परीक्षा जीवनाची की स्वत:ची?

0
303

‘परीक्षा’ हा शब्द उच्चारला की भल्याभल्यांना घाम सुटतो! परंतु, आपण आपल्या जीवनाचा अभ्यास जर केला तर आपल्याला कळेल की, आपण रोज परीक्षाच देत असतो. म्हणजे बघा ना, कुठली ही समस्या जर आली तर आपण ती मोठ्या कसरतीने सोडवतो व यश मिळाल्याचं समाधान आपल्या चेहर्‍यावर झळकू लागते. म्हणजे मनुष्य आयुष्यभर एखाद्या परीक्षार्थीप्रमाणेच जगत असतो व अनुभवाच्या बळावर मार्गक्रमण करीत असतो. यश-अपयश हे आपल्या कर्मावर म्हणजे प्रयत्नांवर अवलंबून असते. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचे दिवस जवळ येत आहेत. वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फळ तीन तासांत पेपर सोडवून मिळणार असते. मुलांनी कसा अभ्यास केला, यापेक्षा पेपर कसा सोडविला, यालाच अधिक महत्त्व असते. संख्यात्मकतेवर जास्त भर दिला जात आहे. तेव्हा चांगले टक्के कसे मिळवावे, याकरिता वेगवेगळे कोचिंग क्लासेस निघालेले आहेत. यातून एक गोष्ट लक्षात येत आहे की, घरोघरी पालकांचीच स्पर्धा होत आहे व याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यातून नैराश्य येऊन बरेच विद्यार्थी आपले जीवन संपवतात. तेव्हा परीक्षा नसावी किंवा कमीजास्त गुणांमुळेदेखील विद्यार्थी स्वतःला कमी समजू लागतात. म्हणून आता माध्यमिक स्तरावर ग्रेडेशन पद्धत सुरू झाली. पण, या सर्वातून किती फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे.
आज शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. परंतु, या बदलातून आम्ही खरेच या देशाचे सशक्त नागरिक बनवत आहो का? की आम्ही नुसती पोपटपंची करणारी पिढी घडवत आहो, याचादेखील विचार करण्याची गरज आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना स्वप्ने बघायला सांगितली, ज्यामध्ये सृजनावर भर दिला गेला. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नातेदेखील त्यांनी महत्त्वाचे मानले.
आज शिक्षणाकडे व्यावसायिक दृष्टीनेच पाहिले जात आहे. त्यामुळे भविष्यात दर्जेदार शिक्षण कशास म्हणावे याचाच प्रत्येकाला पेच पडेल! आम्ही हे सर्व कशासाठी करतो आहे, तर एक स्टेटस् सिंबॉंल म्हणून पाल्यांचा विचार न करता, आपल्या अतृप्त इच्छा त्यांचा बळी देऊन पूर्ण करणार काय? आजच्या काळात ‘अडाणी’ कुणी राहिले नाही. मात्र, ‘सुशिक्षित अडाण्यां’चे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे! आपण कोणत्या गटात बसता, हेदेखील पाहिले पाहिजे.
आज बर्‍याचदा ‘चांगले शिक्षण’ हे वाक्य कानावर पडते. मला कळत नाही की, शिक्षणात वाईट शिक्षण कुठे मिळते? आणि आजपर्यंत कुठल्याच शाळेतील शिक्षकाने मुलांना शिव्या कशा द्याव्या हे शिकवल्याचे ऐकिवात नाही. जे शिकवले जात नाही ते मुले बरोबर शिकतात. ते शिकवावे लागत नाही. बरं, काही शाळांमधे स्पर्धा दिसत आहे. आजच्या कमर्शियल जगात चौकाचौकात मोठमोठाले बॅनर आणि पोस्टर स्पर्धा चाललेली दिसते. मला एवढेच म्हणायचे आहे की, प्रत्येक पालकाला आपला कलदार कसा आहे, हे माहीत असते. तेव्हा नाहक पैशाच्या बळावर जी मिळत नाही अशी बुद्धी घेण्याचा आटापिटा कशासाठी?
मुलाचे नाव शाळेत टाकताना पालकांची मुलाखत का घेतात, हे कोडं अद्याप मलातरी उलगडलं नाही. शाळेत मुले घेताना जर हुशार विद्यार्थीच घेतले, तर निकाल उत्कृष्टच लागणार, यात शंकाच नाही. मग सर्वसाधारण मुलांचे भविष्य काय? त्यांनी कुठे जावं? माझ्या मते, सर्व कामे करून, घरच्यांना मदत करून जर एखादा विद्यार्थी ५० टक्के गुण मिळवत असेल, तर त्याला मी हुशार समजतो. कारण तो व्यावहारिक ज्ञान घेऊन पुढे जात असतो. भविष्यात असे विद्यार्थी कधीच मागे पडत नाहीत. उलट, शिकवणी आणि अभ्यास करणारा विद्यार्थी जर ८० टक्के घेत असेल तर तो एकांगीच राहील. अपवादात्मक व्यवहारशील बनतात. शेवटी शिक्षणाचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे.
-ओमप्रकाश ढोरे/९४२३४२७३९०