दगडफेक करणार्‍यांवर कारवाईची पूर्ण सूट

मनोहर पर्रीकर यांची माहिती

0
204

वृत्तसंस्था
श्रीनगर, १७ फेबु्रवारी
दहशतवादविरोधी कारवाईच्या काळात आणि कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक लष्करी जवानांवर दगडफेक करीत असतात आणि अशा घटनांमध्ये लष्कराला सर्वाधिक हानी होत असते, या लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्तव्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी समर्थन केले. प्रत्येकच काश्मिरी व्यक्तीला दहशतवादी समर्थक मानत नाही, पण जर कोणी लष्कराविरोधात कारवाया करीत असेल, तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे अधिकार लष्कराला आहेत आणि जवानांना तशी सूट देण्यात आली आहे, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
लष्कराच्या कारवाईत कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर, त्यावेळी कमांडिग ऑफिसरला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. लष्करी अधिकारी प्रत्येकच काश्मिरी व्यक्तीला दहशतवाद्यांचा समर्थक मानत नाही. पण जो दहशतवाद्यांच्या बाजूने आहे, त्यालाही दहशतवादीच मानले जाईल, असं मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनीही यापूर्वी बिपीन रावत यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना, दगडफेक करणारे आणि राष्ट्रहिताविरोधात काम करणार्‍यांविरोधात कारवाई व्हायलाच हवी. आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वात महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले आहे.