सुखद माघ महिना

0
249

पौष महिन्याच्या हातात हात घालून थंडीचा परतीचा प्रवास हळूहळू सुरू झालेला असतो. भोवतालच्या निसर्गाचा, वातावरणाचा मस्त परिणाम मनावर झालेला असतो. माघ महिन्याची चाहूल लागते आणि मला हमखास आठवण येते त्या कॉलेजमधल्या दिवसांची आणि संस्कृतच्या तासाची. त्याचं कारणही तसंच. कॉलेजमध्ये संस्कृत शिकत असताना अगदी सुरुवातीला एक श्‍लोक आम्हाला अध्यापकांनी सांगितला होता. तो अर्थासहित वहीमध्ये टिपून ठेवला होता. तो श्‍लोक संस्कृत साहित्यातील दिग्गजांमधील त्यांच्या विशेषता सांगणारा होता.
‘‘उपमा कालिदासस्य भारवेर्थगौरवम्
दण्डित: पदलालित्यं माघे
सन्ति त्रयो गुणा:॥
अर्थात, महाकवी कालिदासाची विशेषता त्याच्या चपखल उपमा देण्यात, भारवी कवीची विशेषता अर्थ खुलवून सांगण्यात, दण्डी कवीची विशेषता सुंदर शब्दरचनेत होती. मात्र माघ नावाच्या एकाच कवीमध्ये हे तिन्ही गुणविशेष सामावले होते.
‘माघे सन्ति त्रयो गुणा:’मुळे हा श्‍लोक आणि त्याचं वेगळेपण मनात भरून राहिलं होतं. कारण तोपर्यंत ‘माघ’ हा मराठी बारा महिन्यांपैकी शेवटून दुसरा महिना इतकंच माहिती होतं. क्वचित कवी अनिलांची-
सुटले सोसाट्याचे माघामधले वारे
गोठले हिमाद्रित गंगाजल की सारे
कविता ओठी यायची, पण माघ हे कवीचं नाव असू शकतं, ही कल्पनाच वेगळी वाटत होती आणि मनाच्या कोपर्‍यात ‘माघे सन्ति त्रयो गुणा:’ने जागा पक्की केली होती. मग माघ कवी तसाच राहू देत. माघ महिन्याचं निरीक्षण, चिंतन, मनन सुरू केलं, तर एक वेगळीच पण निश्‍चित गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे हा जो माघ महिना आहे तोसुद्धा तीन गुणविशेषांनी युक्त असा आहे. आपण सारेच हा अनुभव नेहमी घेतो की, या माघ महिन्यात कधीतरी अगदी उन्हाळ्यासारखं कडक, रणरणतं उन्ह पडतं, कधी आभाळ ओथंबून येऊन मेघांच्या गडगडाटासह पाऊस पडतो. कधी एखादा दिवस अगदी कडाक्याची थंडी पडते. म्हणजे ‘माघे सन्ति त्रयो गुणाः हे माघ महिन्याबाबतही खरंच आहे की! मग ही गोष्ट अध्यापकांशी बोलून त्याला साजेसा श्‍लोक गंमत म्हणून तयार करून दाखविला-
‘‘माघवस्यातपश्चैव ज्येष्ठस्य घनगर्जितम्‌|
शैत्यं तु मार्गशीर्षस्य, माघे सन्ति त्रयो गुणाः॥
अर्थात वैशाख महिन्यासारखं रणरणतं ऊन, ज्येष्ठ महिन्यातल्याप्रमाणे घनगर्जना आणि मार्गशीर्ष महिन्यातल्यासारखी बोचरी थंडी असा तीनही प्रकारचा अनुभव एकाच माघ महिन्यात येतो आणि फक्त एवढंच कशाला? माघ महिन्यातल्या एकाच दिवशीसुद्धा या तिन्ही प्रकारच्या वातावरणाचा प्रत्यय आपल्याला येतो. माघ महिन्यातील सकाळ आल्हाददायक, परमेश्‍वराचे भजन पूजन करण्यास अगदी पोषक असे असते, पण दिवस जसजसा वर येऊ लागतो तसतशी दुपार अतिशय गरमीमुळे त्रस्त करून सोडते. तोच दिवस संध्याकाळ सरशी मात्र धुंद, विलासाला योग्य रात्रीत परिवर्तित होतो. अर्थात माघ महिन्यातल्या एकाच दिवशी सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचा अनुभव येतो. तर अशा प्रकारे माघ महिनासुद्धा तीन गुणांनी युक्त असाच आहे.
‘‘माघे सन्ति त्रयो गुणा:’’
हे पटतंय नं तुम्हाला?
मीनाक्षी मोहरील/ ९९२३०२०३३४