. मला जे लावतात, माझे खतपाणी घालून पोषण करतात, त्यांचे सतत माझ्याकडे लक्ष असते. ते माझी काळजी घेतात, पण त्यांना मी त्यांच्या घरच्या देवासाठी देवपूजेलादेखील पुरेशी फुले देऊ शकत नाही. कारण मला कोणालाच प्रतिकार करता येत नाही. बोलतादेखील येत नाही. उन्हाळ्यात जेव्हा रखरखीत उन्हे असतात तेव्हा माझे पालक माझी काळजी घेतात, पण मी… मात्र कृतघ्न झालो आहे. तुम्ही मला एक थेंबदेखील पाणी घालत नाही. रखरखीत उन्हापासून माझे रक्षण करीत नाहीत. खत घालून मला जोपासावे, असे तुम्हाला वाटत नाही. जनावरांपासून माझे रक्षण करावे असे वाटत नाही, पण पहाट पक्षी म्हणून सगळ्यात पहिले हक्क मात्र दाखवतात.
आताशा मला परोपकारी म्हणून घ्यायचीदेखील लाज वाटते. जे माझी जोपसना करतात ते फुले विकत आणतात व ज्यांचा माझ्यावर काहीही हक्क नाही ते मात्र हक्काने तोडून नेतात. शी! काय माझे लाजिरवाणे जिणे. मी अतिशय कृतघ्न झालो आहे. देवा, मला प्रतिकार करण्याची शक्ती दे एवढेच मी तुझ्याजवळ मागू शकतो. यांना शहाणपण दे (पहाटपक्षी) असे म्हणणेदेखील चुकीचे ठरेल.
सुरेखा भालचंद्र देशपांडे,९८२२४४४२४५