शाप की वरदान?

0
299

शाप की वरदान? हा किस्सा पुराणात, पोथ्यात खूप पाहायला मिळतो. शाप-पश्‍चात्ताप-उ:शाप आणि मग वरदान अशा पायर्‍या म्हणूयात आपण. काही वाक्‌प्रचार खूपच प्रचलित आहेत. ‘‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.’’ कावळा दुष्ट-खलनायक तर गार सुष्ट-पुण्यवान. म्हणून तर गाईच्या शेपटीला हात लावून आपण नकळत हात जोडतो. ही एक प्रकारची श्रद्धाच आहे. तसे पाहिले तर कावळाही काही अंशी उपयुक्तच आहे. घाण नसेल तर कावळा येत नाही. आता कावळा किती उपयुक्त आहे पाहा. श्राद्धाच्या प्रसंगी पिंडदानाचा जो विधी असतो, त्या वेळी कावळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहिली जाते. तो पिंडाला शिवला नाही तर त्या मृताचा जीव कशात तरी अटकला आहे, अशी समजूत आहे. या वेळी तर कावळ्याची अगदी आतुरतेने वाट पहावी लागते. तो येईपर्यंत जीव अगदी टांगणीला लागला असतो. काय बरं इच्छा असेल? यावर अनेक तर्क केले जातात. आता काही चतुर असामींनी याचा धंदा बनवला आहे. कावळ्यांना पिंजर्‍यात बंदिस्त करून ठेवले जाते. मग पिंडदानाच्या वेळी हजर! पैसे घेऊन कावळा सोडण्यात येतो. अन्न दिसल्याबरोबर तो उडत येऊन त्या पिंडाला शिवतो. माणूस आपल्या बुद्धीचा केव्हा आणि कसा वापर करेल देव जाणे. आपण सारे त्याचेच प्रॉडक्ट. गाईचे मात्र अगदी उलट! ती सदैव पुण्यवानच! एक तर ती दूध देते. त्यावर बाल्यांचा प्रतिपाळ होतो. देवाचा नैवेद्य आणि गाईचा नैवेद्य असा तिचा मान आहे. नाही सापडली तर शोधाशोध. गाईच्या पोटात ३३ कोटी देवांचा वास असतो. मग हा नैवेद्य ३३ कोटी देवांना प्राप्त होतो. काहीही असो, काही प्रघात मोठे गोड असतात. आपण भोजन करण्यापूर्वी ते आधी अर्पण करणे हा केवढा मोठा उदात्त विचार त्यामागे!
रामायणात प्रसिद्ध असलेली कथा. गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिला. तू ‘शिला’ होशील. मग उ:शापही दिला. रामाच्या पदस्पर्शाने तू पावन होशील. हा झाला रामायणातला किस्सा. महाभारतात महारथी भीष्माचार्यांना वरदान मिळाले. त्यांचे पिता राजा शंतनूकडून ‘तुला इच्छामरण येईल.’ कुरुकुलाची सारी धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली. सारे प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय त्यांना मरावे असे वाटेना. उत्तरायनाची वाट पाहात शरशय्येवर वेदना सहन करीत मृत्यूची वाट पाहात. शेवटी भगवान श्रीकृष्णांच्या मध्यस्थीने सुटका झाली. असे वरदानच नकोसे झाले. अश्‍वत्थाम्याचीही अशीच कथा. वरदानसुद्धा शाप ठरते.
आधुनिक काळात पडलेला प्रश्‍न- विज्ञान त्याहीपेक्षा तंत्रज्ञान हे शाप की वरदान? आज तंत्रज्ञान इतके सपाटून विकसित होत आहे की, ‘‘घेता घेता किती घेशील दो करांनी.’’ हातात सतत मोबाईल. त्यावर व्हॉट्‌स ऍप? त्यात जनता इतकी गढून गेली आहे की, तिला काळाचे, वेळेचे भानच राहिले नाही. सतत कानाला चिकटलेला! हे वरदानच की! सेकंदा सेकंदाला सारे कसे अपडेट. बँकेत जायची गरज नाही. मुख न पाहता चॅटिंग सुरू! पहा बरं! आपल्या हाती सारे जगच आले. कशी किमया आहे तंत्रज्ञानाची! आपले ‘फेसबुक’ ‘झुकेरबर्ग’ यांनी तर सार्‍या जगालाच झुकवले. काढ फोटो टाक फेसबुकवर. मी ट्रीपला गेली टाक फेसबुकवर. काही वेळा हसूच येते. या लहान लहान गोष्टींचे जगाला काय करायचे आहे? घरगुती मामला तो! कशाला जगजाहीर? फक्त फेस पाहून किंवा न पाहूनही खरंच खरी मैत्री होते का? खूप मित्र बनवा. पास करा मॅसेज शेकडोंना. हे फेसबुकवरचे मित्र कामी येतील का? ’’ऋीळशपव ळप पशशव ळी र षीळशपव ळपवशशव’’ मग हे मित्र संकटसमयी कुठे सापडतील? ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ आता हेच फेसबुक वरदानही ठरतेय्. आता बघा, चांगल्या, शुभ, हितकारक-जनकल्याण करणार्‍या गोष्टींचा प्रचार एका झटक्यात होतो. मग हे वरदानच नाही का? अनेकांना स्फूर्ती मिळते. त्यांचा उत्साह वाढतो. आपणही काही करावे, असे वाटू लागते. एकाच गोष्टीच्या दोन बाजू. राजा दशरथाला श्रावण बाळाच्या अंध माता-पित्याने दिलेला शाप कालांतराने वरदानच ठरला. ‘पुत्र पुत्र करीत मरशील’ हा शाप! श्रीरामाने १४ वर्षे वनवास भोगताना अनेक दुष्ट-कपटी राक्षसांचा संहार करून ऋषीमुनींना त्यांचे यज्ञयाग-साधना-तपश्‍चर्या करण्यासाठी सुकर केले. प्रजेला सुटकेचा श्‍वास घेता आला.
– भावना ढोबळे/९८६०२१८६४१